Friday, 16 April 2021

ठाणे जिल्ह्यात रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष !

ठाणे जिल्ह्यात रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष !


ठाणे  : सध्या रेमडिसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी कोवीड रूग्णांच्या नातेवाईकांची खूपच धावाधाव होत आहे त्याच पार्श्वभूमीवर  जिल्हा स्तरावर रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत होणेसाठी जिल्हा स्तरावर रेमडेसिवीर  नियंत्रण कक्ष आणि समन्वय व संनियंत्रण पथक स्थापन करण्यात  आला आहे.

कोविड १९ या आजाराच्या उपचारासाठी वापर होणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा वाढत्या रुग्ण संख्येच्या प्रमाणात कमी असल्याने त्याचा काळाबाजार करुन अवाजवी किमतीत विक्री होत असल्याचे राज्यातील काही घटनांवरून निदर्शनास येत आहे. सदर पार्श्वभूमी विचारात घेऊन रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करून विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध होणेसाठी कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच  जिल्हाधिकारी कार्यालयात रेमडेसीव्हीर जिल्हा नियंत्रण कक्ष २४ तास  सुरू करण्यात आला आहे.

हे आहेत अधिका-यांचे नंबर ..

रेमडेसीवीर समन्वयन व संनियंत्रण  पथक उपजिल्हाधिकारी  (सामान्य प्रशासन) बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार(सर्वसाधारण) आर व्ही तवटे,संपर्क क्रमांक-८३६९४१३७२७ ,सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग,एम आर पाटील, संपर्क क्रमांक- ८७८८२३३८९४ , औषध  निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग, प्राची चव्हाण संपर्क क्रमांक-९८२०५९२११२  असे आहेत.
नियंत्रण कक्ष क्रमांक - ०२२-२५३०१७४०/२५३८१८८६ व टोल फ्री क्र. १०७७ असा आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी, नि.अ.पावसकर संपर्क क्रमांक ९८१९८५६५८७, अन्न सुरक्षा अधिकारी, दि. स. हरदास संपर्क क्रमांक - ९८९२१८०७६०, महसूल सहायक, कुणाल भालेराव संपर्क क्रमांक - ८२९१३५०९२७, महसूल सहायक, सयद सुलेमान संपर्क क्रमांक - ९८१९४०४४११,महसूल सहायक, स्वप्नील चव्हाण संपर्क क्रमांक - ९७६४४०८५४५, हे अधिकारी  व कर्मचारी नियंत्रण कक्ष पथक म्हणून सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उपलब्ध राहतील.

अन्न सुरक्षा अधिकारी, व्य. व. वेदपाठक संपर्क क्रमांक ९८६७७११३५०, अन्न सुरक्षाअधिकारी, प्र. पु सुर्यवंशी संपर्क क्रमांक - ८३६९५८६९५२, अव्वल कारकून, राजेश नरुटे संपर्क क्रमांक - ८१०८५०९९७४,महसूल सहायक, प्रविण उबाळे संपर्क क्रमांक - ७०३८६६६२८७, महसूल सहायक, देवेंद्र सावंत संपर्क क्रमांक - ९८३३७२०१७२ हे अधिकारी व कर्मचारी  नियंत्रण कक्ष पथक म्हणून दुपारी ३ ते १० वाजेपर्यंत उपलब्ध राहतील.

अन्न सुरक्षा अधिकारी, प्र. म. देशमुख संपर्क क्रमांक - ९९२०९५५५६२, अन्न सुरक्षा अधिकारी,रा.स.ताकाटे संपर्क क्रमांक-९४०४९७३१७४, महसूल सहायक किरणकुमार सुरडकर संपर्क क्रमांक - ९५४५८८१८८३,महसूल सहायक, गणेश मोरे संपर्क क्रमांक - ८०८०७८६४५६,शिपाई, ओमकार वैती, संपर्क क्रमांक - ८१६९१७१८१० हे अधिकारी व कर्मचारी नियंत्रण कक्ष पथक म्हणून रात्री १०  ते सकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध  राहतील. असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे.
----------
 

एकशे अडुसष्ट वर्षांपूर्वी धावली मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे गाडी. !!

एकशे अडुसष्ट वर्षांपूर्वी धावली मुंबई ते ठाणे
दरम्यान पहिली रेल्वे गाडी. !!
     
