Friday, 26 June 2026

३४८ प्रकारची औषधे दान करून उरणच्या तोगरे दाम्पत्याचा समाजोपयोगी उपक्रम !!

३४८ प्रकारची औषधे दान करून उरणच्या तोगरे दाम्पत्याचा समाजोपयोगी उपक्रम !!

तोगरे दांपत्या मार्फत आजपर्यंत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील १६८ शासकीय रुग्णालये तसेच अनेक नोंदणीकृत सामाजिक संस्थांना दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची औषधे दान

उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) :
रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, जीते येथे उरण मधील जेष्ठ समाजसेवक एस. आर. तोगरे तथा समाजसेविका   सुमनताई संग्राम तोगरे  महाराष्ट्र शासन पुरस्कारित यांच्या वतीने ३४८ प्रकारची औषधे मोफत दान करण्यात आली. या औषधांची अंदाजे किंमत सुमारे एक ते सव्वा लाख रुपये किमतीची आहेत.ग्रामीण भागातील रुग्णांना आवश्यक औषधे सहज उपलब्ध व्हावीत तसेच आरोग्य सेवेला बळकटी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या औषधदानामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना मोठा लाभ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अपर्णा माळगे, औषध निर्माण अधिकारी श्रीमती रुपाली म्हात्रे, लॅब टेक्निशियन श्रीमती प्रियांका लोहार, आरोग्य निरीक्षक  उदय म्हात्रे व  राजेश म्हात्रे, आरोग्य सेवक भूषण पाटील, स्टाफ नर्स श्रीमती सुनीता गवळी, स्त्री परिचर श्रीमती ज्योत्स्ना दळवी तसेच सफाई कामगार श्रीमती प्रफुल्ला नाईक उपस्थित होते.

उपस्थितांनी जेष्ठ समाजसेवक एस. आर. तोगरे व जेष्ठ समाज सेविका सुमनताई संग्राम तोगरे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत या उपक्रमाचे स्वागत केले.विशेष म्हणजे, तोगरे दांपत्याने आजपर्यंत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील १६८ शासकीय रुग्णालये तसेच अनेक नोंदणीकृत सामाजिक संस्थांना दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची औषधे दान केली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे आरोग्य क्षेत्रात सामाजिक सेवेचा नवा आदर्श निर्माण झाला असून, त्यांनी केलेली ही सेवा अतुलनीय,उल्लेखनीय मानली जात आहे.

कल्याण पश्चिमेत पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम; मॉक ड्रिलद्वारे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे प्रशिक्षण !

कल्याण पश्चिमेत पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम; मॉक ड्रिलद्वारे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे प्रशिक्षण !

कल्याण, प्रतिनिधी :

अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या आदेशान्वये कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानावर परिमंडळ 3 मधील पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार यांची दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली. दंगलसदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी फडके मैदानात मॉक ड्रिलचा थरार रंगला.

*तालमीचा उद्देश*  
कायदा, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने नियंत्रण कसे मिळवायचे याचा सराव म्हणून गुरुवारी ही रंगीत तालीम घेण्यात आली. जमाव नियंत्रण, अश्रुधुराचा वापर, लाठीमार रचना आणि जखमींना तातडीने मदत पोहोचवण्याचा सराव यात करण्यात आला.

*सहभागी अधिकारी व पथके*  
सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पार पडलेल्या तालमीत परिमंडळ 3 मधील आठही पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. 

*सहभागी, अधिकारी, कर्मचारी व साधने* 
पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने, खडकपाडा पोलीस स्टेशनचे वपोनी डॉ. अमरनाथ वाघमोडे, महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वपोनी बलीराम परदेशी, 22 पोलीस अधिकारी, 92 पोलीस अंमलदार, 2 डीआय, 1 बिगलर, 3 सिआरएम मोबाईल, झोन 3 स्ट्रायकिंग, 1 एसआरपीएफ प्लाटून, 1 ॲम्बुलन्स, 1 फायर ब्रिगेड वाहन  सहभागी झाले होते.

