Wednesday, 1 July 2026

एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीसाठी महानपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ !!

एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीसाठी महानपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ !!

*# ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी थेट जमिनीवर बसून केला निषेध

कल्याण, संदीप शेंडगे : सोमवारी झालेल्या कल्याण-डोंबिवली महानपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठाकरे गटाचे नगरसेवक राहुल कोट यांनी एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल्याने सभागृहात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

राहुल कोट यांनी विचारलेल्या प्रश्नावर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की, एनआरसी कारखान्याच्या थकबाकी वसुलीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबित असून प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप राहुल कोट यांनी केला.
तसेच गोरगरिबांच्या शंभर रुपये घरपट्टी बाकी असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येते परंतु कोट्यावधी रुपयाची थकबाकी असून या बड्या उद्योगपतींना महापालिका पाठीशी घालत असल्याचा आरोप कोट यांनी केला आहे.

गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये एकही लोकप्रतिनिधी नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर राहुल कोट यांनी संताप व्यक्त करत सभागृहातच जमिनीवर बसून आंदोलन सुरू केले. त्यांच्या समर्थनार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्यासह इतर नगरसेवकही जमिनीवर बसून पालिकेच्या ढिसाळ कारभाराबद्दल निषेध व्यक्त केला

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर हर्षाली चौधरी आणि उपमहापौर राहुल दामले यांनी मध्यस्थी करत समितीचा अहवाल दोन महिन्यांत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यानंतर राहुल कोट व इतर नगरसेवकांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी शिवसेनेचे उमेश बोरगावकर यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक एनआरसीचा प्रश्न वारंवार उपस्थित करावा लागत असल्याची टीका केली. तसेच, एनआरसीची थकबाकी नेमकी कधी वसूल होणार, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

मिलिंद नगर येथे महिलेला घरात बोलावून मारहाण करत केले अश्लील कृत्य !

मिलिंद नगर येथे महिलेला घरात बोलावून मारहाण करत केले अश्लील कृत्य !

खडकपाडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण, संदीप शेंडगे :- कल्याण मध्ये एका महिलेला घरी बोलवुन तिला मारहाण करत तिच्यासोबत अश्लील कृत्य केले इतकेच नव्हे तर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून पोलीसांनी सुजित जाधव, संकेश शिंदे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

    मिलिंदनगर परिसरात राहणाऱ्या धुणीभांडी करणाऱ्या एका महिलेला फोन खरेदी करायचा होता मात्र तिच्या नावाने कर्ज मिळत नसल्याने तिने आपल्या मैत्रिणीच्या नवऱ्याच्या नावाने फोनसाठी लोन घेतले. या कर्जाचा पहिला हप्ता देखील तिने भरला होता. दुसरा हप्ता भरण्यासठी तिला एका महिलेने घरी बोलावून घेतले. महिला त्याठिकाणी गेली असता त्या घरात सुजीत जाधव आणि संकेश शिंदे हे आधीपासून घरात बसून होते. यावेळी या महिलेच्या घरात आधीपासून थांबलेल्या संकेश शिंदे आणि सुजित जाधव या दोघांनी पीडित महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर या महिलेचा फोन काढून घेतला हे दोघे इथवरच न थांबता त्यांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली .याप्रकरणी या महिलेने सुजित जाधव ,संकेत जाधव विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

भिवंडीत बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा !!

भिवंडीत बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा !!

