Saturday, 19 September 2026

लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट येथे गुंड प्रवृत्तीच्या अमोल प्रभाकर पालकरवर जातीवाचक शिवीगाळ, खंडणी व बदनामीचा गुन्हा दाखल; आरोपी फरार !!

लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट येथे गुंड प्रवृत्तीच्या अमोल प्रभाकर पालकरवर जातीवाचक शिवीगाळ, खंडणी व बदनामीचा गुन्हा दाखल; आरोपी फरार !!

.                      आरोपी अमोल पालकर 

*लोणार / किनगाव जट्ट :*

लोणार तालुक्यातील किनगाव जट्ट येथे दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या अमोल प्रभाकर पालकर याच्यावर जातीवाचक शिवीगाळ, खंडणी आणि बदनामीप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

किनगाव जट्ट येथील रहिवासी तथा 'लोणार टाइम्स' वृत्तपत्राचे संपादक समाधान तुकाराम मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अमोल प्रभाकर पालकर याची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे. तो वाळू तस्करीसह विविध अवैध व्यवसायातून पैसा कमावून कोणत्याही अधिकाऱ्याला जुमानत नाही. पैशाच्या जोरावर अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून दबाव टाकत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपीने गावातील सरपंच, पत्रकार तसेच सर्वसामान्य नागरिकांना सतत त्रास देत खंडणी उकळण्याचे प्रकार चालविल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीने CCTNS पोर्टलवर तक्रार केल्याच्या कारणावरून स्वतःच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल होऊ नये म्हणून पत्रकारांची व पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली. व्हॉट्सॲप ग्रुपवर फिर्यादीच्या जातीचा उल्लेख करून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. "या चिलर वार्ताहराला कोणी घाबरत नाही" असे म्हणत सार्वजनिक ठिकाणी व सोशल मीडियावर त्यांची मानहानी करून जातीय भावनेतून कमी लेखण्याचा प्रयत्न केला.

तसेच गावातील नागरिकांकडून, गरीब व विधवा महिलांच्या घरकुलाच्या पैशांवर डल्ला मारणे आणि पत्रकारांना खंडणीसाठी वेठीस धरण्याचे गंभीर कृत्य करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही आरोपी अमोल पालकर याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी बिबी पोलीस स्टेशन येथे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता नव्याने त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३५६(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा आणि पत्रकार संरक्षण कायदा २०२१ च्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Friday, 18 September 2026

🇮🇳 *हिंदी दिवस व ६ वे अखिल भारतीय राजभाषा संमेलनात नागरी संरक्षण दलाची उल्लेखनीय कामगिरी* !!!

🇮🇳 *हिंदी दिवस व ६ वे अखिल भारतीय राजभाषा संमेलनात नागरी संरक्षण दलाची उल्लेखनीय कामगिरी* !!!

नवी मुंबई, वाशी : केंद्र शासन गृह विभागाच्या वतीने हिंदी दिवस व ६ वे अखिल भारतीय राजभाषा संमेलन दि. १४ व १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या भव्य संमेलनासाठी देशाच्या विविध शहरांतून केंद्रीय अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार व उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सुरक्षा व इतर आवश्यक कर्तव्ये चोखपणे बजावली.

दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी भारताचे केंद्रीय गृहमंत्री मा. अमित भाई शहा यांनी दीप प्रज्वलित करुन संमेलनाचे उद्घाटन केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज्याचे मुख्यमञी, उपमुख्यमंञीसह अनेक आमदार व खासदार यांची कार्यक्रमास उपस्थिती लाभली. मा.केंद्रिय गृहमंञी महोदय यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षण दलाचे उपमुख्य क्षेत्ररक्षक, विभागीय क्षेत्ररक्षक, मानसेवी अधिकारी/पदाधिकारी व स्वयंसेवकांसह एकूण ४६ जणांनी आपले कर्तव्य चोख बजावले. तसेच सहा. उपनियंत्रक श्री.आननसिंग गढरी यांचीही उपस्थिती होती.

