Tuesday, 25 August 2026

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची संधी; पूर्वप्रशिक्षणासाठी मोफत प्रशिक्षण !!

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची संधी; पूर्वप्रशिक्षणासाठी मोफत प्रशिक्षण !!

भारतीय स्थलसेना, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांना Services Selection Board (SSB) मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक रोड, नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी २१ सप्टेंबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासोबतच निवास व भोजनाची सुविधा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण वर्गात प्रवेशासाठी उमेदवाराने कोणतीही एक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. Combined Defence Services Examination (CDSE-UPSC) किंवा National Defence Academy Examination (NDA-UPSC) उत्तीर्ण होऊन SSB मुलाखतीसाठी पात्र ठरलेले उमेदवार, तसेच NCC Special Entry साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असलेले उमेदवार पात्र राहतील. याशिवाय Technical Graduate Course साठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर असलेले तसेच University Entry Scheme साठी SSB कॉल लेटर असलेले किंवा SSB साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असलेले उमेदवारही या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत.

पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावरील DSW Portal → Resources → PCTC Nashik → SSB-69 या विभागातील प्रवेश अर्ज डाउनलोड करून त्याच्या दोन प्रती भरून सोबत आणाव्यात. तसेच संबंधित पात्रता प्रमाणपत्रे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, SSB पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. ई-मेल : training.   pctcnashik@gmail.com, दूरध्वनी : 0253-2451032, तसेच व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 यावर संपर्क साधता येईल.

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणे जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या मोफत SSB पूर्वप्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

*पनवेल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनीच हाती घेतली रस्ता दुरुस्ती; टेंभोडे मार्गावर स्वखर्चातून डागडुजी !!

*पनवेल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनीच हाती घेतली रस्ता दुरुस्ती; टेंभोडे मार्गावर स्वखर्चातून डागडुजी !!

(महेंद्र उर्फ अण्णा पंडीत)
*पनवेल / टेंभोडे,*: पनवेल - टेंभोडे मार्गावरील एक्सप्रेस हायवे ब्रिजखालील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनीच अखेर पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पनवेल-टेंभोडे मार्गावरील एक्सप्रेस हायवे ब्रिजखाली गेल्या अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक वाहनांचे नुकसान झाले, तर गंभीर अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती.

अखेर नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने या प्रकरणाची माहिती जनहक्क अधिकार संघर्ष सामाजिक संस्थेचे पदाधिकारी श्री. राज भोईर यांना देण्यात आली. नागरिकांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत श्री. राज भोईर यांनी प्रशासनाच्या दुरुस्तीची वाट न पाहता तातडीने स्वखर्चातून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून घेतली.

या सामाजिक कार्यात कुणाल भोईर, आकाश गायडवाड, संकेत भोईर, ओमकार भोईर, केतन ठाकूर, आकाश गंडगे व निशांत कडू तसेच इतर नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान करून सहभाग घेतला. त्यांच्या या पुढाकारामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला असून, संभाव्य अपघात आणि वाहनांचे नुकसान काही प्रमाणात टाळण्यास मदत झाली आहे.

*"नागरिकांनी आंदोलन करावे की अपघाताची वाट पाहावी?" - संतोष चाळके*

यावेळी जनहक्क अधिकार संघर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष चाळके यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. 

"नागरिकांच्या करातून चालणाऱ्या शासकीय यंत्रणेला रस्त्याची मूलभूत देखभाल करण्यासाठी तरी नागरिकांनी आंदोलन करावे लागते का, की एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे? 'रस्ता आमचा, जबाबदारीही आमची' ही भूमिका घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि नागरिकांना स्वखर्चाने रस्ता दुरुस्त करण्याची वेळ येणे, ही PWD प्रशासनासाठी लाजिरवाणी आणि गंभीर बाब आहे," असा घणाघात त्यांनी केला.

*कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा*

तात्पुरत्या डागडुजीमुळे जरी दिलासा मिळाला असला तरी हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी आणि दर्जेदार डागडुजी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

या दुर्लक्षाची दखल घेऊन जनहक्क अधिकार संघर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) व संबंधित पनवेल विभागाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही संस्थेने दिला आहे.

नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेस संबंधित विभागच पूर्णपणे जबाबदार असेल, असा इशारा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.

वसुधा फाऊंडेशनचा पुस्तक प्रकाशन व बालकवि संमेलन सोहळा उत्साहात संपन्न !!

वसुधा फाऊंडेशनचा पुस्तक प्रकाशन व बालकवि संमेलन सोहळा उत्साहात संपन्न !!

*पुणे, दि. 20 ऑगस्ट -* वसुधा फाऊंडेशन, पुणे आयोजित _'आपडी थापडी' बालकाव्यसंग्रह_ आणि _'वसुधाचे कथा वैभव'_ या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा, बक्षीस वितरण आणि राज्यस्तरीय भव्य बालकवि संमेलन सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले.

आम्ही मुंबईकर वृत्तपत्राच्या उपसंपादिका आणि वसुधा फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सौ. वसुधा वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फाऊंडेशन आयोजित कथा स्पर्धेचे परीक्षण शशिकांत सुतार, दिलीप घाटे, राजेश्वर हेंद्रे आणि रामदास तांबे यांनी केले.

*मान्यवरांची उपस्थिती आणि विचार*

सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ. ललिता सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात दोन्ही पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड. अब्दुल शेख, पोलीस अधिकारी आणि दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ यांनी बालसाहित्य निर्मितीचे कौतुक केले. ॲड. शेख म्हणाले, अशी बालकवि संमेलने प्रत्येक गावात झाली तर गुन्हेगारी होणारच नाही. कविता करणारा माणूस संवेदनशील असतो आणि संवेदनशील माणूस माणसांवर प्रेम करतो.

प्रमुख पाहुणे म्हणून कवी व राष्ट्रपती पोलीस पदक विजेते सिताराम नरके, शिक्षक काळुराम वाघचौरे आणि निसर्गकवी लक्ष्मण शिंदे यांनी विचार मांडले. लक्ष्मण शिंदे यांच्या 'झाडाची आरती' या कवितेला रसिकांनी दाद दिली. सिताराम नरके यांच्या काव्य प्रतिभेचे आणि आवाजातील धारदारपणाचे कौतुक झाले. दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ यांनी उत्तम कथानकाला न्याय देण्याचे आश्वासन दिले.

बालसाहित्यिका ललिता सबनीस यांनी कथा स्पर्धेचे कौतुक करत सर्व लिहित्या हातांना शाबासकी दिली आणि बालकवींना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विश्वगुरू मधुसूदन घाणेकर, प्रतीक्षा इंटरनॅशनलच्या प्रिया दामले आणि सारिका उर्फ मधुकर्णिका यांचीही उपस्थिती होती.

*संस्थापिकेचा आढावा आणि बालकवींचे सादरीकरण*

स्वागताध्यक्षा व संस्थापिका सौ. वसुधा नाईक यांनी फाऊंडेशनच्या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा आढावा दिला. त्यांनी सर्व बालकांना कवितेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

गजानन उफाडे यांनी बहारदार निवेदन केले. या कार्यक्रमात एकूण तीस बालकवींनी आपली कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. सर्व बालकांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

वीरा दरेकर, मंदार भोंडवे, श्रावणी गुरव, मृणाल ताग्हाणे, श्रेयशी कांबळे, सिद्धी बिडकर, अनुष्का लांडे, यश यादव, वेदिका सावंत, श्रीराम पवार, अस्मिता रांजणे, संस्कृती खुटवड, सारिका सोंडकर, प्रांजल मोरे, ईश्वरी खोपडे, आर्या ढोके, श्रावणी लोहार, पार्थ घडे, गायत्री रसाळ, माधुरी गिरी, युवराज मोरे, राधिका सोनवणे, मृण्मयी काळे, अजया मुळीक, ईशिका दोडमणी, रुपाली चव्हाण, दुर्वेश परदेशी आदी बालकवींनी काव्य सादरीकरण केले.