'डॉक्टर्स डे' निमित्त तीन क्लिनिकची तपासणी; संशयित डॉक्टरांवरही कारवाईचे आदेश

प्रतिनिधी भिवंडी 
दिनांक 01 जुलै 2026 

'डॉक्टर्स डे'चे औचित्य साधून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत तीन खासगी क्लिनिकची तपासणी केली. या तपासणीत एका क्लिनिकमध्ये अॅलोपॅथी इंजेक्शन्स व औषधांचा साठा आढळून आल्याने संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांच्या आदेशानुसार बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी मुंबई मंडळ, ठाणे येथील उपसंचालक (आरोग्य सेवा) यांनी भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्राला भेट देऊन वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसह विविध क्लिनिकची पाहणी केली. यावेळी पटेलनगर येथील डॉ. शफिन खान यांचे क्लिनिक, गणेशनगर येथील आशापूरा क्लिनिक आणि पद्मानगर येथील गाजेंगी क्लिनिकची तपासणी करण्यात आली. गाजेंगी क्लिनिकमध्ये अॅलोपॅथी औषधे व इंजेक्शन्सचा साठा आढळल्याने संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

यानंतर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी, १ ते २० नागरी आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत भिवंडी शहरात अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या ७८ बोगस डॉक्टरांविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट, १९६१ मधील कलम ३३ व ३६ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) अंतर्गत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला.

याशिवाय, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व वैद्यकीय व्यवसायिकांची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार १ ते २० नागरी आरोग्य केंद्रांमार्फत एकूण ४५२ डॉक्टरांची यादी तयार करण्यात आली. या यादीतील ३३ डॉक्टरांच्या वैद्यकीय शैक्षणिक पात्रतेबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश उपसंचालक (आरोग्य सेवा) यांनी दिले आहेत.

बैठकीत विविध शासकीय आरोग्य योजना प्रभावीपणे राबविणे, विशेषतः HPV लसीकरण मोहिमेला गती देण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. तसेच शहरातील सर्व वैद्यकीय व्यवसायिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

भिवंडी महानगरपालिकेने बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

बाल्मर लॉरी कंपनीतील सर्व्हेअर कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मध्यस्थी !!

बाल्मर लॉरी कंपनीतील सर्व्हेअर कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मध्यस्थी !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे आपल्या आंतरराष्ट्रीय नेतृत्व गुणांच्या कौशल्याने कामगारांना न्याय देण्यात सातत्याने यशस्वी होत आहेत. महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून यावर्षातील पाचवा पगारवाढीचा करार सोमवार दिनांक २९ जून रोजी करण्यात आला. मे. बाल्मर लॉरी CFS भेंडखळ येथील मे. बिपिन मरीन सर्व्हिसेस या कंत्राटाअंतर्गत काम करत असलेल्या सर्व्हेअर कामगारांसाठी हा तिन वर्षासाठी पगारवाढीचा करार करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना ७५०० रुपयांची पगारवाढ, यामधे पहिल्या वर्षी ५००० रुपये, दुसऱ्या वर्षी १२५० रुपये व तिसऱ्या वर्षी १२५० रुपये तसेच ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, ३० हजार ते ५१००० हजार बोनस व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारानुसार कामगारांना १ मार्च २०२५ पासून पगारवाढीच्या फरकाची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या करारनाम्या प्रसंगी न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, सरचिटणीस वैभव पाटील, बाल्मर लॉरी कंपनीचे एच. आर. हेड सतिश आंदेगावकर, ऑपरेशन सिनियर मॅनेजर रमेश व्ही. आर, बिपिन मरीन सर्व्हिसेस चे डायरेक्टर  बी.डी. पाटील, कामगार प्रतिनिधी अजित ठाकूर, मनोहर ठाकूर, शक्ती पाटील, संदीप वर्तक, सचिन भोईर, सनी भोईर, आदी उपस्थित होते. कामगारांनी याप्रसंगी संघटनेचे आभार मानले

'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान' योजनेसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज !!

'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान' योजनेसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज !!

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना अंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांकडून १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा रु. ५,००० मानधन देण्यात येते. अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक (दिव्यांगांसाठी ४० वर्षे), कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षांचे योगदान, वार्षिक उत्पन्न रु. ६० हजारांपेक्षा कमी तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. विधवा, परित्यक्ता, दिव्यांग आणि वयोवृद्ध कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

इच्छुकांनी महाराष्ट्र शासनाच्या 'आपले सरकार' पोर्टलवर ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत वय, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला , बँक पासबुक आदी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), भूषण जोशी यांनी केले आहे.

