Tuesday, 8 September 2026

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

*कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर २०२६ :*

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र खाजगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६’ च्या प्रारूप मसुद्यावर राज्यभरातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दि. ०७ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत ‘जाहीर प्रकटन’ काढून हरकती व सूचना नोंदवण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६, सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत वाढविल्याचे घोषित केले आहे. शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, दि. ०७ सप्टेंबरपर्यंत राज्यभरातून ११ हजार ४१० अधिकृत सूचना व हरकती नोंदवण्यात आल्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर प्रकटनानुसार, या मसुद्यावर प्रारंभी दि. ०४ सप्टेंबर २०२६ पर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. मात्र, अवघ्या काही दिवसांत राज्यभरातील शिक्षक, क्लास चालक, पालक व विद्यार्थ्यांकडून तब्बल ११,४१० लेखी हरकती व ई-मेल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले. हरकतींचा हा वाढता ओघ आणि विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन शासनाने ही मुदत आता १५ सप्टेंबरपर्यंत वाढवून दिली असून, नागरिकांनी *doesecondary1@gmail.com* या अधिकृत ई-मेलवर आपली निवेदने सादर करण्याचे आवाहन केले आहे.

*"कायद्याला नव्हे, तर जाचक व अव्यवहार्य अटींना विरोध"*

या मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर, खाजगी कोचिंग क्लास संरक्षण महा-अभियानचे डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी ठाम भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, "खाजगी शिक्षण व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी नियमन हवेच; आमचा संपूर्ण कायद्याला किंवा शासनाच्या भूमिकेला अजिबात विरोध नाही. मात्र, मसुद्यातील ज्या तरतुदी अत्यंत जाचक, अव्यवहार्य आणि भारतीय संविधानाच्या कलम १४, १९(१)(g) आणि २१ च्या चौकटीत बसत नाहीत, त्यांना आमचा ठाम कायदेशीर आक्षेप आहे. किरकोळ त्रुटींसाठी १० ते ५० लाखांचा अवाजवी दंड, लहान शिक्षकांनाही वेठीस धरणारी २५ विद्यार्थ्यांची मर्यादा, दाट वस्तीत भाड्याच्या जागेत १ चौ.मी. जागा व स्वतंत्र पार्किंगची अशक्य सक्ती आणि १३ वर्षांखालील मुलांच्या शिकवणीवर थेट बंदी यामुळे ग्रामीण व मध्यमवर्गीय शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होईल. शासनाने मुदतवाढ देऊन सकारात्मक पाऊल उचलले आहे, आता या जाचक अटी शिथिल करून सुटसुटीत धोरण आखावे, हीच आमची सनदशीर मागणी आहे."

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. दीपक खोत यांनी स्पष्ट केले की, "शासनाने दिलेली मुदतवाढ हा खाजगी शिक्षक व पालकांच्या एकजुटीचा पहिला सकारात्मक विजय आहे. शासनाने अधिकृतपणे ११ हजारांहून अधिक हरकतींची नोंद घेतली असली, तरी प्रत्यक्ष ई-मेल व निवेदनांची संख्या याहूनही मोठी आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीतून आम्ही हा लढा आणखी तीव्र आणि व्यापक करणार आहोत."

शासनाने हरकती नोंदवण्यासाठी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत वाढवून दिल्याने, जे क्लास संचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी तांत्रिक कारणामुळे आपली हरकत नोंदवू शकले नव्हते, त्यांना आता दुसरी संधी मिळाली आहे. या वाढीव वेळेत जास्तीत जास्त हरकती नोंदवून लोकशाही मार्गाने आपला विरोध दर्शवण्याचे आवाहन संघटनांकडून करण्यात येत आहे. आता शासन या ११ हजारांहून अधिक हरकतींचे परीक्षण करून मसुद्यात नेमके काय बदल करते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Monday, 7 September 2026

कल्याण रेल्वे पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश; ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या ५ आरोपींना अटक !!

कल्याण रेल्वे पोलिसांकडून आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश; ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या ५ आरोपींना अटक !!

*कल्याण, महेंद्र (अण्णा) पंडित 

कल्याण रेल्वे पोलिसांनी ओडिशा ते गोवा गांजा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश करत ५ आरोपींना अटक केली आहे.

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ६८२/२०२६, कलम ८(c), २०(b)(ii)(C) व २९, NDPS Act, १९८५ अन्वये दिनांक ०१/०६/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपी निक्कीकुमार हरदेव शाह (वय १९ वर्षे, रा. बेगुसराई, बिहार) व कुलदीप राजू महतो मंडल (वय २६ वर्षे, रा. बेगुसराई, बिहार) यांच्याकडून कोणार्क एक्स्प्रेसच्या डब्यातून एकूण २१.९५ किलो गांजा (Commercial Quantity) विक्रीसाठी वाहतूक करीत असताना जप्त करण्यात आला होता.

सदर आरोपींकडे कसून चौकशी व तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त केली असता, सदर गांजा हा ओडिशा राज्यातून आणून गोवा राज्यात पुरवठा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

सदर गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी वपोनी अर्चना दुसाने, कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विठ्ठल वाणी यांच्या नेतृत्वात विशेष पथक गठीत करण्यात आले.

*गोवा राज्यात तपास व आरोपीस अटक :*

तपासादरम्यान आरोपींचे जबाब, मोबाईल CDR, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण, बँकेचे आर्थिक व्यवहार तसेच इतर उपलब्ध पुराव्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले.

दिनांक १८/०७/२०२६ ते २२/०७/२०२६ या कालावधीत विशेष पथकाने गोवा राज्यात जाऊन तपास केला. Maina Curtorim Police Station, South Goa येथील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने तपासाची पुढील कार्यवाही करण्यात आली.

तपासात अटक आरोपींकडून सदर गांजा हा गोवा राज्यातील आशरोफ सुनार खान (वय २१ वर्षे, रा. दक्षिण गोवा) याला पुरवठा करण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मोबाईल लोकेशन व तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्यास मडगाव, गोवा येथून अटक करण्यात आली. आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून सदर आरोपीस कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणून PCR घेण्यात आला.

*ओडिशा राज्यातील गांजा पुरवठादारांचा शोध :*

गोवा येथील आरोपीकडून प्राप्त माहिती व तांत्रिक तपासातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गांजाचा मूळ पुरवठादार शोधण्यासाठी विशेष पथकाने दिनांक २४/०७/२०२६ ते ३१/०७/२०२६ या कालावधीत कंधमाल जिल्हा, ओडिशा येथे जाऊन तपास केला.

Daringbadi Police Station, Odisha येथील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने तपासाची कार्यवाही करण्यात आली. तपासात अटक आरोपींनी सदर गांजा हा विद्याधर लक्ष्मीधर नायक (वय ४३ वर्षे, रा. दंडीमहा, पो. सरनिकेता, जि. कंधमाल, ओडिशा) यांच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

पुढील तपासात विद्याधर लक्ष्मीधर नायक याने सदर गांजा हा जंगल परिसरात गांजाची शेती करणारा श्रीकांत मंदार प्रधान (वय ३८ वर्षे, रा. सुजामाजु, ता. डांरींगबाडी, जि. कंधमाल, ओडिशा) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

श्रीकांत मंदार प्रधान हा अतिदुर्गम जंगल परिसरात राहत असून सदर भाग नक्षलप्रभावित क्षेत्रात येत असल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक होते. तथापि, स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने विशेष पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने तपास करून त्याचा शोध घेतला व त्यास अटक करण्यात यश मिळविले.