      
अरुण पाटील, भिवंडी :
         एकशे अडुसष्ठ वर्षापूर्वी सामान्य माणसाला लांब पल्ल्याचा प्रवासासाठी आणि सामानाच्या वाहतुकीसाठी बैलगाडय़ातून प्रवास करावा लागत असे; ही;खडतर बाब ओळखून नानांनी(जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे )स्वत: १८४३ साली आगगाडीची कल्पना देशाला प्रगतीपथावर  नेणार्‍या ध्यासापायी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे कार्यालय गिरगावातील नानांच्या वाडय़ात होते. शेवटी नानांच्या दहा वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळेच १६ एप्रिल १८५३ दिवशी बोरीबंदर ते ठाणे या लोह मार्गावरून केवळ भारतातलीच नव्हे, तर आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली.
       या उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुण्यांचा व त्यामधुन प्रवास करण्याचा मान हा इंग्रजांनी नानांना दिलाच, पण त्या शिवाय प्रथम वर्गाचा सोन्याचा पास देऊन त्यांचा सन्मान देखील केला. तेव्हा पासूनच नाना शंकरशेठ यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या (सीएसएमटी) प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील नानां शंकरशेठांचा पुतळा त्यांची साक्ष देतो.
              १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईकरांचा गोंधळ उडाला होता. आज ते एक चमत्कार पाहणार होते. साहेबाचे पोर बिनबैलाची गाडी हाकणार होते. या शुभदिनी मोठमोठे साहेब , स्थानिक लोक  उपस्थित होते. १४ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद लोकांना मिळाला. आपापल्या दर्जानुसार लोक गाडीत बसले होते. नामदार यार्डली , जज्ज चार्लस् जॅक्सन तसेच नाना शंकरशेठ ही मंडळी उपस्थित होती. आणि १६ एप्रिल १८५३ ला दुपारी ३.३० वाजता इतिहास घडला.
                तोफांची सलामी देण्यात आली. गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा दाखविल्या बरोबर त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले. त्या इंजिनांच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे दिसत  होते. काळे पोषाख घातलेले खलाशी इंजिनाच्या पोटात,फावड्याने कोळसा आगीत लोटत होते. त्या तीन राक्षसी अजस्र इंजिनांनी चमत्कार घडवला. ती गाडी चक्क पुढे जाऊ लागली. लोक बोलू लागले की , पुराण काळात आपण अद्भूत चमत्काराच्या गोष्टी नुसत्याच ऐकतो. पण आता कलियुगात इंग्रज त्या प्रत्यक्षात करून दाखवतात. इंग्रज म्हणजे देवाचा अवतार, अशी लोकांची समजूत झाली. परिणामी ते अद्भूत दृश्य पाहून लोकांनी हात जोडून लोटांगण घातले. गाडीचा वेग , शिट्ट्यांचा आवाज याने लोक भयचकित तर झालेच, पण गायी, बैल भेदरले आणि कुत्री  पिसाळल्यासारखी  भुंकू लागली. एकीकडे लष्करी बँडही वाजत होता. बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा लोकांना चमत्कार  वाटत होता.

         या चमत्कारावर लगेच गाणे केले गेले
*सायबाचा पोर कसा अकली रे*
*बिना बैलाची गाडी कशी हाकली रे*

             सामान्य माणसे आगगाडीमध्ये बसायला घाबरायची.त्यांची भीती घालवण्यासाठी सामान्य नागरीकांनी प्रवास करावा म्हणून प्रवास करणाऱ्याला १ रु. बक्षीस देण्यात येईल हे जाहीर केले आणि लोक रेल्वेप्रवास करू लागले.बोरीबंदर-ठाणे हे अंतर २१ मैलांचे (३४ किमी) आहे. हे अंतर कापायला गाडीने तब्बल १ तास १२ मिनिटे घेतली. यामध्ये गावागावात लोक तिच्या स्वागताला तयार होते. गाडी भायखळ्या जवळ आली तेव्हा तिच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती. लोक दाटीवाटीने गच्चीवर ,डोंगरावर उभे राहून या चमत्काराला नमस्कार करत होते आणि दुपारी ४.५८ वाजता गाडी ठाणे स्टेशनावर पोहोचली ,तेव्हा तिच्या स्वागतासाठी ठाण्यात भव्य शामियाना उभारण्यात आला होता. ठाणे रेल्वे स्थानकावरही ही गाडी पाहण्यास लोकांनी गर्दी केली होती. त्या काळी ठाणे स्थानक छोटं आणि कौलारू होतं. सर्व पाहुण्यांना शाही मेजवानी देण्यात आली. तेथे प्रतिष्ठितांची भाषणे होऊन संध्याकाळी ६.३० वाजता ठाणे सोडून बरोबर ५५ मिनिटांनी गाडी पुन्हा बोरिबंदर स्टेशनावर पोहोचली.
             असा होता पहिल्या आगगाडीचा प्रवास. कोणत्याही चमत्काराला देवत्व बहाल करणा-या भारतीयांनी या गाडीचे नामकरण केले, 'चाक्या म्हसोबा '. पहिल्या रेल्वे गाडीला १४ डबे होते. तिस-या वर्गाचे डबे फारच गैरसोयीचे होते. त्यात बसण्यासाठी बाकेच नव्हती. प्रवाशांना उभं राहूनच प्रवास करावा लागत होता. खिडक्याही इतक्या उंचीवर होत्या की, प्रवाशांना उभे राहिल्यानंतरही खिडकीतून बाहेरचे दृश्य दिसत नसे. त्यामुळे स्वाभाविकपणेच या गाडीला ‘बकरा गाडी’ असे संबोधले जात असे.

