Saturday, 26 June 2021

झपुर्झा : हसले मनी चांदणे - वर्ष 9 !! "पहाता येणार डॉ. क्षितिज कुळकर्णी यांनी लिहिलेली १२ नाटके"

झपुर्झा : हसले मनी चांदणे - वर्ष 9 !!
"पहाता येणार डॉ. क्षितिज कुळकर्णी यांनी लिहिलेली १२ नाटके"


ठाण्यातील अजेय नाट्य संस्थेच्या  12 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत वर्षानुवर्षे अविरतपणे सुरू असलेल्या झपुर्झा या महोत्सवाचं यंदाचे हे 9 वे वर्ष. यंदाचा झपुर्झा हा पुन्हा एकदा नव्या स्वरूपात, नव्या रंगात आणि नव्या थीम मध्ये आपल्याला अनुभवता येणार आहे. यंदाची झपुर्झाची थीम आहे हसले मनी चांदणे. 


झपुर्झा हसले मनी चांदणे मध्ये अजेय संस्थेचे संस्थापक लेखक, दिग्दर्शक डॉ. क्षितीज कुलकर्णी यांनी लिहिलेली एकूण 12 नाटके ही आपल्याला पाहता येणार आहेत. डॉ. क्षितीज कुलकर्णी यांच्यासोबत अजेय मधील त्यांचे काही सहकारी कलाकार सुद्धा त्यांच्या बरोबरीने यातील काही नाटकांचे लेखन व दिग्दर्शन करणार आहेत.  याच बरोबर झपुर्झा - हसले मनी चांदणे या झपुर्झा सोहळ्यात आपल्याला अजेय संस्थेच्या शतकोटी रसिक या व्हॉटसऍप समूहातील गुणी गायक मंडळींना अजेयच्या झपुर्झा या कार्यक्रमात गायनाची संधी देऊन त्यांचे गुणात्मक मूल्यमापन करून त्यातील निवडक गुणवंत गायकांचा शतकोटी सूररत्न या पर्वाअंतर्गत सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच झपुर्झा मध्ये दरवर्षीप्रमाणेच अतिशय उत्सुकतेचा भाग असतो तो म्हणजे झपुर्झा पुरस्कार ( 👑 ) यावर्षी सुद्धा नाट्य, गायन, नृत्य, लेखन, दिग्दर्शन, प्रमोशन यात आधीपासूनच अजेय मध्ये असलेल्या व यावर्षी पदार्पण केलेल्या तसेच या सर्व विषयांत आपली विशेष चमक दाखवणाऱ्या कलाकारांना यंदाच्या झपुर्झात सुद्धा विविध पुरस्कार व इतर गुणवत्ता प्रमाणपत्रे यांनी  सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच नेहमीप्रमाणेच यंदाच्या झपुर्झा मध्ये सुद्धा अजेयच्या वार्षिक अंक "शब्दझपुर्झा" चे सुद्धा लाईव्ह प्रकाशन होणार आहे.

झपुर्झा या अजेय संस्थेच्या कार्यक्रमामागची विशेष बाब अशी की गेली 9 वर्षे अजेय संस्थेचे सर्वच उपक्रम तसेच झपुर्झा या महोत्सवाची निर्मिती ही संस्थेचा तरुण निर्माता गौरव संभुस याने केली आहे.  अजेय संस्थेने यंदाचा झपुर्झा हा Mix Media Theatre च्या माध्यमातून प्रक्षेपित केला जाणार आहे. झपुर्झा हा कार्यक्रम 27 जून 2021 रोजी प्रक्षेपित होणार आहे.

तिकीट बुक करण्यासाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा..
*संपर्क क्रमांक - 9930175527*

झपूर्झा वर्ष 9वे : हसले मनी चांदणे !
लेखक,दिग्दर्शक डॉ.क्षितिज कुलकर्णी
निर्माता - गौरव संभुस : Mix media theater ! *दिनांक - २७ जून २०२१* अजेय सामाजिक संस्था

मुरबाड मध्ये ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपाचे रास्तारोको आंदोलन !!

मुरबाड मध्ये ओबीसींच्या आरक्षणासाठी  भाजपाचे रास्तारोको आंदोलन !!  


मुरबाड, (मंगल डोंगरे) : राज्यातील ओबीसींचे  राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केले असून, ते पुन्हा मिळावे यासाठी ओबीसींनी अनेक आंदोलने केली असताना, राज्य सरकार कुठलीही निर्णायक भुमिका घेत नाही. त्यामुळे रद्द झालेले आरक्षण जसेच्या तसे मिळावे.म्हणून आज संपूर्ण राज्यभर रास्ता रोको, चक्का जाम आंदोलनाचे मुरबाड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी

*ऊठ ओबीसी बांधवा ऊठ 
लढण्या आपल्या हक्कांसाठी,
विजयी होण्या संघर्षातून
दाखवी आपुली एकजूट.*....