दोन्ही आरोपींना JMFC Court, Daringbadi, Odisha येथे हजर केले असता मा. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ०५ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर दोन्ही आरोपींना कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून त्यांचा पोलीस कोठडी रिमांड (PCR) घेण्यात आला आहे.

*आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा उलगडा :*

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत एकूण ०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींचे जबाब, मोबाईल CDR, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण, आर्थिक व्यवहार व इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे ओडिशा → गोवा → महाराष्ट्र या मार्गावरील आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा महत्त्वपूर्ण उलगडा करण्यात आला आहे. गांजाचा स्रोत, पुरवठादार, मध्यस्थ व प्राप्तकर्ता यांच्यातील परस्पर संबंध उघडकीस आणण्यात यश आले असून, या गुन्ह्याशी संबंधित इतर व्यक्ती, आर्थिक व्यवहार व तस्करीच्या नेटवर्कबाबत पुढील तपास सुरू आहे.

सदर तपासादरम्यान महाराष्ट्र, गोवा व ओडिशा या तीन राज्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन स्थानिक पोलिसांशी समन्वय साधत तपास करण्यात आला. विशेषतः ओडिशा राज्यातील अतिदुर्गम व नक्षलप्रभावित जंगल परिसरात प्रतिकूल परिस्थितीत नियोजनबद्ध व धाडसी पद्धतीने कारवाई करून गांजा पुरवठा साखळीतील महत्त्वाच्या आरोपींपर्यंत पोहोचण्यात विशेष पथकास यश आले.

सदर संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, श्री. राकेश कलासागर, मा. पोलीस उपायुक्त श्रीमती प्रज्ञा जेडगे व मा. पोलीस उपायुक्त श्रीमती निलिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

*विशेष पथक -*
१. वपोनी अर्चना दुसाने 
२. पोनी कैलास रामदास वानखडे 
३. सपोनी विठ्ठल किसन वाणी 
४. पोहेवा/३२७३ अमित अशोक बडेकर 
५. पोहेवा/२२०६ हेमंत राजेंद्र पाटील 
६. पोशि/६३३ अमोल मोठाभाऊ सूर्यवंशी 
७. पोशि/१७३७ अंकुश व्यंकट धायगोडे

या अधिकारी व अंमलदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परस्पर समन्वयाने तसेच महाराष्ट्र, गोवा व ओडिशा राज्यातील स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

कल्याण लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई; ओडिशा-गोवा-महाराष्ट्र आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश, 05 जणांना अटक !!

कल्याण लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई; ओडिशा-गोवा-महाराष्ट्र आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश, 05 जणांना अटक !!

*प्रतिनिधी/पत्रकार (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत)*
*कल्याण. -* कल्याण रेल्वे पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ओडिशा राज्यातून गांजा आणून गोवा आणि महाराष्ट्रात पुरवठा करणाऱ्या टोळीतील 05 आरोपींना पोलिसांनी महाराष्ट्र, गोवा आणि ओडिशाच्या नक्षलप्रभावित जंगलातून शोधमोहीम राबवून अटक केली आहे.

*कोणार्क एक्सप्रेसमध्ये 21.95 किलो गांजा जप्त*

कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 682/2026, कलम 8(c), 20(b)(ii)(C) व 29 NDPS Act 1985 अन्वये दिनांक 01/06/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्यात कोणार्क एक्सप्रेसच्या डब्यातून प्रवास करणारे दोन आरोपी - *निक्कीकुमार हरदेव शाह (वय 19, रा. बेगुसराई, बिहार)* आणि *कुलदीप राजू महतो मंडल (वय 26, रा. बेगुसराई, बिहार)* यांच्याकडून पोलिसांनी *21.95 किलो गांजा (Commercial Quantity)* जप्त केला होता. हा गांजा ते विक्रीसाठी घेऊन जात होते.

*तांत्रिक तपासातून ओडिशा ते गोवा कनेक्शन उघड*

अटक आरोपींकडे कसून चौकशी आणि मोबाईल CDR, लोकेशन, बँक व्यवहारांच्या तांत्रिक विश्लेषणातून हा गांजा ओडिशा राज्यातून आणून गोवा राज्यात पुरवठा करण्यासाठी नेला जात असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल वाणी यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन करण्यात आले.

*पहिली कारवाई - गोव्यातून मुख्य खरेदीदाराला अटक*

दि. 18/07/2026 ते 22/07/2026 या कालावधीत विशेष पथकाने गोवा राज्यात जाऊन तपास केला. Maina Curtorim Police Station, South Goa येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा गांजा गोव्यातील *आशरोफ सुनार खान (वय 21, रा. दक्षिण गोवा)* याला पुरवठा केला जाणार असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मोबाईल लोकेशनवरून शोध घेऊन त्याला मडगाव, गोवा येथून अटक करण्यात आली आणि कल्याणला आणून त्याची पोलीस कोठडी (PCR) घेण्यात आली.

*दुसरी कारवाई - ओडिशाच्या नक्षलग्रस्त जंगलातून पुरवठादार जेरबंद*

गोवा येथील आरोपीकडून मिळालेल्या माहितीवरून गांजाचा मूळ स्रोत शोधण्यासाठी विशेष पथकाने दि. 24/07/2026 ते 31/07/2026 दरम्यान ओडिशा राज्यातील कंधमाल जिल्ह्यात तपास मोहीम राबवली. Daringbadi Police Station च्या सहकार्याने तपास करताना अटक आरोपींनी हा गांजा *विद्याधर लक्ष्मीधर नायक (वय 43, रा. दंडीमहा, पो. सरनिकेता, जि. कंधमाल, ओडिशा)* याच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गांजा जंगल परिसरात गांजाची शेती करणाऱ्या *श्रीकांत मंदार प्रधान (वय 38, रा. सुजामाजु, ता. दारिंगबाली, जि. कंधमाल, ओडिशा)* याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

श्रीकांत प्रधान हा अतिदुर्गम जंगल परिसरात राहत असून सदर भाग नक्षलप्रभावित क्षेत्रात येत असल्याने त्याचा शोध घेणे मोठे आव्हानात्मक होते. मात्र स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने कारवाई करून पथकाने त्यालाही अटक करण्यात यश मिळवले.

दोन्ही आरोपींना JMFC Court, Daringbadi, Odisha येथे हजर केले असता न्यायालयाने 05 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर दोघांनाही कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आणून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

*साखळीचा उलगडा*

या तपासात आतापर्यंत एकूण 05 आरोपींना अटक करण्यात आली असून *ओडिशा → गोवा → महाराष्ट्र* या मार्गावरील आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या साखळीचा महत्त्वपूर्ण उलगडा झाला आहे. गांजाचा स्रोत, पुरवठादार, मध्यस्थ आणि प्राप्तकर्ता यांच्यातील संबंध उघड झाले असून या नेटवर्कमधील इतर व्यक्ती आणि आर्थिक व्यवहारांबाबत पुढील तपास सुरू आहे.

*वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि विशेष पथक*

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई श्री. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त श्रीमती प्रज्ञा जेडगे आणि पोलीस उपायुक्त श्रीमती निलिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, पोलीस निरीक्षक कैलास रामदास वानखडे, सपोनि विठ्ठल किसन वाणी, पोहेवा/3273 अमित अशोक बडेकर, पोहेवा/2206 हेमंत राजेंद्र पाटील, पोशि/633 अमोल मोठाभाऊ सूर्यवंशी, पोशि/1737 अंकुश व्यंकट धायगोडे यांनी सहभाग घेतला.

तीन राज्यांमध्ये जाऊन, स्थानिक पोलिसांशी समन्वय साधत आणि विशेषतः नक्षलप्रभावित दुर्गम जंगलात प्रतिकूल परिस्थितीतही या पथकाने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

*भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्कार !!

*भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून राष्ट्रीय पुरस्कार !!

*शिक्षण अन् पाककलेतील १३ गुणवंतांचा मुंबईत दिमाखदार गौरव*

मुंबई, पी. डी. पाटील 
गेल्या २४ वर्षांपासून शिक्षण, प्रशिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात अग्रगण्य स्थान टिकवून असणाऱ्या ‘भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई’ या मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने गुरुवार दि. ३ सप्टेंबर रोजी एक भव्य व दिमाखदार राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. दादर (पश्चिम) येथील ‘गुरुकुल सभागृह’ येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संपन्न झालेल्या या सोहळ्यात शिक्षण आणि पाककला या क्षेत्रांत अद्वितीय व उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील १३ गुणवंतांना राष्ट्रीय स्तरावरील विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये पाककलेच्या क्षेत्रात दीर्घकाळ विविध प्रयोग करून या कलेला नवी उंची मिळवून देणाऱ्या गृहिणींचा ‘अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला, तर शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल विशेष ‘ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त गुणवंतांची यादी -

अन्नपूर्णा रससिद्धी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२६ (१२ विजेत्या) :
 * सौ. स्वाती सतीश श्रीवर्धनकर
 * सौ. स्वाती ऐलेश जोशी
 * सौ. भावना खंडारे
 * सौ. मनीषा सचिन पाळेकर
 * सौ. तृप्ती सगुण माणगावकर
 * सौ. नीता जितेंद्र पाठारे
 * अरुणा गोपाळ चरपे
 * सौ. वंदना सुनील भुजाडे
 * सौ. रत्नप्रभा सुधाकर सानप
 * सौ. मोहिनी मोहित घरत
 * सौ. भाविका भरत गोंधळी
 * वैशाली संतोष सुतार

ब्रह्मवादिनी गार्गी राष्ट्रीय शिक्षण सन्मान पुरस्कार २०२६ - * सौ. रंजना राजेंद्र शिंदे (शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य कार्याबद्दल)

संस्थेची २४ वर्षांची उज्ज्वल परंपरा
२००३ सालापासून मुंबई, पुणे व संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था ही स्वतः उच्चविद्याविभूषित असलेले अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद सर यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली निरंतर सामाजिक व शैक्षणिक कार्य करत आहे. ही संस्था शिक्षण, आरोग्य, योग, निसर्गोपचार, कृषी, देशी गो-संवर्धन, वृक्ष संवर्धन व साहित्य या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करते. तसेच संस्थेमार्फत वैदिक वास्तू, डाऊझिंग आणि विविध वैकल्पिक शास्त्रांचे शासनमान्य प्रशिक्षण दिले जाते.

शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान आणि पाककलेच्या माध्यमातून जपलेली पारंपरिक व आधुनिक संस्कृती या दोन्ही क्षेत्रांतील गुणवंतांच्या अद्वितीय कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या प्रसिद्धी प्रमुखांनी दिली.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद सर यांच्यासह श्री शिवपद्म वडाळकर, डॉ. चंद्रमोहन विष्णू रानडे, मा. सौ. सुनीता पाटील, ज्येष्ठ शिक्षिका नंदाताई शिंगरे, हिलर प्रा. भाऊ म्हात्रे, श्री मनोज वैद्य, हिलर सचिन तावरे, श्री संदेश कदम आणि शिक्षिका सौ. भावना खंडारे, श्री. आर. विजयसिंह यांचे विशेष सहकार्य व योगदान लाभले. उपस्थितांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले.

सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये अश्लील गाणी आणि आक्षेपार्ह व्हिडिओंवर बंदी घाला; शिवसेना (UBT) नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये अश्लील गाणी आणि आक्षेपार्ह व्हिडिओंवर बंदी घाला; शिवसेना (UBT) नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

*मुंबई, प्रतिनिधी :* गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक मंडळांमध्ये अश्लील गाणी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राष्ट्रीय संघटक अरुण तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

काही सार्वजनिक मंडळांमध्ये तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अश्लील गाणी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवले जात आहेत. याचा लहान मुले आणि युवकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अशा प्रकारच्या गतिविधींमुळे महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाण्यांच्या प्रसारणावर प्रतिबंध घालावा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणी अरुण तिवारी यांनी केली आहे.

युथ फॉर एज्युकेशन आणि सीजेपीकडून मनपा शाळांच्या सर्वेक्षण अहवालाचे महापौरांकडे सादरीकरण !!

युथ फॉर एज्युकेशन आणि सीजेपीकडून मनपा शाळांच्या सर्वेक्षण अहवालाचे महापौरांकडे सादरीकरण !!

*कल्याण-डोंबिवली, ७ सप्टेंबर २०२६ :*

युथ फॉर एज्युकेशन या संस्थेच्या शिष्टमंडळाने आज कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर सौ. हर्षाली थाविल-चौधरी यांची भेट घेऊन महानगरपालिका प्राथमिक शाळांमध्ये करण्यात आलेल्या प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षणातील निष्कर्ष सादर केले.

या सर्वेक्षणामध्ये महानगरपालिका हद्दीतील पाच प्राथमिक शाळांचा समावेश करण्यात आला होता :

१. क्रांतिवीर भगतसिंग प्राथमिक विद्यालय
२. आनंदीबाई जोशी प्राथमिक विद्यालय
३. उस्ताद बंदे अली खान उर्दू माध्यम शाळा
४. महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय
५. सोनुभाऊ बसवंत प्राथमिक विद्यालय

शाळांमधील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच जुन्या इमारतींची संरचनात्मक सुरक्षितता याबाबत सर्वेक्षणात आढळलेल्या बाबी महापौरांसमोर मांडण्यात आल्या.

विशेषतः आनंदीबाई जोशी प्राथमिक विद्यालयाजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसविणे व सुरक्षित पादचारी मार्गाची व्यवस्था करणे, शाळांमधील पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता व गाळ काढणे, शाळांसाठी नियमित व स्वतंत्र स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून देणे तसेच जुन्या व जीर्ण इमारतींची संरचनात्मक तपासणी करून घेणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्याची माहिती ॲड. अक्षय पाठक यांनी दिली.

या विषयावर महापौरांसोबत सविस्तर चर्चा झाली. महापौर सौ. हर्षाली चौधरी यांनी सर्वेक्षणातील निष्कर्षांची गांभीर्याने दखल घेत संबंधित महानगरपालिका विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत तातडीने निर्देश देण्याचे आश्वासन दिले. त्यामध्ये शाळांजवळील वाहतूक सुरक्षितता, पाण्याच्या टाक्यांची पाहणी व स्वच्छता आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेत सुधारणा यांचा समावेश आहे.

या सर्व मागण्यांबाबत महानगरपालिका आयुक्त कार्यालयाकडेही स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले असून, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती ॲड. आकाश वेदक यांनी दिली.