       काळ बदलला तसे रेल्वेचे रूप बदलत गेले. ऐश आराम  करण्यासाठी सुद्धा रेल्वे सुरु झाल्या. सध्या भारतात अश्या ५ खास गाड्या चालवल्या जातात
*१) महाराजा एक्सप्रेस* 
*२) पॅलेस ऑन व्हील्स*
*३) रॉयल राजस्थान ऑन व्हील्स*
*४) दि  गोल्डन  चॅरिओट*
*५) डेक्कन ओडिसी*  
भारतीय रेल्वेच्या महाकाय  जाळ्याला  सलाम , सलाम,सलाम .

मोकाट फिरणारे, बिनकामान्यांना कोणीतरी आवरा, नागरीकांची आर्त हाक !!

मोकाट फिरणारे, बिनकामान्यांना कोणीतरी आवरा, नागरीकांची आर्त हाक !!


कल्याण, (संजय कांबळे) : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार उडवला असताना, व्हॅन्टीलेटर, आॅक्शिजन इतकेच नव्हे तर साधे बेड देखिल कोरोना पाॅझिटिव्ह पेशंट ला मिळत नसल्याने अशा रुग्णांना जमिनीवर, खुर्चीत, रिक्षात बसवून उपचार सुरू असल्याची विदारक चित्र सर्व राज्यांत असताना काही बिनकामे, उड्डाणटफू संचारबंदी देखील बिनधास्त, मोकाट फिरत असल्याची पाहून यांना कोणीतरी आवरा अशी आर्त हाक नागरिकांची आहे. त्यामुळे आता पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.


संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची विदारक परिस्थिती आहे. कुठेही खाजगी किंवा सरकारी दवाखान्यात बेड शिल्लक नाही, रेमडिसिवीर औषध मिळेना झाले आहे. अशातच आता आॅक्शिजन चा तूडवडा जाणवू लागला आहे. अनेकांचा आॅक्शिजन अभावी जीव गेला आहे. कल्याण डोंबिवली चा विचार केला तर येथे उपचार करायला जागा नाही. मुंबई वरळीत तर खाजगी कंपनीकडून आॅक्शिजन सिंलेडर घरी नेले जात आहे. रोज हजारो कोविड टेस्ट केल्या जात आहेत. यातून दररोज शेकडो पाॅझिटिव्ह सापडत आहेत. शहरातील कोरोना आता गावा गावात पोहचला आहे
कल्याण तालुक्यातील कांबा वरप म्हारळ, गोवेली, म्हसकळ, निंबवली खडवली, घोटसई, आपटी, उतणे चिंचवली, बापसई, राया ओझल्री नडगाव, दाणबाव, खोणी वडवली रायते, मानवली अशा सर्वच गावात पेंशट आहेत. अनेकांचा मृत्यू झाला आहे. होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव, खडवली, निळजे तसेच ग्रामीण रुग्णालय गोवेली मधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सिस्टर हे देखील कोरोनाचे शिकार होत आहेत. वरप येथील कोरोना कोविड सेंटर मध्ये कोविड तपासणी केली असता यातील ९ रुग्ण पाॅझिटिव्ह आले आहेत. स्मशानात नंबर लागले आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने १४ एप्रिल पासून राज्यात संचारबंदी लागू केली. मात्र याचे कुठे ही पालन होताना दिसत नाही. कल्याण मुरबाड महामार्गावर बिनधास्त बिनकामे फिरताना दिसतात, म्हारळ, वरप, कांबा, पाचवामैल, रायते, उल्हास नदीवर, तसेच म्हारळ गावात यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील बहुतेकांनी मास्क घातले नव्हते. ग्रामपंचायत दंडात्मक कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तेथे दादागिरी, वादावादी, होते. त्यामुळे तेही दुर्लक्ष करित आहेत. या परिसरात लाॅकडाऊण आहे का या बद्दल शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पोलिसांनीच याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
 