दि. १३ सप्टेंबर रोजी ५० नागरी संरक्षण स्वयंसेवक व मानसेवी अधिकारी/पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळी कर्तव्य बजावत संपूर्ण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या कर्तव्याची आणि नागरी संरक्षण दलाच्या कार्याची देशाच्या विविध शहरांतून आलेल्या सुमारे ७,००० हून अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत भव्य व्यासपीठावरून प्रशंसा करण्यात आली. या कौतुकामुळे कर्तव्य बजावणाऱ्या स्वयंसेवकांमध्ये आनंद व अभिमानाची भावना निर्माण झाली. आपल्या सेवेला मिळालेली ही पोहोचपावती असल्याची भावना स्वयंसेवकांनी व्यक्त केली.

नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी शिस्त, तत्परता, सेवाभाव आणि जबाबदारीचे उत्कृष्ट दर्शन घडवत या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

समारोपीय दिवस प्रंसगी मा.विजय जाधव, उपनियंञक, नागरी संरक्षण यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून तिन्ही दिवशी उत्कृष्ट कर्तव्य बजावल्याबद्दल सर्व नागरी संरक्षण स्वयंसेवक व पदाधिकारी यांना शाबासकीची थाप देऊन मार्गदर्शन केले.

Regards - DCCD, NMC, Thane.

वृत्त - विश्वनाथ राऊत सर 

Thursday, 17 September 2026

समेळपाडयात अनधिकृत बांधकामांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ..

समेळपाडयात अनधिकृत बांधकामांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ..

*सदनिका घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक*

नालासोपारा प्रतिनिधी – “अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा’, असे राज्यसरकारचे आदेश असतानाही महापालिका  यांच्याकडून कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे समेळपाड्यात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत असून, त्यामध्ये सदनिका घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे.

अनधिकृत बांधकामांमुळे समेळपाडा बकाल होत आहे. अनधिकृत बांधकामांवर वेळीच उपाययोजना न केल्याने दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत आहे. या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना ना कायद्याचे बंधन ना कुणाची भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे.
अनधिकृत बांधकामांमध्ये पार्किंगची सुविधा नसते. तसेच, रस्त्यासाठी आवश्‍यक ती मोकळी जागा सोडलेली नसते. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. अशा इमारतींन कडुन लाखो रुपये घेऊन महापालिकेकडून पाणीपुरवठा तसेच महावितरणकडून वीजेची जोडणी देण्यात येते. यावेळीही अधिकृत की अनधिकृत बांधकाम याची तपासणी संबंधित यंत्रणेकडून होताना दिसत नाही. कोणतीच यंत्रणा ही बाब गांभीर्याने पहात नसल्याने या अनधिकृत बांधकाम वाल्यांचे अधिक फावते.

अनधिकृत बांधकामे करताना नियम पायदळी, अनधिकृत बांधकामे करणाऱ्या व्यक्‍तींकडून कोणत्याच नियमांचे पालन केले जात नाही. 
आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ, अनधिकृत बांधकाम करणारी व्यक्‍ती ही बांधकाम लवकर पूर्ण करून ते विकून मोकळे होण्याच्या मार्गावर असते. त्यामुळे बांधकामाची गुणवत्ता राखली जात नाही. पर्यायाने अशा अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवावर अपघाताची टांगती तलवार कायम राहाते.
 यापूर्वी अनधिकृत बांधकामे उभारतानाच पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, इमारत पूर्ण झाल्यावर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे थोड्या आर्थिक फायद्यासाठी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्‍तींकडून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होताना दिसत आहे.

यासंदर्भात महापौर अजीव पाटील यांना निवेदन देऊन कारवाई ची मागणी करणार आहे कारवाई न झाल्यास प्रभाग समिती ई येथे ठिय्या आंदोलन करणार असल्याचे रुचिता नाईक यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन !!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन !!

उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) : देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण मानव सेवा संघाच्या वतीने आदिवासी  बांधवांसाठी स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी रा. जि. प. शाळा, डाऊरनगर, उरण येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

उरण मानव सेवा संघ ही संस्था उरण परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, शिक्षण, आरोग्य तसेच गरजू नागरिकांना मदत करण्याचे कार्य करत आहे. समाजात वावरताना गरजू बांधवांना आवश्यक ती मदत मिळावी, या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

उरण परिसरातील नागरिकांच्या विविध सामाजिक गरजा लक्षात घेऊन भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले

"माझ्यावरील आरोप खोटे आणि निराधार, हे राजकीय षडयंत्र' - माजी आमदार नरेंद्र पवार यांचे स्पष्टीकरण

'माझ्यावरील आरोप खोटे आणि निराधार, हे राजकीय षडयंत्र' - माजी आमदार नरेंद्र पवार यांचे स्पष्टीकरण

*कल्याण, प्रतिनिधी :* बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत त्यामागे सामाजिक आणि राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

"माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असून सत्य लवकरच समोर येईल. माझा भारतीय संविधान, कायदा आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे," असे पवार यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, "मी तपास यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करणार आहे. निष्पक्ष आणि सखोल तपासातून सत्य निश्चितपणे समोर येईल."