कथा स्पर्धेसाठी योगेश हरणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गौरव पुंडे यांच्या 'गौरवाचे पत्र' या लेखनाने रसिकांच्या मनात फाऊंडेशनबद्दल आदर निर्माण केला. विद्यार्थिनी गायत्री रसाळ हिने वसुधा नाईक यांच्याबद्दल केलेल्या मनोगताने अनेकांच्या डोळ्यात प्रेमळ अश्रू आले.

कार्यक्रमाचे आभार शीतल शर्मा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश हरणे, गौरव पुंडे, श्रीराम घडे, कोमल नाईक, शीतल शर्मा, सायली ढेबे, मयुरी पुंडे आणि राधिका परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले. वसुधा नाईक यांच्या वहिनी कल्पवंती, भाची अपूर्वा आणि पती वैभव नाईक यांचीही मोलाची साथ लाभली.

वृत्त - उपसंपादिका, वसुधा नाईक (सा. आम्ही मुंबईकर)

Monday, 24 August 2026

पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेजमध्ये "अर्थव्यवस्थेवर अर्थसंकल्पाचा प्रभाव” या विषयावर परिसंवाद संपन्न !!

पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेजमध्ये "अर्थव्यवस्थेवर अर्थसंकल्पाचा प्रभाव” या विषयावर परिसंवाद संपन्न !!

पनवेल, २४ ऑगस्ट २०२६: सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पनवेल येथील वाणिज्य विभागाच्या वतीने “अर्थव्यवस्थेवर अर्थसंकल्पाचा प्रभाव” या विषयावर सोमवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य *डॉ. जयंत बेहरा* यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या परिसंवादाचे मार्गदर्शन *प्रा. सी. ए. दीपक वकारिया* यांनी केले. त्यांनी अर्थसंकल्पाची भूमिका तसेच त्याचा आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांवर होणारा परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर व उपयुक्त माहिती दिली.

परिसंवादाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प आणि त्याच्या आर्थिक परिणामांविषयी व्यावहारिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून माहिती मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी *प्राचार्य डॉ. जयंत बेहरा, प्रमुख वक्ते प्रा. सी. ए. दीपक वकारिया, सर्व प्राध्यापकवर्ग तसेच उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे वाणिज्य विभागाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.*

प्रा. पंकज सरवाडे
*HOD, Commerce Department (वाणिज्य विभागप्रमुख)*
St. Wilfred’s College of Arts, Commerce & Science, Panvel.

वृत्त - अश्विनी निवाते 

'युथ की बात’ संवादात युवकांनी व्यक्त केली सरकारी खात्यांकडून जबाबदेही !

'युथ की बात’ संवादात युवकांनी व्यक्त केली सरकारी खात्यांकडून जबाबदेही ! 

ठाणे, दि. २४ -

“बरेच वर्षे आपण बघत आलोय - युवकांना फारसे व्यक्त व्हायला दिले जात नाही. आता त्यांना समजून घ्या”, असा सुर ‘जन गण मन अभियाना’ अंतर्गत आयोजित ‘युथ की बात’ चर्चासत्रात युवक - युवतींनी व्यक्त केला. लक्ष्य परिवर्तन व समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ठाण्यात हा युवा संवाद आयोजित केला होता. भारत जोडो अभियानाचे राजेंद्र चव्हाण, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे अजित डफले, समता विचार प्रसारक संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर आदी मान्यवर श्रोत्यांमध्ये बसून युवा की बात ऐकत होते! 