अशा घोषणा देत तिनहात नाका मुरबाड येथे ठिय्या करत,रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या वेळकाढूपणा आणि नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याच्या निषेधार्थ या बेजबाबदार सरकारचा धिक्कार करण्यासाठी तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू झाल्याशिवाय राज्यात कोणत्याही निवडणूका घेऊ नयेत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका आणि मुरबाड शहर तसेच भाजपा ओबीसी मोर्चा मुरबाड तालुका आणि मुरबाड शहर तर्फे कार्यसम्राट आमदार *मा. श्री. किसनजी कथोरे साहेबांच्या* प्रमुख उपस्थितीत
हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


याप्रसंगी भाजपाच्या सर्व सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

एक दिवसाच्या कस्टडीत इक्बाल कासकरची NCBकडून 7 तास चौकशी; ड्रग्स आणि टेरर फंडिंगबाबत महत्त्वाचे खुलासे आले समोर.!

एक दिवसाच्या कस्टडीत इक्बाल कासकरची NCBकडून 7 तास चौकशी; ड्रग्स आणि टेरर फंडिंगबाबत महत्त्वाचे खुलासे आले समोर.!


अरुण पाटील, भिवंडी, दिं.26 :
            एनसीबीनं (NCB) अलीकडेच दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची कस्टडी घेऊन ड्रग्स आणि टेरर फंडिंग प्रकरणाची  चौकशी केली आहे. त्याचबरोबर अमली पदार्थांच्या पुरवठ्या  संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. काल (दिं.25 ) रोजी भिवंडी न्यायालयाने एक दिवसाची कस्टडी सुनावली असून NCBने इक्बाल कासकरची तब्बल 7 तास चौकशी केली. या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आली आहे. यावेळी इक्बाल कासकरला भारत आणि पाकिस्तान सीमेचा नकाशा दाखवून अनंतनाग मार्गे सीमा ओलांडून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या मार्गाबाबतही विचारणा करण्यात आली आहे.
            यावेळी एनसीबीनं शब्बीर उस्मान शेख आणि इक्बाल कासकर यांची समोरासमोर चौकशी केली. शब्बीर उस्मान शेख हा जम्मू-काश्मीरमार्गे सीमेपलीकडून चरस तस्करीतील मुख्य आरोपी आहे. एनसीबीच्या मते, अटक केलेला आरोपी शब्बीर शेख हा इक्बाल कासकरचा जुना मित्र आहे. इक्बाल कासकरला 2003 मध्ये दुबईहून भारतात हद्दपार करण्यात आलं होतं. त्यावेळी शब्बीर हा इक्बाल कासकरसोबत डी-कंपनीच्या खंडणी व ड्रग्स व्यावसायात सक्रिय होता. त्यावेळी शब्बीर हा कासकरचा खास माणूस होता.त्याच बरोबर, 2015 मध्ये इक्बाल कासकर आणि शब्बीर शेख यांनी एका रिअल इस्टेट एजंटला 3 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पण त्यानं पैसे न दिल्यानं दोघांनी संबंधित एजंटला बेदम मारहाण केली होती. ज्यामुळे दोघांना अटकही करण्यात आली होती. पण नंतरच्या काळात डी-कंपनीकडून शब्बीरला केवळ ड्रग्सचा व्यवसाय करण्याची जबाबदारी देण्यात आली.
          यानंतर शब्बीर दर महिन्याला 15 ते 20 किलो चरस मुंबईत छुप्प्या मार्गानं आणत होता. म्हणजेच एकटा शब्बीर दरमहा 10 कोटी रुपये ड्रग्समधून कमावत होता. याप्रकरणाची चौकशी सुरू असताना शब्बीरनं आपण इक्बाल कासकरसाठी काम असल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारेच एनसीबीनं मकोका कोर्टाकडे कासकरची कस्टडी मागितली होती. सध्या NCB इक्बाल कासकर आणि शब्बीर यांच्या एकत्रित चौकशी करत आहे. त्यामुळे ड्रग्स आणि अंडरवर्ल्डशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

रोटरी क्लब चोपडा तर्फे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्याहस्ते ८ शिलाई मशीनचे गरजू महिलांना वाटप !

रोटरी क्लब चोपडा तर्फे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्याहस्ते ८ शिलाई मशीनचे गरजू महिलांना वाटप !
'प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी चोपडा भेटीत केले कौतुक'.


चोपडा, वार्ताहर.:

चोपडा रोटरी क्लब सातत्याने आपली सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात या वर्षी सुध्दा विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे.करोना च्या दुसऱ्या लाटेत कुटुंब चे कुटुंब उद्ध्वस्त झाले. करोना च्या भयानक लाटेत कुटुंबातील करता पुरुष गेल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घरातील महिलेवर आली. साधारण परिस्थिती मधून कसाबसा आपला घर परिवार चालवित होती. अश्या कर्तबगार आणि होतकरू महिलेंना बळ देण्यासाठी व त्यांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा च्या वतीने अश्या गरजू व निराधार महिलेंना मोफत शिलाई मशीन भेट देऊन त्यांना स्वावलंबी होण्यास रोटरीने माणुसकीचा व मदतीचा हात दिला. या वर्षी रोटरीतर्फे 5000 मास्क चे मोफत वाटप, तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन चे लोकार्पण, आदिवासी पाड्यांवर कपडे वाटप, आर्थोपेडिक लायब्ररी सुरू केली, अशा अनेक विविध सेवा कार्य करीत आहे. 