प्रतिक्रिया - आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही पुरेपूर अंमलबजावणी करतो आहे, दडांत्मक कारवाई देखील केली आहे. पण काही बिनकामे ऐकत नाहीत, येथे पोलिसांनी लक्ष द्यावे '-श्रीमती अश्विनी निलेश देशमुख, उपसरपंच, म्हारळ ग्रामपंचायत ता कल्याण.

अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी आलेले 15 हजार चेक बाउन्स, तांत्रिक चुकांची शक्यता. !!

अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी आलेले 15 हजार चेक बाउन्स, तांत्रिक चुकांची शक्यता. !!


अरुण पाटील, भिवंडी :
             अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणाच्या कार्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून देणगीच्या स्वरूपात गोळा करण्यात आलेले जवळपास 15 हजार बँक चेक बाउन्स झाले आहेत. या चेकचे मूल्य 22 कोटी रुपये इतके आहे. चेक खात्यांमध्ये कमी रक्कम असल्याने किंवा काही तांत्रिक चुकांमुळे हे चेक बाउन्स झाल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास ऑडिट रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे.
             यंदाच्या मकर संक्रांतीपासून राम मंदिर निर्माणासाठी देणगी स्वीकारण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याद्वारे करोडो रुपये जमा झाल्याची माहिती आहे. देश-विदेशातून लोकांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी उत्स्फुर्तपणे देणगी देऊ केली आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांसह इतर राज्यातील नेत्यांनीही देणगी दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
           चेक बाउन्स बाबत तांत्रिक अडचणींवर बँक कर्मचारी काम करत आहेत. संबंधित देणगीदारांना पुन्हा दान करण्याची विनंती करण्यात येत आहे. यातील जवळपास दोन हजार चेक अयोध्येमध्येच संग्रहित करण्यात आले आहेत, असे न्यासचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले.अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहिमेमध्ये मुस्लीम समाजातील नागरिकही देखील मागे राहिलेले नाहीत. अयोध्येच्या पवित्र नगरीला धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनविण्यासाठी वासी हैदर यांच्याकडून 12 हजार, तर शाह बानो यांच्याकडून 11 हजार रुपयांची वर्गणी देण्यात आली आहे.
       बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महा अभियानाचे स्वागत केले आहे. "राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिमांनी पुढाकार घेऊन दान केले तर नक्कीच हे दोन्ही धर्मातील एकोपा वाढविण्याचे संपूर्ण देशात प्रतिक ठरेल", असे अन्सारी म्हणाले होते.
          राम मंदिर निर्माणासाठी देणगी गोळा करण्याचे अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत विश्व हिंदू परिषदेने 15 जानेवारी पासून 17 फेब्रुवारीपर्यंत जमा केलेल्या देणगीमध्ये या चेकचा समावेश आहे. देणगी गोळा करण्याच्या मोहिमेद्वारे जवळपास पाच हजार कोटींची रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, न्यासकडून अधिकृतरीत्या कोणतीही आकडेवारी सांगण्यात आलेली नाही

Wednesday, 14 April 2021

हनुमानाचा जन्म कुठे झाला यावरून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वाद सुरु ! 'दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनी हनुमानाचा जन्म आपल्याच राज्यात झाल्याचा दावा केला आहे'

हनुमानाचा जन्म कुठे झाला यावरून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वाद सुरु !


'दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनी हनुमानाचा जन्म आपल्याच राज्यात झाल्याचा दावा केला आहे'