गेल्या काही दिवसांतील घटनाक्रमाकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, "मी ज्या भू-माफियाविरोधात आंदोलन करून आवाज उठवला होता, त्याच्याशी संबंधित व्यक्ती काल विरोधी पक्षातील लोकांसोबत पोलीस ठाण्यात उपस्थित असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यानंतर घडलेला घटनाक्रम पाहता माझ्या मनात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत."

"मी कोणावरही तथ्यहीन आरोप करू इच्छित नाही आणि तपास सुरू असताना अंतिम निष्कर्षही काढत नाही. मात्र, गेल्या काही दिवसांतील घडामोडी, त्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि त्यानंतर माझ्याविरोधात दाखल झालेले प्रकरण या सर्व बाबींची स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपणे चौकशी व्हावी," अशी मागणी त्यांनी केली.

"झालेले आरोप गंभीर असून माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी आहेत. निष्पक्ष तपासातून संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर स्पष्ट होईल, असा विश्वास आहे," असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Wednesday, 16 September 2026

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान !!

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान !!

२७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’

अभियानाचा लाभ घेण्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यात विशेष ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. शिवाय हे अभियान नियमित प्रत्येक तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी घेण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

या अभियानासाठी महसूल विभाग, योजनांशी संबंधित विविध शासकीय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कागदपत्रांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.

अभियानात आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी संबंधित यंत्रणा शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहेत.

शिबीरापूर्वी वस्तीस्तरावर लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विविध विभागांचे सक्षम अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.

अभियानाचे उद्घाटन संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. जिल्हाधिकारी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय साधतील. शिबिरांचे ठिकाण आणि वेळ याबाबतची माहिती संबंधित जिल्हा व तालुका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

#भटकेविमुक्त #हक्कआणिप्रमाणपत्र #विशेषअभियान #शासकीययोजना #जनसेवा #OBCBahujanWelfare #maharashtra #atulsave #VJNT #GovernmentSchemes #लोकसेवा

Tuesday, 15 September 2026

सरकारी फाईल्सच्या दिरंगाईला चाप; वेळेत काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार !!

सरकारी फाईल्सच्या दिरंगाईला चाप; वेळेत काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार !!

*मुंबई, प्रतिनिधी :* शासकीय कामकाजात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. 11 सप्टेंबर 2026 रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार, फाईल निकाली काढण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून विलंब करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहेत.

*फाईल निकाली काढण्यासाठी कालमर्यादा :*

🔹 *साधारण फाईल :* 7 कामकाजाच्या दिवसांपेक्षा जास्त प्रलंबित ठेवू नये.
🔹 *तात्काळ स्वरूपाची फाईल :* शक्य तितक्या जलद, एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत निकाली काढावी.
🔹 *तातडीच्या स्वरूपाची फाईल :* 4 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा.
🔹 *इतर विभागाकडे पाठवण्याची गरज नसलेली फाईल :* 25 दिवसांच्या आत निर्णय घ्यावा.
🔹 *इतर विभागाकडे विचारार्थ पाठवायची फाईल :* 3 महिन्यांच्या आत कार्यवाही पूर्ण करावी.

*विलंब झाल्यास कारवाई*
विहित कालमर्यादेत कार्यवाही न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 नुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

सर्व विभागप्रमुख आणि कार्यालयप्रमुखांनी दरमहा प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन जलद निपटारा करावा, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

नालासोपारातील साई जिवदानी उत्सव मंडळाने साकारले वृंदावन! श्री कृष्णाची मनमोहक गणेश मूर्ती ठरत आहे सर्वांचे आकर्षक....

नालासोपारातील साई जिवदानी उत्सव मंडळाने साकारले वृंदावन! श्री कृष्णाची मनमोहक गणेश मूर्ती ठरत आहे सर्वांचे आकर्षक.... *बहुजन विकास आघाडीचा र...