Tuesday, 1 September 2020

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा सप्टेंबर महिन्यातील शिबीर कार्यक्रम जाहीर !

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा सप्टेंबर महिन्यातील शिबीर कार्यक्रम जाहीर !
        
       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे आयोजित केली जाणारी शिबिरे, अनुज्ञप्ती व नवीन वाहन नोंदणी कामकाज पूर्ववत सुरु करण्यात आली आहेत. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण, जि.रायगड यांच्या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा सप्टेंबर,2020 या कालावधीचा शिबीर (कॅम्प) कार्यक्रम पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे-
            सोमवार दि.7 व 21 सप्टेंबर, 2020 रोजी महाड, बुधवार दि.9 सप्टेंबर, 2020 रोजी श्रीवर्धन, शुक्रवार दि.11 व 25 सप्टेंबर, 2020 रोजी अलिबाग, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर, 2020 रोजी माणगाव, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर, 2020 रोजी मुरुड, शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर, 2020 रोहा या ठिकाणी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांच्या कार्यालयाद्वारे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा !

पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा !
   
     
       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी  दि.1 सप्टेंबर 2012 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत तालुकास्तरीय सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या अधिनस्त असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 व श्रेणी-2 यांच्या स्तरावर 100% अनुदानावर प्राप्त झालेल्या लसींचा आपल्या पशुधनासाठी पुरेपूर लाभ घ्यावा व आपल्या पशुधनाचे लाळ-खुरकत रोगापासून संरक्षण करावे, यासंदर्भात काही सूचना अथवा तक्रार असल्यास जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड-अलिबाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद  डॉ.आर्ले यांनी केले आहे.
           महाराष्ट्र शासनाकडून पशुधनामधील संसर्गजन्य लाळ-खुरकूत व सांसर्गिक गर्भपात या रोगावरील लसीकरण कालबद्ध वेळेत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम केंद्र पुरस्कृत असून राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2020 पासून राबविण्यात येणार आहे.
           या कार्यक्रमास दिनांक 1 सप्टेंबर 2020 रोजी प्रत्यक्ष सुरुवात झाली असून तालुकास्तरावर गठीत केलेल्या पथकांद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. हा कार्यक्रमकरिता केंद्र शासनाकडून शंभर टक्के निधी प्राप्त झालेला असून या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 100% गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, वराह यांना सहा महिन्याच्या अंतराने वर्षातून दोन वेळा परंतु सहा ते आठ महिने वयोगटातील 100% गायीच्या कालवडी आणि म्हशीच्या पारड्यांना एक वेळा सांसर्गिक अंतर्गत एफ.एम.डी व ब्रुसेला प्रतिबंधक लस, जनावरांना ओळख पटविण्यासाठी कानात लावायचे टॅग व ॲपलिकेटर तसेच आवश्यक शीतसाखळी सुविधा लसीकरण, साहित्य व मानधन यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबविला जात आहे.
           या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे जिल्ह्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याकरिता जिल्हा व तालुकास्तरावर सनियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आहे.
जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती अध्यक्ष-जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग, सदस्य-अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड-अलिबाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, सदस्य सचिव- सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, रायगड विभाग.
तालुकास्तरीय सनियंत्रण समिती अध्यक्ष- तहसिलदार, सदस्य-सहाय्यक आयुक्त ,पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, रायगड-अलिबाग, सभापती, पंचायत समिती, अलिबाग, पशुधन विकास अधिकारी श्रेणी-1, झिराड, ता.अलिबाग, सदस्य सचिव-पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, रायगड-अलिबाग.

बजाज फायनान्स कंपनीच्या विरोधात अंबरनाथ पोलिस प्रशासन करणार गुन्हा दाखल ! कारवाई न झाल्यास पत्रकार सुरक्षा समिती करणार आंदोलन. !!

बजाज फायनान्स कंपनीच्या विरोधात अंबरनाथ पोलिस प्रशासन करणार गुन्हा दाखल !
कारवाई न झाल्यास पत्रकार सुरक्षा समिती करणार आंदोलन. !!