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर विराट मोर्चा; हजारो भीमसैनिकांचा एल्गार !!

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानावर विराट मोर्चा; हजारो भीमसैनिकांचा एल्गार !!

*मुंबई, संदीप शेंडगे* : अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत मुंबईतील आझाद मैदान येथे सोमवारी भव्य 'विराट मोर्चा' काढण्यात आला. राज्याच्या विविध भागांतून हजारो भीमसैनिक, आंबेडकरी अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

*आनंदराज आंबेडकर, अशोक आंबेडकर यांचे नेतृत्व*  
या मोर्चाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर आणि अशोक आंबेडकर यांनी केले. उपवर्गीकरणाच्या प्रस्तावामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडेल व संविधानाने दिलेल्या समान हक्कांवर परिणाम होईल, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

*घोषणांनी दणाणले आझाद मैदान*  
मोर्चादरम्यान "संविधान बचाव", "अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण रद्द करा", "सामाजिक न्याय अबाधित ठेवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र व राज्य शासनाने आरक्षण व्यवस्थेत बदल करण्यापूर्वी समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

*शासनाला निवेदन*  
मोर्चानंतर शासन प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, संविधानातील सामाजिक न्यायाची संकल्पना कायम ठेवावी आणि समाजात फूट पाडणारे निर्णय तातडीने थांबवावेत, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

*राज्यभरातून भीमसैनिकांची उपस्थिती*  
बीड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, ठाणे, पनवेल, कल्याण, भिवंडी, अमरावती अशा राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक सहभागी झाले होते. आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात पंचशील ध्वज, निळा ध्वज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा होत्या.

शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मोर्चामुळे आझाद मैदान परिसरात दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे आंबेडकरी समाजातील विविध संघटना मोठ्या संख्येने एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

संगीतमय सुरसंगमात महापुरुषांना मानवंदना; कल्याणात प्रबोधनाचा जागर, समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव !!

संगीतमय सुरसंगमात महापुरुषांना मानवंदना; कल्याणात प्रबोधनाचा जागर, समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचा गौरव !!

*कल्याण, दि. 1 जुलै 2026*

कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात "महापुरुषांना संगीतमय मानवंदना" आणि "समाजभूषण पुरस्कार" वितरण सोहळा मंगळवार दि. 30 जून रोजी उत्साहात संपन्न झाला. समाजप्रबोधन आणि मनोरंजनाचा अनोखा संगम यावेळी अनुभवायला मिळाला.

*महापुरुषांच्या विचारांचा जागर*  
विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, पत्रकार तसेच नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम दिमाखात पार पडला. गीत, संगीत, निवेदन आणि प्रेरणादायी सादरीकरणाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध महापुरुषांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. संपूर्ण सभागृह देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेले.

*समाजभूषण पुरस्कार वितरण*  
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना "समाजभूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले. 

*सन्मानित मान्यवर*: ज्येष्ठ पत्रकार व अन्याय विरुद्ध संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष दिलीप मालवणकर, प्रशासकीय अधिकारी प्रशांत मानकर, राजेंद्र साळुंखे, नगरसेवक महेश गायकवाड, समाजसेवक रामजीत जीतू गुप्ता, सुरेश सोनवणे, पुष्पा कांबळे, लताताई एस पडघान. 

*व्हॉईस ऑफ मीडिया पुरस्कार*: पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सचिन बुटाला, सुरेश जगताप, सलीम मन्सूरी, गौतम गवई, संदीप शेंडगे, प्रशांत ढोणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*विशेष उपस्थिती*  
कार्यक्रमाला बिग बॉस मराठी फेम लोकप्रिय कलाकार संतोष चौधरी उर्फ दादूस यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच संघर्षयोद्धा निलेशदादा येलवे, अतुल भोईर यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांचे विचार देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला. सामाजिक जाणीव जागृत ठेवत महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !!

कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांची मागणी !! *कल्याण (संजय कांबळे) :* हा...