*तालमीचे महत्त्व*  
अशा तालीमांमुळे पोलिसांची कृतीक्षमता वाढते व प्रत्यक्ष परिस्थितीत जलद निर्णय घेण्याची सवय होते. कल्याणच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या तालीमीमुळे नागरिकांमध्येही पोलिसांबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली आहे, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

रासायनिक व विनाशकारी प्रकल्प कोकणात नको; स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांची भूमिका !!

रासायनिक व विनाशकारी प्रकल्प कोकणात नको; स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांची भूमिका !! 

प्रतिनिधी | कोकण :

स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी कोकण परिसरात रासायनिक व पर्यावरणाला हानी पोहोचवणारे विनाशकारी प्रकल्प उभारण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. कोकणाचा नैसर्गिक वारसा, जैवविविधता, शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य यांचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

*अभ्यास व सहभाग आवश्यक*  
संजय कोकरे यांच्या मते, कोणताही मोठा औद्योगिक प्रकल्प राबवण्यापूर्वी पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग घेऊन सर्व कायदेशीर आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन व्हायला हवे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी आणि स्थानिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होणार नाही, याची शासनाने खात्री करावी, अशी मागणी त्यांनी केली.

*शाश्वत विकासाचे धोरण*  
स्वतंत्र कोकण राज्य अभियानाने कोकणाच्या नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन, स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि शाश्वत विकासाला प्राधान्य देणारे धोरण स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. 

*स्पष्ट मत*  
"कोकणाचा विकास हा पर्यावरण, स्थानिकांचे हित आणि शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवूनच व्हावा. रासायनिक व विनाशकारी प्रकल्पांना कोकणात स्थान नसावे," असे मत संजय कोकरे यांनी व्यक्त केले.

Thursday, 25 June 2026

अशी असेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना !

अशी असेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना !

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असून जमीन धारणेचा कोणताही निकष लागू राहणार नसल्यामुळे ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी मोठी फायदेशीर ठरणार असून ती नेमकी कशी असेल याचा मुद्देनिहाय आढावा...!!

योजनेचे तीन प्रमुख घटक
या योजनेत कर्जमुक्ती, एकवेळ समझोता (वन टाईम सेटलमेंट) आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन स्वतंत्र घटक आहेत. त्यामुळे थकीत कर्जदार शेतकऱ्यांसह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे.

कोणाला मिळणार दोन लाखांपर्यंत कर्जमाफी
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकी असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली रक्कम मुद्दल व व्याजासह दोन लाख रुपयांपर्यंत असल्यास ती संपूर्ण रक्कम माफ केली जाईल. एका किंवा अनेक बँकांमधील एकत्रित थकबाकीचा विचार केला जाणार आहे.

दोन लाखांपेक्षा जास्त कर्जदार शेतकऱ्यांसाठी
ज्या शेतकऱ्यांची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांनी दोन लाखांवरील रक्कम बँकेत जमा करणे आवश्यक राहील. ही रक्कम भरल्यानंतर त्यांना दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल. यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही लाभ
पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत वेळेत कर्जफेड केलेल्या पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही संधी
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी नंतर घेतलेल्या कर्जाची थकबाकी ५० हजार रुपयांपर्यंत असल्यास त्यांनाही या नव्या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो.

कोण ठरणार अपात्र
राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे व्यक्ती, तसेच सहकारी संस्थांमधील २५ हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणारे अधिकारी व कर्मचारी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.

या बँकाचा असेल समावेश
राष्ट्रीयकृत, खाजगी, प्रादेशिक ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांकडून घेतलेल्या पात्र कर्जांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

आधार प्रमाणीकरण व अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार असून अ‍ॅग्रीस्टॅक मंचावर नोंदणी करणे आवश्यक राहील. यासाठी स्वतंत्र आणि अद्ययावत ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात येणार आहे.

लाखो शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देतानाच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा दुहेरी उद्देश या योजनेत दिसून येतो. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार असून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्यात पावसाचे पुनरागमन; ठाणे, पालघर, कोकणात यलो अलर्ट, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा !!