अंबरनाथ, कैलास जाधव : बजाज फायनान्स कंपनीच्या विरोधात अंबरनाथ पोलिस प्रशासन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ चिखलोली,बारवी डॅम रोड शिवमंदिर तलावा परिसरात राहणारे श्री साम्राज्य साप्ताहिकाचे संपादक तसेच पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अरुण ठोंबरे यांनी त्यांच्या पत्निच्या नावे बजाज फायनान्स कंपनी मधुन कर्ज घेतले असताना कर्जाचा मासिक हप्ता भरणेसाठी विलंब झाला असता काही दिवसांपूर्वी बजाज फायनान्स कंपनीच्या गुंडानी श्री ठोंबरे यांना अपशब्द वापरुन शिविगाळ केली होती सदर प्रकरणी पत्रकार आरुण ठोंबरे यांनी आरबिआयला तक्रार केली असताना कंपनींने समजोता करून माफी मागितली आणि कर्जाबाबत सेटलमेंट करुन तीन  टप्प्यात कर्ज फेडण्यासाठी मुदत दिली तरी सुध्दा दुसरीकडे बजाज फायनान्स कंपनीचे गुंड सातत्याने फोन करुन परिवारातील आया बहिणींची नावे घेऊन अगदी अश्लील भाषेत खालच्या पातळीवर जाऊन शिविगाळ करत आहेत.  सध्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र हाहाकार माजला असुन ठाणे जिल्ह्यातील शहरांना देखील याचा फार मोठा आर्थिक फटका बसला असून पत्रकारांनावर  सुध्दा उपासमारीची वेळ आली आहे, पत्रकार हा आपल्या जिवाची बाजी लावून वृत्त संकलन करून शासनाने धोरण आणि उपाययोजना, शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय सर्वसामान्य नागरिकांना पर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन नेहमीच सामाजिक जीवनात महत्त्वाच्या भूमिका बजावत असताना पत्रकारांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे असे असताना सध्यास्थितित कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने फायनान्स कंपन्यांना कर्ज वसुली बाबत कडक निर्बंध घातले असताना देखील बजाज फायनान्स कंपनी शासनाचा आदेश धाब्यावर बसवून आपल्या गुंडा मार्फत घरातील  मुली,बाळी,आई,बहीन यांच्या बाबत अतिशय घाणेरडे शब्द प्रयोग करून जबरदस्ती  वसुली करत आहेत  याबाबत गंभीर दखल घेत पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अरुण ठोंबरे, ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रदिप गोविंद रोकडे यांनी सादर बजाज फायनान्स कंपनी आणि त्यांच्या वसुली गुंडावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात निवेदन देवून केली असुन या बाबत कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री धुमाळ साहेब यांनी दिलेअसुन हा प्रश्न तमाम पत्रकारांच्या न्याय हक्काचा असल्याने या बाबत तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस श्री प्रदिप गोविंद रोकडे यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील माणगांव व पनवेल तालुक्यात राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन यशस्वीपणे संपन्न !!

रायगड जिल्ह्यातील माणगांव व पनवेल तालुक्यात राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन यशस्वीपणे संपन्न !!


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने ५ जून २०२० रोजी सरकारने शेतकरी विरोधी तीन अध्यादेश काढले ज्यात शेतकरी वर्गाचे खूप मोठे नुकसान होणार असून शेतकरी उत्पादन ,खरेदी विक्री व्यवस्था, साठवण व्यवस्था ,करार शेती ,अश्या अनेक अधिकारापासून शेतकरी वर्ग वंचित होणार आहे त्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा या राष्ट्रीय संघटनेने देशव्यापी आंदोलन सुरू केले त्यातील आज दुसऱ्या चरणात रायगड जिल्यात दक्षिण रायगड मधील माणगाव व उत्तर रायगड मधील पनवेल येथे हे आंदोलन शेतकरी विरोधी अध्याआदेशा बद्दल जागृतीपर माहिती देऊन व ५४३ लोकसभा सांसद यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून यशस्वीपणे पार पडले. 
       या आंदोलनात शेतकरी संघटना, शेतकरी ,शेतकरी बचत गट यांनी सहभाग नोंदवला तसेच भारत मुक्ती मोर्चा ,भारतीय विदयार्थी मोर्चा ,बहुजन मुक्ती पार्टी , बहुजन क्रांती मोर्चा आदींनी पाठिंबा दर्शवला व आंदोलन यशस्वी केले. यावेळी संयोजक विजय आवास्कर, राकेश मोरे,मिलिंद साळवी यांनी सर्व सहभागी यांचे आभार मानून शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करावेत असा सरकारला  इशारा दिला.अन्यथा पुढील चरणात तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