“सरकार कडून देशाची अपेक्षित प्रगती जेंव्हा पुरेशी होतांना दिसत नाही तेंव्हां आंदोलने होतात. जंतर मंतर आंदोलनात शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला जबाबदार म्हणून जरी मंत्र्यांचा राजीनामा मिळवण्यात यश प्राप्त झाले. मात्र अजून शिक्षण व्यवस्थासुधार होणे बाकी आहे. त्यासाठी आंदोलन सुरुच ठेवावे लागेल. कारण सरकार अनेकदा अवास्तव वा खोटे दावे करत असतात. त्या दाव्यांचा खरेपणा तपासणं आता सोपं झालं आहे. त्यामुळे सरकार आधी नीट विकास करत नाही व मग खोटे दावे करतं तेंव्हां युवक आंदोलन छेडतात! अनेकदा चांगल्या व्यवस्थेच्या आवरणाखाली चुकीच्या बाबी खपवल्या जातात. विद्यार्थ्यांना खरे सांगितले जावे. युवकांना सरकारकडून जबाबदेहीची रास्त अपेक्षा आहे! ही अपेक्षा व्यक्त करत असतांना कुणा आंदोलकाची भाषा अयोग्य वाटली तरी ती ऐकून घ्या. चुका झाल्या तर समजून सांगा. वडीलकीची ही जबाबदारीही सरकार व समाजाने पार पाडायला हवी. तरच युवा निर्भयतेने अभिव्यक्त होईल”, असे मत युवा दक्ष घार्वेने व्यक्त केले. 

शुभम लाड हा दुसरा महाविद्यालयीन युवक म्हणाला, “राजकारणाबाबत मी अगदी अनभिज्ञ होतो. आपलं घर, कुटुंब व अभ्यास हेच माझे जगलहोते. जंतरमंतर आंदोलनाने मला जागे केले. आपलाच पैसा सरकार वापरत असते तर त्याबाबत आपणच जागरूक रहायला हवे, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळेच या आंदोलनाला पाठींबा देतांना स्वतःसाठीही मी यात उतरलो. रेल्वे स्टेशनवर आंदोलन समर्थनाचा फलक घेऊन प्रसंगी एकटा उभा राहीलो. आता युवकांनी “शाळा ठीक करा”, हे आंदोलन करण्यात काही गैर आहे का? तरीही युवकांना मारहाण, शाळा प्रवेश बंदी, त्यांच्यावर केसेस हे कशासाठी केलं जातंय? सरकारच्या कामांवर सर्व स्तरांवर लक्ष ठेवणे ही नागरिकांची जबाबदारी आहे”. 

अपेक्षा कांबळे या युवतीने सांगितले, “जोवर युवक बोलणार नाही, आपसात चर्चा करणार नाही तोवर एकमेकांची मदतही मिळणार नाही. युवकांनी सहकार्य वाढवून एकजुटीने समाजकार्य करत रहायला हवे. आता जागरूक मुली आंदोलनात हिरीरीने सहभागी होत आहेत. निर्भयतेने व्यक्त होत आहेत. मुली मुलांच्या बरोबरीने पुढे येणार याचे भान मुलांनी बाळगायला हवे. मुलींवरील अत्याचाराला पुरुष जबाबदार आहेत तर मुलांना समजवा. युवकांना सजग बनवा. युवतींवर बंधने लादू नका. हा नव्या युगाचा मंत्र आहे”.  

लक्ष्य परिवर्तनचा संयोजक व संस्थेचा एकलव्य गोरख हिवाळे म्हणाला, “स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली. तरी आपण विशेषतः युवक व त्यातही युवती स्वतंत्र आहोत का? अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आपल्यात हिंमत आहे का? आजकाल व्हीडीयो मॅार्फींग करून खोट्याचे खरे करून भासवतात. जो अपराध घडलाच नाही तो केल्याचा आरोप लावून; जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील उमर खालीद प्रमाणे वर्षोन् वर्षे तुरुंगात डांबवतात. मिडीया यावर गप्प बसत असेल तर आपल्यालाच सोशल मिडीयावर वापर करून सत्य सांगावे लागेल. सरकारला जाब विचारत रहाण्याची आपलीच जबाबदारी आहे”. 

सनिराज यादव या जर्नालिझमच्या विद्यार्थ्याने समर्पक उदाहरणातून तंत्रज्ञानाच्या वापराबाबत भाष्य केलं. “हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमात लोकांना रेल्वे गाडी सुरुवातीला लोखंडी राक्षस वाटला. लोकं गाडी पाहून घाबरले. रेल्वे ही आज मुंबई सारख्या शहरांची लाईफ - लाईन बनली आहे. आज आपणही एआय तंत्रज्ञानाला असेच घाबरत आहोत. तंत्रज्ञानाशी मैत्री करून युवकांनी विकास साधला पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जात. त्यामुळेच सरकारी शाळांमधील दुरावस्था आम्हांला सहन होत नाही”, असे त्यांने सांगितले. 