आजच्या या भेटीदरम्यान युथ फॉर एज्युकेशन तर्फे शुभम शिंदे, ओंकार जाधव, गायत्री गावंडे, मिली साहो, विपुल इंगोले, प्रज्वल वरडकर आणि सिद्धेश बाविसकर हे सदस्य उपस्थित होते.

महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी युथ फॉर एज्युकेशन सातत्याने सकारात्मक व रचनात्मक पद्धतीने कार्यरत राहणार आहे, असे युथ फॉर एज्युकेशनच्या पूजा मीठ भावकार यांनी सांगितले.


अधिक माहितीसाठी -
ॲड. आकाश वेदक 
९९३००१३९२६ 

ॲड. अक्षय पाठक 
८९७६२३५४९८

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना !!

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना !!

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : रविवार दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उरण तालुक्यातील विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न वि. का. सहकारी संस्था मर्यादित विंधणे कोळीवाडा या सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ मोठे उत्साहात कुलदैवत मंदिरासमोरील पटांगणात पार पाडला.

कोळीवाड्यातील स्थानिक मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व गोरगरीब मच्छीमारांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दिघोडे कांदळवन समितीचे अध्यक्ष व पारंपारिक मच्छीमार संस्थेचे सेक्रेटरी प्रितेश काशिनाथ कोळी यांच्या प्रास्ताविक पर भाषणाने झाले त्यामध्ये त्यांनी संस्थेच्या स्थापनेच्या उद्देश आणि रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.

या भव्य कार्यक्रमासाठी उद्घाटक व मार्गदर्शक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पारंपरिक मच्छिमार बचाव व सामाजिक कृती समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभ्यासक  रमेश भास्कर कोळी यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित मच्छीमार बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले व संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गव्हाण सहकारी संस्थेचे चेअरमन हितेश कोळी हे देखील आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मच्छीमारांच्या सहकार्याबद्दल महत्त्वाचे विचार मांडले व कोळी बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना विषयी मार्गदर्शन केले तसेच दिघोडे पारंपारिक मच्छीमार संस्थेचे चेअरमन अशोक कोळी, कुंडेगाव सहकारी संस्थेचे पदाधिकारी भानुदास कोळी, तानाजी कोळी,गव्हाण मच्छिमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी भरत कोळी, प्रकाश कोळी, वैभव कोळी या सोहळ्याला उपस्थित राहून संस्थेला मार्गदर्शन करून पाठबळ दिले.

विंधणे खालचा पाडा गावचे अध्यक्ष कृष्णा माळी,  माजी ग्रामपंचायत सदस्य मनीषा कोळी, संस्थेचे सचिव आशिष कोळी, संस्थेचे खजिनदार शैलेश कोळी, संस्थेतील पदाधिकारी कृष्णा कोळी, सतीश कोळी, पंकज कोळी,आर्यन कोळी,संतोष कोळी, विनोद कोळी,राजेश कोळी, विनायक कोळी,अर्चना कोळी, धनश्री  कोळी, शर्मिला कोळी,अस्मिता कोळी, उज्वला कोळी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सदस्य यासोबतच गावचे ग्रामस्थ पदाधिकारी व परिसरातील मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण व नेटके सूत्रसंचालन रुपेश पाटील सर यांनी आपल्या सुमधुर वाणीतून  संपूर्ण सोहळ्यात रंगत आणली. विंधणे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक चेअरमन सुनील बाळाराम कोळी यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे व जमलेल्या ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. विंधणे कोळीवाडा येथे पार पडलेल्या या यशस्वी सोहळ्यामुळे परिसरातील मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न !!

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न !!

सत्यनारायण महापूजा, स्नेहमेळावा, गुणवंतांचा सन्मान अन् खानदेशी मनोरंजनाची मेजवानी.

खान्देश विकास मंडळ तर्फे आयोजित विविध उपक्रमांना उत्तम प्रतिसाद.

उरण, दि. ७  (विठ्ठल ममताबादे) — “नाते मातीशी” या भावनेला केंद्रस्थानी ठेवत खान्देश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘खान्देश महोत्सव २०२६’ हा विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि स्नेहपूर्ण उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उरण येथील भारती बँक्वेट हॉल, करंजा रोड येथे झालेल्या या कार्यक्रमाला खानदेशी समाजबांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात सत्यनारायण महापूजा, स्नेहमेळावा, सामूहिक भोजन तसेच विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खान्देशातून सेवामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा, खान्देशी डॉक्टरांचा तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार  महेशशेठ बालदी, जेएनपीटीच्या जनरल मॅनेजर (एडमिन) मनीषा जाधव, लहास ग्रीन इंडिया प्रा. लि.चे डायरेक्टर गुलाबराव जाधव, माजी खासदार संजीवजी नाईक यांच्या पत्नी कल्पना संजीवजी नाईक, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  जगदीश शेलकर, पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती  मधु दौलतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या (उरण)  प्रेरणा जितेंद्र घरत, मोरा-उरणचे पोलीस निरीक्षक (क्राईम) राहुल काटवानी, कोपरखैरणे (नवी मुंबई) नगरसेविका मिनाक्षी किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य (उरण)  कैलास मोरेश्वर भोईर, नवजीवन लोक विकास संस्थेचे (कल्याण) अध्यक्ष किशोर तुमडू पाटील, तसेच गाडी लोहार समाज उन्नती मंडळ (कल्याण)चे अध्यक्ष ऍड.युवराज मुरार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विशेष उपस्थिती म्हणून ‘महाराष्ट्र ट्रीपल केसरी’ तथा महाराष्ट्राचे ‘सिंघम’ म्हणून सुपरिचित असलेले पैलवान तथा न्हावा शेवा पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य (भाजप) तथा उरण नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष रवीशेठ भोईर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमादरम्यान खान्देशी हास्यकलाकार, नकलाकार व निवेदक-अभिनेते  विलासकुमार शिरसाठ यांच्या विशेष खान्देशी मनोरंजन कार्यक्रमाने उपस्थितांची चांगलीच करमणूक केली.

या महोत्सवाच्या आयोजनामध्ये खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष  प्रकाश चित्ते, कार्याध्यक्ष सुनील चौधरी, सचिव सचिन खैरनार, उपाध्यक्ष आनंद कुमावत, खजिनदार  वामनराव राठोड, सदस्य  भरत पाटील, महिला सदस्य जयश्री महाजन, सभासद  डॉ. रविंद्र पाटील,  दुर्गेश महाले, रविंद्र सूर्यवंशी,  ईश्वर माळी, विजय नगराळे, उपाध्यक्ष  कैलास भामरे, सल्लागार  संजय पाटील, सदस्य संदीप पाटील, महिला सदस्य राजश्री मोरे, सभासद सुनील झोपे, दिनेश पाटील,  भगवान राठोड,  गोकुळ धाडी आणि मनोज चव्हाण यांचा सहभाग राहिला. दुपारनंतर उपस्थितांसाठी सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून खान्देशी समाजबांधवांनी आपली संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश दिला.खान्देश विकास मंडळ, उरण हे नोंदणीकृत मंडळ असून या मंडळातर्फे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात आला.