अरुण पाटील, (भिवंडी) :
      श्रीरामभक्त मारूतीरायाचा जन्म कुठे झाला? या प्रश्नावरून आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात वाद निर्माण झाला आहे. दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनी हनुमानाचा जन्म आपल्याच राज्यात झाल्याचा दावा केला आहे. कर्नाटकमधील शिवमोगातील धर्मगुरुंनी हनुमानाचा जन्म हा उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण इथे झाल्याचा दावा केला आहे.
        यापूर्वी कर्नाटकातीलच दुसऱ्या एका धर्मगुरुंनी दावा केला होता की हनुमानाचा जन्म हा कोप्पल जिल्ह्यातील आणेगुडीजवळच्या किश्किंदा भागात असलेल्या अंजनाद्री पर्वतरांगेत झाला होता. कर्नाटकातील धर्मगुरुंचे दावे ऐकून संतापलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थान विश्वस्त मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की हनुमानाचा जन्म कर्नाटकात नाही तर आंध्र प्रदेशात झाला होता. तिरुपती इथल्या सात पर्वतांपैकी अंजनाद्री नावाच्या पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला होता असा दावा करण्यात आला आहे.
            कर्नाटकातील शिवमोगा येथील रामचंद्रपुरा मठाचे प्रमुख असलेल्या राघवेश्वरा भारती यांनी रामायणामधील काही वाक्यांचा हवाला देत म्हटले आहे की की खुद्द हनुमानानेच सीतेला सांगितले होते की त्याचा जन्म गोकर्ण इथे झाला आहे. राघवेश्वरा भारती यांनी म्हटलंय की रामायणातील या वाक्यामुळे हे सिद्ध होतं की हनुमानाची जन्मभूमी ही गोकर्ण होती तर कर्मभूमी ही अंजनाद्री येथील किश्किंदा होती.
           कर्नाटकाचे दावे खोडून काढण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानातर्फे एक समितीच स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये वेदांचा गाढा अभ्यास असलेले तज्ज्ञ, पुरातत्वाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती आणि इस्रोच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. या समितीला 21 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी अधिकारी के.एस.जवाहर रेड्डी यांनी म्हटलंय की हनुमानाचा जन्म हा आंध्र प्रदेशातील अंजनाद्री पर्वतावर झाला होता आणि आमच्याकडे त्याचे पौराणिक तसेच ऐतिहासिक, पुरातत्वशास्त्रीय पुरावेही आहेत.
            एकीकडे आंध्र प्रदेशात ही समिती नेमण्यात आली आहे तर दुसरीकडे कर्नाटकात अंजनाद्री येथील किश्किंदा भागाला हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून घोषित करण्याच्या योजनेला वेग आला आहे. हंपीजवळच्या किश्किंदा भागाचा रामायणामध्ये उल्लेख असून याच ठिकाणी लक्ष्मणाची आणि हनुमानाची भेट झाल्याचे सांगितले जाते. किश्किंदा भाग हा हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून घोषित करून तिथे मोठ्या संख्येत भाविक यावेत यासाठी सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं कोप्पलचे पालकमंत्री बी.सी.पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने काँग्रेस कमिटीचे रक्तदान शिबिर संपन्न !!

डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने काँग्रेस कमिटीचे रक्तदान शिबिर संपन्न !! 


मुरबाड, (मंगल डोंगरे) :

बुधवार, दि.१४ एप्रिल २०२१ रोजी  विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने मुरबाड तालुका काँग्रेस कमिटी आयोजित रक्तदान शिबिर तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रिपाइं सेकुल्यरचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चंदने, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संघजा मेश्राम, ओ.बी.सी सेलचे जिल्हाध्यक्ष दिनेश सासे, जेष्ठ नेते पुंडलिक चहाड सर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.शांतारामभाऊ घोलप सभागृह, काँग्रेस भवन, मुरबाड येथे संपन्न झाले. 


राज्यामध्ये रक्ताचा साठा कमी असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने राज्यव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा व तालुका स्तरीय करण्याचे निर्देश दिले होते. त्याचा भाग म्हणुन मुरबाड तालुक्यामध्ये सदरच्या शिबिराचे आयोजन केल्याचे चेतनसिंह पवार यांनी प्रतिपादन केले. यावेळी 42 रक्त दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. ज्यामध्ये स्वतः तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी ही रक्तदान केले. "चेतनसिंह पवार" यांनी आतापर्यंत तब्बल 18 वेळा रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावले आहे. तर सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संध्या कदम, युवकचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला शहराध्यक्ष शुभांगी भराडे, विचारमंचचे शहराध्यक्ष गणेश खारे, तालुका उपाध्यक्ष नेताजी लाटे, तालुकासंघटक अमोल चोरघे, विद्यार्थी नेते स्वप्निल जाधव आदींनी प्रचंड मेहनत घेतली. तर सदर शिबीरास झुंजार आंदोलक रमेश हिंदुराव सर, जेष्ठ पत्रकार मंगलजी डोंगरे, श्याम राऊत,जयदिप अढाइगे यांनी भेट दिली. मुरबाड तालुक्यात काँंग्रेस पक्ष बळकट होत असुन, अनेक समाजोपयोगी कार्यक्रम सातत्याने राबविले जात आहेत. 