लोकवस्तीतील युवा कार्यकर्ते करण पडांगळे म्हणाले, “युवकांना आपले करीयर, रोजगार, उद्योजकता यासाठी आजचे शिक्षण पुरेसे पडत नाही. शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना त्यासाठी सक्षम बनवण्यात कमी पडतं आहे. शिक्षणाने युवकांना प्रश्न विचारण्याची शिकवण दिली आहे का? शिक्षणाची जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे त्या विरोधात आमची मागणी सर्वांना समान शिक्षण मिळावे, अशी आहे. जिल्हा परीषद शाळेत शिकणारा खाजगी वा खार्चिक शाळेतील शिकणाऱ्याशी निकोप स्पर्धा करू शकेल का?”

किशोर जाधव या पीएचडीच्या विद्यार्थ्याने, “आपल्या शाळा कारखाने बनल्या आहेत का? शिक्षणाने आपण सक्षम बनतोय का? असे विचारत शाळांकडे लक्ष देणें आवश्यक आहे. शाळांमध्ये दप्तर, पुस्तके, गणवेश वेळेवर मिळत नाही हे लक्षात आल्यावर, त्याबाबत माहितीचा अधिकार कायदेयान्वये एक चौकशी अर्ज टाकला आणि पुढच्या आठवड्यात सर्वांना वरील साहित्य मिळालं, हा अनुभव कथन केला. युवकांनी सभोवतालच्या सरकारी आस्थापनांच्या कामावर लक्ष ठेवून, कुठे कमतरता दिसल्यास आरटीआयचा वापर करण्याची सक्रीयता दाखवणे आवश्यक आहे. आपण केवळ ‘रील्स’ मध्ये अडकून न पडता सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर  ‘रियल’ हस्तक्षेप केला पाहीजे”, असे प्रतिपादन केले. 

चंद्रकांत रोकडे म्हणाले, “सर्व स्तरांवरील प्रगती, स्वच्छता याबाबत निव्वळ इतर देशांची उदाहरणं देऊन उपयोगाचे नाही. आपल्या देशाचे उदाहरण देता येईल असा देश उभारण्यासाठी आपण झटायला हवे”.  

अस्मिता गायकवाड या एकलव्य विद्यार्थिनीने सांगितले की, “सरकारी शाळांमधील स्वच्छता हा कळीचा मुद्दा बनला आहे. तिथली स्वच्छतागृहे, मध्यान्हभोजन योजनेची स्वयंपाकघरे येथे स्वच्छता नसल्याने मुलांना संसर्गजन्य रोगांचा सामना करावा लागतो. डॅाक्टरचा खर्च वाढतो. अभ्यासावर परिणाम होतो. याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे”. 

रोनित भिडे या महाविद्यालयीन युवकाने, “शालेय शिक्षक व महाविद्यालयीन प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आवश्यक आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपुलकीने समजावले जाईल व तेच खरे शिक्षण आहे”, यावर भर दिला! 

संस्थेचा एकलव्य कार्यकर्ता अजय भोसले म्हणाला, “आपले प्रश्न सोडवण्यासाठी युवकांनी दुसऱ्यांवर अवलंबून रहाणे योग्य नाही. फीया वाढतात. रेल्वे - बस मध्ये बसायला मिळत नाही. पेट्रोल भरले तर त्यात भेसळ आढळते. अशा मुद्द्यांवर तिथल्या तिथे प्रश्न विचारण्याची धमक युवकांमध्ये असायला हवी. आम्ही कर भरतो. आम्हांला सरकारकडून जबाबदेही हवी”! 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निनाद रावराणे, अजय पटेकर, कृष्णा किर्तीकर, रुपेश गायकवाड यांनी मेहनत घेतली.

विनीत, मीनल उत्तुरकर (9833113414)
विश्वस्त,  समता विचार प्रसारक संस्था


Sunday, 23 August 2026

शहाड येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी !!

शहाड येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी !!

*विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वह्या वाटपाने कार्यक्रमाची रंगत*

(महेंद्र उर्फ अण्णा पंडीत.)
*शहाड (कल्याण),* मातंग परिवर्तन संघ, कल्याण यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती महोत्सवानिमित्त मार्गदर्शन, वैचारिक प्रबोधन व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शहाड येथील मातोश्री कॉलेजमध्ये नुकताच मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक थोरात यांनी केले, तर सूत्रसंचालन मंगल मोरे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश कापरे सर, श्रमिक (मु.) पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष आणि अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस, मा. महेंद्र उर्फ अण्णा पंडीत उपस्थित होते. प्रमुख वक्त्या म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा डॉ. सुषमा बसवंत यांनी मार्गदर्शन केले. 

आपल्या मार्गदर्शनात डॉ. सुषमा बसवंत व डॉ. सुरेश कापरे यांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन, साहित्यिक योगदान आणि सामाजिक क्रांतीतील त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे कसे गरजेचे आहे यावर त्यांनी सविस्तर विचार मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ समाजसेवक व श्रमिक (मु.)पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष,सन्माननीय महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांनी भुषवले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात अण्णा पंडीत यांनी समाजावरील सामाजिक अत्याचारा संदर्भात भाष्य करुन समाजावर कोठेही अन्याय अत्याचार झाल्यास आपण सदैव अत्याचाराचा प्रतिकार करण्यास समाजासाठी उपलब्ध असु अशी ग्वाही दिली.तर विशेष अतिथी म्हणून समाजसेवक सुनील उतेकर उपस्थित होते.

*विद्यार्थ्यांचा सत्कार हा केंद्रबिंदू*
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थी गुणगौरव सोहळा होता. यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण घेऊन समाजात पुढे जाण्याचा सल्ला दिला. समाजाच्या प्रगतीसाठी छोटे-छोटे बदल स्वतःपासून सुरू करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.

तसेच लहान मुलांनी डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर सुंदर भाषणे केली, ज्याचे सर्वांनी कौतुक केले. शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वाटपही करण्यात आले.

*मान्यवरांची उपस्थिती*
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातोश्री कॉलेजचे किरण खिल्लारे यांनी मोलाचे सहकार्य करत हॉल उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष सोनवणे, मोहन साठे, विवेक लोखंडे, उत्तम भिसे, दीपक सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी दीपक काळे, गणेश साठे, नवनाथ सोनवणे, सुरेंद्र धोत्रे, सुनील भिसे, गुलाब भोंडवे, देवेंद्र मोरे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवटी विवेक लोखंडे सरांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शुभारंभ !!

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शुभारंभ !!

          अंमली पदार्थांची पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासोबतच अंमली पदार्थांची मागणीच निर्माण होऊ नये यासाठी व्यापक जनजागृती करणारी 'कॅम्पस कनेक्ट' ही नवी मुंबई पोलिसांनी हाती घेतलेली विशेष मोहीम अत्यंत महत्त्वाची व युवाशक्तीला दिशा देणारी असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
          व्यसनांच्या दलदलीत युवा पिढीने फसू नये यासाठी सजगतेने काम करण्यासोबतच व्यसनांच्या गर्दीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार न समजता त्यांना व्यसनमुक्ती केंद्राद्वारे मदतीचा हात देण्याची नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने पोलिसांनी हाती घेतलेली भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

          नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 'नशामुक्त नवी मुंबई अभियान' अंतर्गत 'कॅम्पस कनेक्ट' या विशेष मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने नवी मुंबई पोलीसांनी सुरू केलेल्या 'व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रा'चा शुभारंभ मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते डी वाय पाटील युनिव्हर्सिटी ऑफ एक्सलन्स, नेरूळ येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे तरुणाईच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत संपन्न झाला.
          याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना. श्री. गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. भरत गोगावले, बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधान परिषद सदस्य आ.श्री.रवींद्र फाटक, विधानपरिषद सदस्य आ.श्री. विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य आ.श्री. महेश बालदी, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री.अश्विन मुद्गल, कोकण विभागीय आयुक्त श्रीम. रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे, डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
          'कॅम्पस कनेक्ट' या विशेष मोहीमेच्या माध्यमातून नवी मुंबईतील प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हा नशा विरोधातील लढ्याचे केंद्र बनेल आणि प्रत्येक विद्यार्थी हा या मोहिमेचा सैनिक होईल असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय दुर्दैवाने व्यसनांच्या गर्तेत अडकलेल्या युवकांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी उपचार करणे आणि मानसिक आधार देण्याचे कामही केले जाणार आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानाद्वारे व्यसनमुक्ती विरोधी लढ्याला नवे बळ मिळेल असे ते म्हणाले.
          आज समाजात वाढते व्यसन आणि मानसिक ताणतणाव यांमुळे व्यसनमुक्ती केंद्राची गरज खूप वाढली आहे. विशेषत्वाने तरुणाई दारू, ड्रग्स आणि इतर घातक व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. व्यसनांमुळे शरीराचे नुकसान होतेच याशिवाय नैराश्य, भीती यामुळे मनाचे आणि भविष्याचेही मोठे नुकसान होते.
          त्यावर योग्य उपचारासाठी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची गरज लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सहयोगाने सीबीडी बेलापूर सेक्टर 8 येथील मदर तेरेसा इमारतीमध्ये ‘व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
          बांधिलकी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने या केंद्राचे परिचलन केले जाणार आहे. येथे पुनर्वसन कार्यक्रम, जीवन-कौशल्य उपक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षणाशी संबंधित उपक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम तसेच इतर रुग्ण-सहाय्यक कार्यक्रमांचे नियोजन व समन्वय केला जाणार आहे.
          पहिल्या टप्प्यात 11 रूग्णखाटा क्षमतेच्या या केंद्राद्वारे व्यसनातून सुटका करण्यासाठी आपुलकीचा आधार दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे समाजात पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी पुनर्वसनासाठी मदत केली जाणार आहे.
          याकरिता रुग्णाच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. तसेच विविध जनजागृती कार्यक्रम राबवून रुग्णाच्या पुनर्वसनासाठी आणि समाजात त्यांच्या पुनर्समावेशासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
          नवी मुंबई पोलीस विभागामार्फत सूचित केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिके मार्फत चालविल्या जाणाऱ्या या केंद्रात रुग्णाचा प्रवेश झाल्यानंतर, दैनंदिन रुग्ण समन्वय, त्यांच्या कुटुंबियांशी समन्वय, त्यांचे समुपदेशन, पुनर्वसन सहाय्य व फॉलो-अप उपक्रमांव्दारे कार्यवाही केली जाणार आहे.
          केंद्रात दाखल होणा-या रूग्णाच्या मानसिकतेचा विचार करून त्याच्या कलाने योग्य उपचार करण्याकरिता याठिकाणी कार्यरत कर्मचारी हे आवश्यक अर्हताधारक आणि प्रशिक्षित व अनुभवी असतील. त्या कर्मचा-यांनाही वेळोवेळी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल व पर्यवेक्षण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येईल.
          याठिकाणी अनुभवी मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist), अनुभवसंपन्न मानसशास्त्रज्ञ / समुपदेशक ( Psychologist / Counselor ) तसेच नर्सेस, वॉर्डबॉय आणि सुरक्षारक्षक असे कर्मचारी कार्यरत असतील. येथील व्यवस्थापनासाठी अनुभवी व्यवस्थापक कार्यरत राहील. 
          या केंद्रामध्ये अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार केले जातील तसेच मानसोपचार तज्ज्ञ (Psychiatrist) रुग्णाशी बोलून त्याच्या मनातील भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर करतील. येथे कॅरम, बुध्दीबळ अशा खेळांच्या सुविधांसोबतच मानसिक शांती, सकारात्मक विचार आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग, ध्यान आणि व्यायामाची सोय असणार आहे.
          या व्यसनमुक्ती सुविधा केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्त नवी मुंबई साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या सहयोगाने सामाजिक बांधिलकी जपत आहे.


विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अभियानाचा लाभ घे...