एकूणच ‘नाते मातीशी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा हा खानदेश महोत्सव २०२६ सामाजिक एकोपा, संस्कृती आणि स्नेहाचा सुंदर संगम ठरला. मान्यवरांची उपस्थिती, गुणवंत व ज्येष्ठांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक भोजन आदी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाले.

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र’; कामगिरीवर ठरणार अधिकाऱ्यांची पुढची जबाबदारी !!

आरोग्य मंत्र्यांचा ‘परफॉर्मन्स मंत्र’; कामगिरीवर ठरणार अधिकाऱ्यांची पुढची जबाबदारी !!

> जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे दरवर्षी गुणांकन; उत्कृष्ट काम करणाऱ्यांना संधी, नियुक्त्यांमध्येही गुणवत्तेला प्राधान्य.

बुलढाणा प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीच्या आधारे अधिकाऱ्यांना संधी देण्याची नवी कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून, मागील तीन वर्षांतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच पुढील तीन वर्षात काय करणार याचे नियोजन याचा भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळीही केला जाणार आहे.

या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात केवळ सेवाज्येष्ठतेला नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरी, नेतृत्वक्षमता, रुग्णसेवा, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला महत्त्व मिळणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या क्षमतेनुसार जबाबदारी देण्याची संधी उपलब्ध होणार असल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासही मदत होणार आहे.

 तीन वर्षांच्या कामगिरीचा ‘रिपोर्ट कार्ड’: 
३१ मार्च २०२६ रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची माहिती अद्ययावत करून त्यांचे गुणांकन केले जाणार आहे. सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांतील पदावरील कामकाजाचा विचार करून एकूण १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
या गुणांकनानुसार अधिकाऱ्यांचे अ, ब ,क ,ड  अश्या चार श्रेणींत वर्गीकरण केले जाणार आहे. म्हणजेच, तीन वर्षांची कामगिरी आता अधिकाऱ्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. व दरवर्षी असे गुणांकन केले जाणार आहे.

 रुग्णसेवेपासून डिजिटल कामकाजापर्यंत ११कसोट्या: 
अधिकाऱ्यांचे गुणांकन करताना केवळ कागदोपत्री कामकाजाचा विचार न करता जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

लोकाभिमुखता आणि तक्रार निवारणापासून सुरुवात करून नेतृत्वगुण, विशेष कौशल्य, प्रशिक्षण व संवादकौशल्य यांचा विचार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन, राज्य लेखाशीर्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि CSR निधीचा प्रभावी वापर यासाठी केलेले आर्थिक व्यवस्थापनही तपासले जाणार आहे.

आरोग्य संस्थांमध्ये आहार, औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेली कार्यवाहीही गुणांकनाचा भाग असेल. अधिनस्त रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील मनुष्यबळाचे व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार व अपघातांच्या काळातील कामगिरीलाही महत्त्व दिले जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रमांची अंमलबजावणी, शासनाच्या विशेष अभियानांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’, अरुणोदय-सिकलसेलमुक्त महाराष्ट्र, पॅलेटिव्ह केअर अभियान, कर्करोगमुक्त महाराष्ट्र यांसारख्या उपक्रमांतील योगदानाचाही विचार केला जाणार आहे.

त्यासोबतच आयुष्मान भारत कार्ड, आरोग्य विभागाच्या विविध पोर्टलवरील माहिती अद्ययावत करणे,महाकर्मी पोर्टलवरील कामकाज, तसेच एकत्रित आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी या डिजिटल व योजनाधारित कामगिरीलाही गुण दिले जाणार आहेत.याच बरोबर पुढील तीन वर्षात  कार्याचे काय नियोजन असणार आहे याचाही विचार केला जाणार आहे .

 गुणवत्तेसोबत सचोटीलाही तितकेच महत्त्व: 
अधिकाऱ्यांच्या नामनिर्देशनासाठीही स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील आणि किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित अथवा प्रस्तावित नसणे, अपहाराच्या प्रकरणात सहभाग नसणे आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नसणे आवश्यक आहे.

उत्कृष्ट चारित्र्य आणि निर्विवाद सचोटी हा देखील नामनिर्देशनाचा महत्त्वाचा निकष ठेवण्यात आला आहे. त्यामुळे केवळ कामाची आकडेवारी नव्हे, तर अधिकाऱ्याची प्रशासकीय प्रतिमा आणि प्रामाणिकपणालाही महत्त्व मिळणार आहे.

‘काम करणाऱ्याला संधी’चा स्पष्ट संदेश

सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय यंत्रणेचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निर्णयक्षमतेचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेवर होतो. त्यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची योग्य दखल आणि त्यानुसार पुढील संधी मिळावी, हा या निर्णयाचा केंद्रबिंदू आहे.

यामुळे अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारण्याबरोबरच रुग्णसेवा, योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास चालना मिळणार आहे. नियुक्त्या आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपात गुणवत्ता व पारदर्शकतेला अधिक महत्त्व मिळणार असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजातही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

आबिटकरांच्या नेतृत्वाखाली ‘परफॉर्मन्स बेस्ड’ प्रशासन

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून त्यानुसार जबाबदाऱ्या आणि संधी देण्याची ही पद्धत महत्त्वाची ठरणार आहे.
या प्रक्रियेला प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या प्रशासकीय अनुभवाची साथ मिळणार आहे. तीन वर्षांची कामगिरी, १०० गुणांचे मूल्यांकन आणि स्पष्ट श्रेणीकरण यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करता येणार आहे.

‘कामगिरीला मान्यता आणि गुणवत्तेला संधी’ या सूत्रावर आधारित ही व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागातील पारंपरिक कार्यपद्धतीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आकाराला येणारी ही कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती आरोग्य विभागासाठी आदर्श व नाविन्यपूर्ण ठरणार असून लोकाभिमुख आरोग्यसेवा प्रत्यक्ष साकारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे .

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने ग्रामीण भागातील ५ शिक्षकांचा सन्मान !!

जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने ग्रामीण भागातील ५ शिक्षकांचा सन्मान !!

*ठाणे, दि. ७ सप्टेंबर २०२६*

जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित ‘जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७’ सोहळ्यात ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, त्यांच्यात जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांना ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.

या सोहळ्यास आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे व ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा देत गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी-केंद्रित शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

*पुरस्कार प्राप्त शिक्षक -*

- *अंबरनाथ तालुका :* जि. प. शाळा मामूची वाडी, केंद्र पिंपळोली येथील प्राथमिक शिक्षिका छाया संजय कोकंदे
- *भिवंडी तालुका :* जि. प. शाळा देवरुंग, केंद्र शिवनगर येथील पदवीधर शिक्षक सुभाष गोविंद पाटील
- *कल्याण तालुका :* जि. प. शाळा घोटसई, केंद्र गोवेली येथील प्राथमिक शिक्षिका रंजना प्रकाश टेंभे
- *मुरबाड तालुका :* जि. प. शाळा खेडले तळवली, केंद्र खेवारे-महाज येथील प्राथमिक शिक्षक तानाजी धर्मा जाधव
- *शहापूर तालुका :* जि. प. शाळा कळगाव, केंद्र दहिवली येथील पदवीधर शिक्षक वैभव गणपत मांजे

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या शिक्षकांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे.

काँक्रीट रस्ते तोडायची मालिका सुरूच; प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह !!

काँक्रीट रस्ते तोडायची मालिका सुरूच; प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह !!