मुरबाड तालुका गट शिक्षणाधिकारी पद रिक्त !! *पंचायत समितीे सभापती व उपसभापती यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालुन केला निषेध व्यक्त*

मुरबाड तालुका गट शिक्षणाधिकारी पद रिक्त !!  *पंचायत समितीे सभापती व उपसभापती यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालुन केला निषेध व्यक्त*


मुरबाड.(मंगल डोंगरे) : कोविड 19 मुळे सर्व शाळा बंद असल्या तरी आँनलाइन शिक्षण देणे शासनाने सुरु केले असुन त्याशिक्षकावर नियत्रंण ठेवण्यासाठी व  शिक्षकदिन तोंडावर आलेला असूनही मुरबाड तालुक्यात गट शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ व उपसभापती अरूणा खाकर यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला निषेध व्यक्त केला .. ..


        सन 2010 पासून मुरबाड तालुका गट शिक्षणाधिकारी पद भरलेले नाही याबाबत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना कळवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते सध्याच्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी 14  ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत रजेवर आहेत त्यांचे जागी ज्यांना नेमायचे आहे त्या विस्तार अधिकारी कोरोना मुळे विलगी करणात आहेत , शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे सुद्धा भरलेली नाहीत .त्यामुळे हे आंदोलन केल्याचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी आमचे मुरबाड तालुका प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना सांगितले .

"अखिल मुरबाड तालुका आगरी समाज आयोजित" विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०२० संपन्न !

"अखिल मुरबाड तालुका आगरी समाज
आयोजित"
विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०२० संपन्न !


मुरबाड (मंगल डोंगरे) : सोमवार, दिनांक ३१-०८-२०२० रोजी मुरबाड तालुक्यातील आगरी समाजातील मार्च २०२० मध्ये विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ हनुमान मंदिर सभागृह डोंगरन्हावे, या ठिकाणी पार पडला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे दरवर्षी प्रमाणे एकत्रित येवून मोठ्या थाटमाटात होणारा गुणगौरव समारंभ कायद्याने व सामाजिक द्रुष्ट्या शक्य नसल्याने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना अनेक गोष्टींमुळे हा कौतुक सोहळा घेण्यात दिरंगाई होत होती. अशा वेळी अखिल मुरबाड तालुका आगरी समाज गुणगौरव समितीच्या वतीने एक अत्यंत चांगला निर्णय घेवुन सदर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा समाजातील प्रत्येक गावागावात जावून करण्याचे ठरले आहे. त्यानुसार आज हा कार्यक्रम  डोंगरन्हावे येथे डोंगरन्हावे, जांबुर्डे व आगाशी या गावातील १०९  विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तिन्ही गावातील सन्माननीय सरपंच, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर पाटगाव येथे जाऊन तेथील १० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. 
याप्रमाणेच समाजातील गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी विद्यार्थी गुणगौरव समिती २०२० तयार केली असून समितीमार्फत समाजातील दानशुर व्यक्तींना सहाय्यासाठी आवाहन केले आहे. सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने श्री. रामभाऊ दुधाळे, शिवसेना मुरबाड शहर प्रमुख,श्री. प्रमोदजी ऐनकर, श्री. भगीरथजी भांडे, श्री. सचिनजी माळी, श्री. रवींद्रजी भांडे,  श्री. तुलशीरामभाऊ देशमुख, श्री. विलासजी शेलके,  यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम नियोजन करुन हा कार्यक्रम पर पडला. व पुढील उर्वरित कार्यक्रम हा विद्यार्थी गुणगौरव समितीने  ठरविल्या प्रमाणे टप्प्यात घेणार असल्याचे संयोजक-आयोजक दिलीप खाटेघरे यांनी सांगितले.