राज्यात पावसाचे पुनरागमन; ठाणे, पालघर, कोकणात यलो अलर्ट, घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा !!

*मुंबई, प्रतिनिधी*

काहीशी विश्रांती घेतल्यानंतर मुंबई व नवी मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. विदर्भही या पावसाला अपवाद ठरला नाही. आठवड्याच्या अखेरीस पुढील 24 तासांत मोसमी वाऱ्यांची दिशा आणखी पुढे सरकणार असून, वाऱ्यांना मिळालेल्या वेगामुळे राज्याच्या उर्वरित भागांतही पाऊस सक्रिय होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

*सरींचा अंदाज*  
पहाटेच्या वेळी व दिवस मावळल्यानंतर पावसाचे ढग दाटून येऊन अनेक ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर सरींचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

*यलो अलर्ट व वाऱ्याचा वेग*  
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ठाणे, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

*घाटमाथ्यावर खबरदारी*  
उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर येथील घाटमाथ्यावर दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यादरम्यान प्रवास करताना सतर्कता बाळगण्याचा इशारा यंत्रणांनी दिला आहे.

*तापमानात फारसा फरक नाही*  
राज्याच्या काही भागांत पाऊस सक्रिय झाला असला तरी काही भागांमध्ये त्याचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे तूर्तास तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. येत्या दिवसांत हा पाऊस किती मनसोक्त बरसतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*बारवी धरणातील जलसाठा ३५ टक्क्यांवर; ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईवर शासनाकडून उपाययोजना*

*बारवी धरणातील जलसाठा ३५ टक्क्यांवर; ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईवर शासनाकडून उपाययोजना*  

*पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, उद्योगांना कपात; दोन नवीन धरणे प्रस्तावित*

*मुंबई, प्रतिनिधी* : बारवी धरणातील जलसाठा ३५ टक्क्यांवर आल्याने ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या परिस्थितीवर शासनाने गांभीर्याने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसेच दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागांची संयुक्त बैठक लवकरच होणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत दिली.

*लक्षवेधीवर राज्यमंत्र्यांचे उत्तर*  
विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. चर्चेत सदस्य माधवी नाईक यांनी सहभाग घेतला. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, एमआयडीसीच्या मालकीच्या बारवी धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणीपुरवठा होतो. यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्याने उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन केले जात आहे.

*पिण्याच्या पाण्याला प्राधान्य*  
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून औद्योगिक वापरासाठीच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

*दीर्घकालीन नियोजन*  
राज्यमंत्र्यांनी सांगितले की, जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक नागरिकाला दररोज १३५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत सुमारे ६० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे लवकर पूर्ण होतील. बारवी धरणाची क्षमता वाढविण्याच्या मागणीचीही तपासणी केली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती गरज लक्षात घेऊन दोन नवीन धरणे प्रस्तावित करण्यात आली असून अतिरिक्त जलस्रोत निर्माणासाठी जलसंपदा विभाग नियोजन करत आहे.

पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगरविकास, पाणीपुरवठा आणि जलसंपदा विभागांची संयुक्त बैठक घेऊन संबंधित लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित केले जाणार आहे. भविष्यात मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

"आपली व्यक्ती आपली शाळा” पालक वर्गात वातावरण आनंदाचे !

"आपली व्यक्ती आपली शाळा” पालक वर्गात वातावरण आनंदाचे !  