*डोंबिवली, दि. ७ सप्टेंबर २०२६)*

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात नवीन बनविलेले काँक्रीट रस्ते तोडण्याची मालिका सुरूच आहे. मिलापनगर बंगला क्रमांक RL-16 आणि 70 समोरील काँक्रीट रस्ता तोडून त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.

हा काँक्रीट रस्ता राज्य सरकारच्या विशेष निधीतून केडीएमसीने वर्षभरापूर्वीच बनविला होता. भविष्यात या ठिकाणावरून महावितरणच्या केबल्स, पाण्याच्या पाइपलाइन आदी दुरुस्तीसाठी टाकायच्या असल्यास अडचण येऊ नये म्हणून काँक्रीट रस्ता तोडून पेव्हर ब्लॉक लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

जर हे काँक्रीट रस्ते बनवतानाच या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकले असते तर पुन्हा रस्ता तोडून ब्लॉक टाकण्यासाठी झालेला आर्थिक भुर्दंड टाळता आला असता. या कामामुळे गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या दूरदृष्टीच्या अभावामुळेच जनतेच्या पैशाचा चुराडा होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. एमआयडीसी परिसरात यापूर्वीही नवीन नाले/गटारे बनविण्यासाठी, महावितरण केबल्स आणि पाण्याच्या पाइपलाइन दुरुस्तीसाठी अशा विविध कारणांसाठी अनेक नवे रस्ते तोडण्यात आले आहेत.

एमआयडीसी परिसरातील काँक्रीट रस्ते बनवण्यापूर्वी वीज, पाणी आदी वाहिन्या शिफ्ट करण्याचे काम प्रशासकीय समन्वयाअभावी राहून गेले होते. त्यात नाले/गटारांची कामे काँक्रीट रस्ते बनविल्यानंतर सुरू करण्यात आली होती.

एकूणच प्रशासनाच्या चुकीचा फटका नागरिकांना बसत असून यापुढेही असे अनेक काँक्रीट रस्ते तोडावे लागणार आहेत. यामुळे या काँक्रीट रस्त्यांचा दर्जा व त्यांचे आयुर्मान कमी होणार असून काही वर्षांनी हेच रस्ते पुन्हा नव्याने बनवावे लागणार असल्याचे चित्र आहे.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

Sunday, 6 September 2026

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ने 9 मराठी शिक्षक सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव !!

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ने 9 मराठी शिक्षक सन्मानित; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरव !!

*नवी दिल्ली, प्रतिनिधी :* विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि कौशल्याधारित शिक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील 82 शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026’ ने गौरवण्यात आले. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित या समारंभात महाराष्ट्रातील 9 शिक्षकांचा समावेश आहे.

पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि 50 हजार रुपये रोख असे पारितोषिक देण्यात आले.

या 82 पुरस्कारांमध्ये 48 शालेय शिक्षक, 21 उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि 13 कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा समावेश आहे.

*राष्ट्रपतींचे प्रतिपादन*
पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपबंधू दास यांच्या शैक्षणिक योगदानाचा विशेष उल्लेख केला.

"शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर व्यक्तिमत्व आणि चारित्र्याला आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात. भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनवण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल," असे राष्ट्रपती म्हणाल्या.

*मान्यवरांची उपस्थिती*
केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभास केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी, शिक्षण सचिव अनिल कुमार आणि कौशल्य विकास सचिव देबाश्री मुखर्जी उपस्थित होते.

*महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त 9 शिक्षक*
🏆 *डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे* - साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड
🏆 *कुंदा जयवंत बच्छाव* - महापालिका शाळा, नाशिक
🏆 *वैभव वसंतराव कुलकर्णी* - जवाहर नवोदय विद्यालय, लातूर
🏆 *शिवप्रसाद अरविंद टिंगरे* - सैनिक स्कूल, सातारा
🏆 *डॉ. विक्रम विशाल* - IIT मुंबई
🏆 *डॉ. अमर मोहनराव ताकसांडे* - जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, वर्धा
🏆 *डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे* - शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर
🏆 *किरण प्रकाश झरकर* - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव
🏆 *अर्चना राकेश जाधव* - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक

राज्यात ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची प्रभावी अंमलबजावणी; दप्तराचे ओझे कमी होणार !!

राज्यात ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची प्रभावी अंमलबजावणी; दप्तराचे ओझे कमी होणार !!

*मुंबई, दि. ७ सप्टेंबर २०२६*

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व कृतिप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काटेकोर दक्षता शाळांनी घ्यावी, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

जास्त वजनाच्या दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे व शारीरिक वाढीवर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या धोरणानुसार -

- पूर्व-प्राथमिक वर्गातील लहान मुलांना शक्यतो शाळेत दप्तर आणण्याची आवश्यकता भासणार नाही, या दृष्टीने शाळांनी नियोजन करावे.
- मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दररोज अनावश्यक पाठ्यपुस्तके, वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य आणण्यास सांगू नये. त्या दिवसासाठी आवश्यक असलेलीच पुस्तके आणली जावीत यासाठी वर्गनिहाय 'दप्तर वेळापत्रक' तयार करावे.
- विद्यार्थ्यांनी दररोज सर्व पुस्तके घरी नेण्याची आवश्यकता भासू नये म्हणून शाळांनी वर्गखोल्यांमध्ये कपाटे, शेल्फ किंवा लॉकरची सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
- घरातून जड पाण्याची बाटली वाहून आणावी लागू नये यासाठी शाळांनी स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि स्कूल बॅग पॉलिसीनुसार, इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात १० दिवसांचा दप्तरविरहित कालावधी आयोजित करण्यात यावा. या कालावधीत स्थानिक कारागीर व व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाखाली सुतारकाम, बागकाम, मातीची भांडी बनविणे, हस्तकला, कृषीविषयक व स्थानिक व्यवसायांची ओळख यांसारखे प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रम राबविले जाणार आहेत.

तसेच वर्षभरात क्रीडा, बौद्धिक खेळ, वाचन, कथाकथन, पर्यावरण संवर्धन आणि क्षेत्रभेटी अशा कृतिप्रधान दिवसांचे आयोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण !!

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण !!

*डोंबिवली, दि. ६ सप्टेंबर २०२६, (राजू नलावडे)*

येणाऱ्या गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव काळात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या निर्माल्याबाबत जनजागृती व्हावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निर्माल्यापासून कंपोस्ट खत कसे तयार होते याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम आज रविवारी सकाळी ९.०० ते ११.३० या वेळेत श्री गणेश निर्माल्य खत प्रकल्प, एमआयडीसी, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन, केडीएमसी) श्री रामदास कोकरे, निर्मल युथ फाउंडेशनच्या अध्यक्षा कु. अक्षता औटी, श्री गणेश मंदिर संस्थानचे सचिव व विश्वस्त प्रवीण दुधे, पर्यावरण तज्ज्ञ विजय घोडेकर, पर्यावरण प्रेमी राजीव तायशेटे, राजू नलावडे, राजू काळे, सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते. प्रगती कॉलेज आणि एस.आय.ए. कॉलेजमधील एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. येणाऱ्या गणेशोत्सवात विसर्जनस्थळी जमा होणारे निर्माल्य हे स्वयंसेवक विद्यार्थी गोळा करून प्लास्टिकविरहित स्वरूपात श्री गणेश निर्माल्य खत प्रकल्पात पोहोचवणार आहेत. यानिमित्ताने उपायुक्त श्री रामदास कोकरे यांनी नागरिकांनी निर्माल्य कसे द्यावे याबाबत जनतेला संदेश दिला.