क्रांतीकारक गोमाजी पाटील यांच्या घराच्या जागी स्मारक उभारण्यासाठी नातसुनेची धडपड. !!

क्रांतीकारक गोमाजी पाटील यांच्या घराच्या जागी स्मारक उभारण्यासाठी नातसुनेची धडपड. !!


मुरबाड (मंगल डोंगरे) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यानी आपल्या घरादाराची राखरांगोळी केली. अनेक वीरांनी आपल्या सुखी संसारावर तुळशीपत्र ठेवले. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माञ त्या क्रांतीकारक आणि हुतात्मा वीरांच्या आठवणी पुसट होत आहेत. उद्याच्या पिढीला हा देदीप्यमान इतिहास समजावा यासाठी क्रांतीकारक च्या घरातील मंडळीना पुढाकार घ्यावा लागत आहे. याचे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्य सैनिक गोमाजी पाटील यांच्या मानस नातसून अनुसया गोपाल जामघरे सध्या हुतात्म्यांचया स्मृती तेवत ठेवण्यासाठी धडपडत आहेत. 
      कर्जत मानीवली येथील गोमाजी पाटील व हिराजी पाटील भाई कोतवाल यांच्या खांद्याला खादा लावून आझाद दस्ता ह्या चळवळीत लढले. २ जानेवारी १९४३ ला मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे फितुरीने घात होऊन भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना वीरगती लाभली होती. ज्या दिवशी मुलगा शहिद झाला त्याच दिवशी गोमाजी पाटील अटक झाले. १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला आणि गोमाजी पाटील यांची सुटका झाली. गोमाजी पाटील घरी आल्यावर पत्नी ठकाबाई व सून जानकीबाई सह मानीवलीला काबाडकष्ट करून पोट भरत होते. गोमाजी पाटील यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने भविष्याचा विचार करून गोमाजी पाटील यांनी बिरदोले येथील आपल्या नात्यातल्या दहा वर्षाच्या मुलाला गोपाल जामघरे याला आपल्या घरी कायमचा संभालणयासाठी घेऊन आले. १९५४ साली त्यांनी खाडेपाडा येथील अनुसया नावाच्या मुलीबरोबर गोपाळ चे लग्न लावून दिले. ह्या जामघरे दाम्पत्याने गोमाजी पाटील आणि जानकीबाई पाटील यांची सेवा केली. १९६१ साली गोमाजी व १९६७ साली जानकीबाई यांचे निधन झाले. त्यानंतर जामघरे दांपत्य गोमाजी पाटील यांच्या घरातून निघून जनावरांच्या गोठ्यात राहू लागले. काही वर्षांपूर्वी गोमाजी पाटील ह्यात असताना त्यानी आपल्या मालकीची काही जमीन गोपाल जामघरे याना बक्षिस पञ करून दिली होती. 
    १९७३ साली गोपाल जामघरे याचे अपघातात निधन झाले. त्यानंतर अनुसया गोपाल जामघरे आपल्या मुलीसह मानीवलीलाच त्या गोठ्यात राहून काबाडकष्ट करू लागल्या. आज मितीस गोमाजी पाटील यांच्या पुतण्यानी गोमाजी पाटील यांचे घर पाडले आहे. ते घर पुन्हा उभे करून आणि आपल्या घराच्या जागी स्वातंत्र्य सैनिक गोमाजी पाटील व जानकीबाई हिराजी पाटील यांचे स्मारक उभारण्यासाठी अनुसया बाई वयाच्या ८३ व्या वर्षी एकाकी लढा देत आहेत.  
     ज्या घरात हुतात्मा हिराजी पाटील यांचा जन्म झाला. त्या घरात जानकीबाई पाटील यांनी संसार केला ते घर आज अस्तित्वात नाही. त्याच्य ठिकाणी स्मारक उभे राहिले तर उद्याच्या पिढीला हा ऐतिहासिक लढा उमजेल अशी अपेक्षा अनुसया बाई करीत आहेत.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...