** जेएनपीए प्रशासनाने संस्थेवर टाकलेला विश्वास सार्थ करू : नरसू पाटील  

 
उरण दि २५, (विठ्ठल ममताबादे) : शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या साई संस्था (ट्रस्ट) डोंबिवली यांच्या शैक्षणिक संकुलाकडे  २०२६-२७ या शैक्षणिक वर्षा पासून जेएनपीए मराठी मध्यम आणि इंग्रजी माध्यम या दोन्ही विद्यालयाचा कारभार आत्ता साई संस्थेच्या हातात आला असल्यामुळे परिसरांतील पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून उरण परिसरांतून जेएनपीएचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणि या संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्यावर अभिनंदनाच वर्षाव होत आहे.
       महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या साईसंस्था (ट्रस्ट) डोंबिवली या संस्थेच्या वतीने डोंबिवली येथे मराठी, गुजराथी, इंग्रजी  मध्यमाच्या बरोबरीने   गत वर्षी आणखीन एक  स्कूल सुरु केले आहे. संस्था गेली १८ वर्षा पेक्षा अधिक काळ कार्यरत आहे,तर रायगड-माणगाव येथे गेली २४ वर्षा पेक्षा अधिक काळ इंग्रजी  माध्यमाचे स्कूल कार्यरत आहे,या सर्व शैक्षणिक वर्षात या सर्व विद्यालयाने आपल्या शालांत परीक्षेच्या १०० % टक्के निकाल लाऊन निकालाची यशस्वी परंपरा आजही राखून ठेवली आहे.मागील चार वर्षात संस्थेच्या वतीने उरण येथे नगराजशेठ सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल व बरोबरीने कोल्हापूर गडहिंग्ल्ज येथे इ.बी.गडकरी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत असून गत वर्षी नरसू पाटील कॉलेज ऑफ फ़िजिओ थेरपी या  आणखी एका नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश या साई संस्थेच्या शैक्षणिक संकुलात झालेला आहे.
     साई संस्था(ट्रस्ट)ने शैक्षणिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली असतानाच या सर्व शैक्षणिक बाबीची देशांतील नंबर वन असणाऱ्या जेएनपीए प्रशासनाने दखल घेत प्रकल्पग्रस्थ असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्दात हेतू विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन उरण येथील जेएनपीए वसाहत संकुलात असणाऱ्या जेएनपीए विद्यालयाच्या मराठी माध्यमासह यंदाच्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना सर्वागीण शिक्षण देण्याची धुरा साई संस्थेवर पासून टाकली आहे. 
          या संदर्भात आमच्या प्रतिनिधी बरोबर बोलताना साईस्थेचे(ट्रस्ट)चे अध्यक्ष नरसू पाटील म्हणाले की मी स्वतः शिक्षक असल्याने मला शैक्षणिक क्षेत्राची चांगली जाण आहे.जेएनपीएचे अध्यक्ष,सेक्रेटरी आणि प्रशासनाने संस्थेवर विश्वास दाखून  शिक्षणाची मोठी जबाबदारी माझ्या संस्थेवर इतकेच नाही तर शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या पूर्व संध्येला मराठी मध्यमा बरोबरच इंग्रजी माध्यमाची जबाबदारी ही   सोपविली आहे. तीपूर्ण करण्यास मी व संस्थाचे सर्व सदस्य, माझा सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी कटिबद्ध राहून पूर्ण करू, येथील बहुसंख्य विद्यार्थी हे प्रकल्पग्रस्थ आहेत त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पीएपीची सवलत मिळेल,साई संस्थेच्या वतीनेचालू शैक्षणिक वर्षात कोणत्याही प्रकारे फी वाढ होणार नाही.विशेष म्हणजे सरकारकडून अनुदान मिळविण्या साठी जेएनपीए प्रशासनाने संस्थेला परवानगी दिली आहे त्यामुळे शिक्षकांच्या वेतना मध्येही फरक पडेल व सर्व शिक्षक कायम स्वरूपी सुरक्षित राहतील त्याचप्रमाणे सरकारच्या निकषानूसार विध्यार्थ्यानाही मोफत शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील,आत्ता आपलाच कुटुंबांतील एक व्यक्ती आपलीच शाळा चालवीत आहे ही पालकांची भावना असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती पासून सुरक्षते पर्यंतचे प्रश्न सुटलेआहेत”आपलीव्यक्ती आपली शाळा”हे ब्रीदवाक्य घेऊन  पालक वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. जेएनपीए प्रशासनाने संस्थेवर टाकलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मी वाचन बद्ध राहील असे साई संस्थेचे(ट्रस्ट)चे अध्यक्ष नरसू पाटील यांनी  सांगितले.

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !!

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !! *कल्याण (संजय कांबळे) :* हा...