सदर कार्यक्रमादरम्यान श्री गणेश निर्माल्य खत प्रकल्पाच्या आवारात श्री रामदास कोकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन श्री गणेश मंदिर संस्थान, निर्मल युथ फाउंडेशन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि सुमित एल्को (Sumeet ELCO) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

Saturday, 5 September 2026

“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !!

“मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” या विषयावरील शिक्षकांसाठीच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर !!

** स्पर्धेत भरत गोसावी प्रथम

पालघर, प्रतिनिधी 

मनोविकास ग्रंथोत्सव आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. “मी विद्यार्थी ते माझे विद्यार्थी” हा स्पर्धेचा विषय होता. शिक्षक म्हणून कार्यरत असताना स्वतःच्या विद्यार्थी जीवनातील अपेक्षा आणि आज शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, या अनुषंगाने शिक्षकांनी आपल्या अनुभवांना व विचारांना लेखणीतून व्यक्त केले.

स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षी शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदा एकूण ४२ शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. मुंबई येथील प्रा. सचिन परब यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

स्पर्धेत श्री. भरत गोसावी यांनी प्रथम क्रमांक, सौ. अमृता रोशन धुमाळ यांनी द्वितीय क्रमांक, तर श्री. पंकज शंकर चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

विजेत्यांना त्यांच्या आवडीची ₹५०० किमतीची पुस्तके, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. “लेखक आपल्या भेटीला” या उपक्रमाच्या ऑक्टोबर महिन्यातील कार्यक्रमात बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.

लेखणीपेक्षा ‘स्वतःचा विचार’ महत्त्वाचा!

या स्पर्धेच्या निकालासोबतच आयोजकांनी एक महत्त्वाची खंतही व्यक्त केली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या काही शिक्षकांनी निबंध लेखनासाठी एआयचा (Artificial Intelligence) वापर केल्याचे निदर्शनास आले. शिक्षकांच्या अनुभवांवर आणि त्यांच्या विद्यार्थी-शिक्षक प्रवासावर आधारित असलेल्या या विषयात प्रत्येक शिक्षकाचा स्वतःचा अनुभव, विचार, भावना आणि चिंतन अपेक्षित होते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आधार घेताना स्वतःची सर्जनशीलता आणि लेखनविचार यांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

“स्पर्धेचा उद्देश केवळ क्रमांक मिळविणे नसून शिक्षकांनी स्वतःच्या विद्यार्थी जीवनाकडे पुन्हा एकदा पाहावे आणि ‘माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी कसा शिक्षक आहे?’ याचे आत्मपरीक्षण करावे, हा आहे,” असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांचे मनोविकास ग्रंथोत्सवचे अमोल पाटकर आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश लवेकर यांच्या वतीने आभार मानण्यात आले. पुस्तक वाचन, चिंतन आणि लेखनातून शिक्षकांच्या विचारविश्वाला समृद्ध करण्याचा हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आयोजकांतर्फे यावेळी देण्यात आली.

वृत्त - पंकज चव्हाण (वसई)

पडघ्यात ८० वर्षांची परंपरा कायम; कृष्ण जन्मोत्सव अन् दहीहंडीचा रंगला उत्सव !!

पडघ्यात ८० वर्षांची परंपरा कायम; कृष्ण जन्मोत्सव अन् 
दहीहंडीचा रंगला उत्सव !!

भिवंडी प्रतिनिधी (मिलिंद जाधव)

भिवंडी तालुक्यातील पडघा व परिसरात विविध मंडळे, राजकीय पक्ष, सार्वजनिक मित्रमंडळांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गोविंदा पथकांच्या जल्लोषाने आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषाने संपूर्ण पडघा परिसर दुमदुमून गेला.

दहीहंडी उत्सवानिमित्त सकाळपासूनच पडघा बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते.  पडघे गावात गेल्या ८० वर्षांपासून सुरू असलेली कृष्ण जन्म महोत्सवाची परंपराही यंदाही मोठ्या उत्साहात कायम राखण्यात आली. सुदर्शन नगर येथून संपूर्ण पडघे गावातून  श्रीकृष्ण भगवानांची वेशभूषा केलेल्या बालकृष्णाची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक वाजत-गाजत  काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या कृष्ण जन्म महोत्सवात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पडघा शहर व विभाग, सिद्धिविनायक प्रतिष्ठान, एकता मित्रमंडळ यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक मित्रमंडळांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

दहीहंडी फोडण्यासाठी ओमसाई गोविंदा पथक, जय बजरंग गोविंदा पथक, सुदर्शन गोविंदा पथक यांसह विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पथकांनी एकामागून एक थर रचत उंच मानवी मनोरे उभारले आणि दहीहंडीला दिमाखदार सलामी दिली. डीजेच्या तालावर थिरकणारे तरुण, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषामुळे वातावरणात उत्साह संचारला होता. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी थरावर थर रचत आपले कौशल्य आणि शारीरिक सामर्थ्य पणाला लावले. उंच मनोरे रचून हंडी फोडण्याचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पडघ्यातील बस स्थानक, विद्यानगर, शीतल शरद अपार्टमेंट यांसह विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केल्याने उत्सवाला आणखी रंगत आली. गोविंदा पथकांच्या धाडसी कामगिरीला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उत्स्फूर्त घोषणांनी दाद दिली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी दहीहंडी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. परंपरा, उत्साह, साहस आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत पडघ्यातील दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Friday, 4 September 2026

धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात; रात्रभर नामस्मरण, भजनाने रंगला जागर, अनेक वर्षाची परंपरा !!

धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात; रात्रभर नामस्मरण, भजनाने रंगला जागर, अनेक वर्षाची परंपरा !!

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील धुतुम गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

धुतुम खालची आळी यांच्या वतीने शंकर मंदिरात पूजा अर्चा, अभिषेकचा मान सामाजिक कार्यकर्ते समाधान कृष्णा कटेकर व सामाजिक कार्यकर्त्या भारती समाधान कटेकर या दांपत्याला देण्यात आला. त्यांच्या शुभहस्ते सप्ताहाचा अभिषेक, पूजा अर्चा भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा तसेच गावात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, यासाठी श्रीकृष्ण चरणी प्रार्थना करण्यात आली.जन्माष्टमीच्या निमित्ताने रात्रभर नामस्मरण, भजन आणि जागर करण्यात आला. 

सालाबादप्रमाणे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत रघुनाथ ठाकूर यांच्या घरात आयोजित करण्यात आला. यंदाही धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपत हा उत्सव उत्साहात पार पडला.

या धार्मिक सोहळ्यास दशरथ रोहिदास ठाकूर, मेघनाथ दशरथ ठाकूर, सुरेश गंगाराम ठाकूर, गोविंद नामदेव ठाकूर, यांच्यासह धुतुम खालची आळीतील ग्रामस्थ,धुतुम गावातील ग्रामस्थ,भाविक आणि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर, माजी जि. प. सदस्य कुंदा ठाकूर यांनी श्रीकांत ठाकूर यांच्या घरी जाऊन श्री कृष्णच्या मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले.भजन, नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणामुळे धुतुम गावात संपूर्ण रात्र श्रीकृष्णमय झाली. अखेर सर्व उपस्थितांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम..

रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम..

(रस्ते दुरुस्ती मध्ये नागरिकांचा कराचा पैसा केडीएमसी ठेकेदाराला खड्डे भरण्यासाठी चे पैसे देणार कि खड्ड्यांच्या नावाखाली संपूर्ण रस्त्या डांबरीकरण दुरुस्तीचे पैसे देणार शिल्पा बजरंग तांगडकर यांचा सवाल)

.                                 शिल्पा बजरंग तांगडकर

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण परिसरामध्ये सर्व ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे या रस्त्या दुरुस्ती करण्यामध्ये फक्त खड्डे पडलेल्या जागेवर डांबरीकरणाचा मुलामा  देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा  प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकडे करून  येत आहे ,शिल्पा बजरंग तांगडकर यांच्या वतीने टावरी पाडा ,बारावी परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर ऑनलाइन पत्रा सोबत कार्यालयामध्ये पत्रव्यवहार करण्यात आला होता यावर तत्काळ दिलेल्या कालावधीत कोणती कारवाई करण्यात आली नाही परंतु आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर टावरीपाडा वॉटर फिल्टर रोड डांबरीकरणाचे काम करण्यात आले परंतु हे काम संपूर्ण रस्त्याचे काम केले नसून फक्त खड्डे पडले होते त्या ठिकाणी पॅच मारुन डांबरीकरण करण्यात आले, तसेच अजून  बारावे पाइपलाइन ,गोदरेज हिल परिसरातील रस्त्यांची परिस्थिती जैसे थे तशीच आहे.

नागरिकांचा करातील पैसा केडिएमसी खड्डे बुजवल्यानंतर कंत्राटदाराला फक्त त्या खड्डे बुजवले त्याचे पैसे देणार कि रस्ता दुरुस्ती नावाखाली संपूर्ण रस्त्या डांबरीकरण चे पैसे देणार हा प्रश्न शिल्पा तांगडकर यांचा वतीने विचारण्यात येत आहे.

रायते पिपंळोली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचा आमदार, खासदारांकडून सत्कार, पत्रकारांनीही केला सन्मान !!

रायते पिपंळोली ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचा आमदार, खासदारांकडून सत्कार, पत्रकारांनीही केला सन्मान !!

कल्याण, (संजय कांबळे) : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कल्याण तालुक्यातील रायते पिपंळोली ग्रुप ग्रामपंचायचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचा'आदर्श ग्रामपंचायत अधिकारी, म्हणून खासदार बाळ्या मामा म्हात्रे, आणि आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, डेप्युटी सीईओ (साप्र) अविनाश फडतरे, ग्रामपंचायत डेप्युटी सीईओ प्रमोद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्रक, सन्मान पदक देऊन गौरव करण्यात आला, तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मुल्यमापन समितीचे सदस्य तथा पत्रकार संजय कांबळे यांनी ही कार्यालयात जाऊन त्यांचा सन्मान केला.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासात्मक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामपातळीवरील प्रशासन अधिक सक्षम करण्यामध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ग्रामस्थांच्या गरजा, स्थानिक समस्या आणि विकासाच्या प्राधान्यक्रमांचा विचार करून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेत, जिल्हा परिषद, ठाणेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी गुणगौरव सोहळा’ उत्साहात पार पडला.
उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत ग्रामपंचायत विभागातील ४७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली. या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) व आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मान पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये रायते पिपंळोली ग्रुपचे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांचाही समावेश असून त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच कल्याण तालुक्यातील पत्रकार तथा समिती सदस्य संजय कांबळे यांनी रायते ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आदर्श ग्रामपंचायत अधिकारी श्री सुरवसे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच इतर ग्रामपंचायत अधिकां-यांचेही अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायतीचे कर्मचारी व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीची दखल, रायते पिपंळोली ग्रामपंचायतीकडून विसर्जन घाटांची साफसफाई !

पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीची दखल, रायते पिपंळोली ग्रामपंचायतीकडून विसर्जन घाटांची साफसफाई !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात,तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जवळपास सुमारे ९३ सार्वजनिक आणि ४ हजार ५०० घरगुती गणेशोत्सव साजरे होणार असून यासाठी १९ गणेशघाटावर 'श्री, चे विसर्जन होणार आहे. या करिता ८६ अंमलदार, १० पोलीसअधिकारी, होमगार्ड, पोलीस पाटील हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु विसर्जन घाट, रस्त्यावरील खड्डे चिखल पाहता इतर विभागाचे काय? असा प्रश्न उपस्थित करून पत्रकार संजय कांबळे यांनी 'एस न्यूज महाराष्ट्र, तसेच दैनिक सागर, माझा बातमीदार, आदी विविध दैनिकामधून प्रसिद्ध करताच याची दखल तालुक्यातील 'रायते पिपंळोली ग्रुप ग्रामपंचायतीने घेऊन तात्काळ या घाटांची साफसफाई केली, त्यामुळे पत्रकार श्री कांबळे यांनी त्यांचे आभार मानून सन्मान केला.

महाराष्ट्रात विशेष:त मुंबई, ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, शिवाय शासनाने हा महाराष्ट्र उत्सव म्हणून घोषित केला आहे. यावेळी पोलीस यंत्रणेवर प्रंचड ताण येतो, केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर ८ ते १० लाख लोकसंख्येसाठी ८० ते ९० कर्मचारी आहेत, अशातच आता गणेशोत्सव तोडांवर आला आहे, या पोलीस ठाण्यातंर्गत ९३ सार्वजनिक तर ४ हजार ५०० घरगुती गणेशाची स्थापना होणार आहे, बाप्पाच्या विसर्जनासाठी उल्हास, काळू, भातसा आणि बारवी नदीच्या काठावर तसेच काही ठिकाणी गाव तलावात विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत, असे १९ घाट आहेत, परंतु या घाटांची सध्याची परिस्थिती पाहिली तर हे विसर्जन घाटआहे की एखादे दलदल खाडी, अशी स्थिती दिसून येत आहे. काही ठिकाणी या घाटाच्या लाद्या तुटलेल्या, फुटलेल्या, उखडलेल्या दिसून येत आहेत, मागील काही वर्षाचा विचार केला तर गणेश विसर्जन दरम्यान अनेक गणेशभक्त बुडवून मरण पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत असेल अथवा महसूल विभाग असेल यांनी गणेशोत्सवापूर्वी या घाटांची दुरुस्ती, दिवाबत्ती ची सोय, जीवरक्षक नेमणे, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवने, वाहतूक व्यवस्था सुधारणे आदी उपाययोजना वेळीच केल्या तर यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू शकतो, अशा प्रकारे बातमी एस न्यूज महाराष्ट्र, दैनिक सागर, बातमीदार माझा, अशा विविध माध्यमातून प्रसिद्ध केली होती. याची दखल ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरोशे, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी घेऊन जेसीबीच्या माध्यमातून हा चिखल बाजूला केला आहे, शिवाय नदीमध्ये मोटार लावून पाण्याने संपर्क घाट स्वच्छ करणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांनी सांगितले. त्यामुळे पत्रकार कांबळे यांनी त्यांचे कार्यालयात जाऊन आभार मानले व त्यांचा सन्मान केला. तसेच असेच काम इतरही यत्रणांनी करावे असे कांबळे यांनी सांगितले.

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...