भविष्यामध्ये जास्तीत जास्त समाजोपयोगी कार्यक्रम करुन काँग्रेसचे विचार घराघरात पोहचविणार असल्याचे मत यावेळी संध्या कदम यांनी व्यक्त केले.

मुरबाड मध्ये डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आधार फाऊंडेशन व अखिल मुरबाड प्रा. शिक्षक संघाचे रक्तदान शिबीर संपन्न !!

मुरबाड मध्ये डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आधार फाऊंडेशन  व अखिल मुरबाड प्रा. शिक्षक संघाचे  रक्तदान शिबीर संपन्न !!  


मुरबाड, (मंगल डोंगरे) : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती* निमित्ताने *आधार फाऊंडेशन सामाजिक संस्था मुरबाड व अखिल मुरबाड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या* वतीने *पंचायत समिती मुरबाड* येथे रक्तदान शिबीर पार पडले. राज्यात सह संपूर्ण देशभरात पुन्हा कोरोना वाढत चालला आहे.. पेशेंट संख्या वाढत असताना राज्यात रक्ताचा तुटवाडा भासत आहे.त्या अनुषंगाने कोरोना ग्रस्तानां अशा परिस्तिथीत मदत व्हावी. रक्त पुरवठा तात्काळ उपलब्ध व्हावा ह्या उदात्त हेतूने संस्थेच्या वतीने आवाहन केल्यानंतर आज 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करण्याची खुप इच्छा असतांना कोरोना प्रतिबंध लस घेतली असल्याने 21 जणांना माघारीही  जावे लागले आहे.
      या शिबिरास मा.सुभाषदादा पवार उपाध्यक्ष जि. प ठाणे, मा. दिपक पवार सभापती प. स. मुरबाड, श्रीकांत धुमाळ मा. सभापती, मा. संतोष भोसले शिक्षणाधिकारी ठाणे, मा. रमेश अवचार गट विकास अधिकारी, रवींद्र चंदणे आर. पी. आय सेक्युलर, दिनेश उघडे अध्यक्ष आर पी आय (आठवले), मा. श्री कांतीलाल कंटे, शिवसेना तालुका प्रमुख, मा. श्री रामभाऊ दळवी, मा. श्री प्रकाश पवार सर, मा. सौ. लांबटे मॅडम, मा. मोहन भावार्थे, श्री निलेश अहिरे, श्री गोविंद खाटेघरे, श्री. अण्णा इसामे, विजय उंद्रू भोईर .तसेच पत्रकार बंधू मंगलजी डोंगरे, जयदीप आढाएगे, प्रकाश जाधव, किशोर गायकवाड, राजीव चंदणे, सचिन वाघचौडे इत्यादीनी शिबिरास भेट दिली. मान्यवरांनी प्रतिकूल परिस्थिती असतांना संस्थेच्या उत्तम कार्याची प्रशंसा केली. प्रत्यक्ष भेटीने रक्तदात्यांचे अभिनंदन केले.यावेळी  *संकल्प ब्लड बँक* च्या वतीने ब्लड संकलन टीमचे ही कौतुक केले.
       या शिबिरासाठी संघटनेच्या वतीने श्री. संजय घागस, श्री. कैलास कोर, श्री. नितीन राणे, श्री. महेश देशमुख, श्री. मंगेश इसामे, श्री दीपक देसले, श्री. अनंत विशे, श्री. गजानन भोईर, श्री. जयवंत लाटे, श्री. अरुण गोडांबे,श्री. योगेश चौधरी, श्री. विनोद कोर, श्री. गौतम रातांबे, श्री. विलास शिंदे,श्री. अशोक गोडांबे,श्री. कचरू टेकडे, श्री. दिनेश भावार्थे, श्री.पद्माकर हरड, श्री. लक्ष्मण चोरघे,श्री. संजय घुडे, श्री दिलीप कराळे, श्री दिगंबर पोटे, श्री अमोल शिंदे, श्री. भगवान गायकर, इ मेहनत घेऊन कोरोनाचे नियम पाळून रक्तदान शिबीराचे उत्तम नियोजन केले होते.
        अखिल मुरबाड प्राथमिक संस्थेचे अध्यक्ष तथा आधार फाउंडेशन  चे सचिव श्रीयुत नितीन राणे सरांनी यापुढे असेच सामाजिक कार्य संस्था व संघटनेच्या माध्यमातून होत राहतील असे सांगितले.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...