प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्या शुभहस्ते लिलाबाई शिंदे, मनीषा प्रदीप पाटील, विद्याबाई गुलाब मराठे, छाया प्रताप मराठे, मायाबाई भिकन बोरसे, नेहा जितेंद्र पालीवाल, रत्‍नाबाई नवल साळुंखे, अर्चना प्रकाश महाजन अश्या आठ गरजू महिलांना शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले फक्त शिलाई मशीन देऊन न थांबता रोटरी क्लब तर्फे त्यांना मोफत प्रशिक्षण देणार आहेत ज्यातून त्यांना स्वयम् रोजगार निर्मिती होईल असे रोटरी अध्यक्ष यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल शब्बीर शाकीर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी टॉबी भगवागर, सह प्रांतपाल योगेश भोळे, कॉन्फरन्स चेअर अतुल शहा, फर्स्ट लेडी जुमानाजी, रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव, मा.सचिव ॲड.रुपेश पाटील मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, रोटरी प्रार्थना व पोलारीस यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील सर प्रस्तावना रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी वर्षभर केलेल्या कार्याची माहिती दिली, आभार प्रदर्शन मा.सचिव ॲड.रुपेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमासाठी पत्रकार बंधू व रोटरीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 25 June 2021

चिंताजनक ! राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी दहा हजाराच्या घरात !

चिंताजनक ! राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी दहा हजाराच्या घरात !



मुंबई : राज्यात आज 9,677 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10,138 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,72,799 इतकी झाली आहे. आज 156 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.94 टक्के एवढे झाले असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,05,96,965 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,17,035 (14.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,33,748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,248 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 1,20,715 अॅक्टिव्ह केसेस आहेत.

राज्यात पुन्हा निर्बंध लागू ! सर्वच जिल्हे व महानगरपालिका यांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश !!

राज्यात पुन्हा निर्बंध लागू ! सर्वच जिल्हे व महानगरपालिका यांचा तिसऱ्या टप्प्यात समावेश !! 



मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर राज्य सरकारनं पाच टप्प्यांमध्ये राज्यातील निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात केला आहे

आज राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगर पालिका पुढील आदेश येईपर्यंत या तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत.

आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून २ आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार निर्णय घेतले जातील. मात्र, निर्बंध वाढवायचे असल्यास दोन आठवड्यांच्या आकडेवारीची वाट पाहण्याची गरज नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

नवीन नियमावली नुसार तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल. त्याचसोबत आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकानं ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.

मंदिरे कधी खुली करणार भक्तांचा टाहो ....सगळ्यांवरचे निर्बंध शिथिल मग देऊळे का बंद? भाविक भक्तांची प्रशासनास आर्त साद

मंदिरे कधी खुली करणार भक्तांचा टाहो ....सगळ्यांवरचे निर्बंध शिथिल मग देऊळे का बंद?

भाविक भक्तांची प्रशासनास आर्त साद


उर्मिला जाधव, टिटवाळा -: गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले मंदिर कधी उघडणार असा सवाल भाविक-भक्त करीत आहेत. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने २१ जून पासून सर्वच अस्थापनांची बंधने शिथिल करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. परंतु मंदिरे उघडण्यास प्रशासने परवानगी देत नसल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.


राज्य शासनाने २१ जून पासून लाॅकडाऊन शिथिल केल्याने बियर बार, वाईन शॉप, बिअर शॉप, देशी दारूची दुकाने, हॉटेल, सिनेमागृह लग्नाचे हॉल, सलून, पार्लर आदींना अस्थापना सरकारने पूर्णवेळ उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र याच लाॅकडाऊच्या शिथिलते मध्ये  मंदिरे उघड्याची कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे सध्या मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व नवसाला पावणारे म्हणून मोठी ख्याती पावलेले सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा येथे आहे. हे मंदिर गेल्या दोन वर्षात केवळ तीन महिने सुरू होते.


आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने अनेकांनी साकडे घालून नवस केलेले आहेत. ते नवस फेडण्यासाठी अनेकांनी मंदिरात जाऊन आपल्या देवाला भक्तिभावाने पाहण्याची इच्छा असते. कोणी नवीन वाहन खरेदी केलेले असते तर कोणाला नवीन व्यवसाय सुरु करावयाचा असतो. तर काहींना नवविवाहितेला आपल्या कुलदेवतेला दर्शनास घेऊन जाण्याची इच्छा असते. यासाठी अनेक भाविक मंदिर ट्रस्टींना फोन करून मंदिर कधी उघडणार आम्हाला आत मध्ये प्रवेश कधी मिळणार, आम्ही देवाचे दर्शन घेऊ शकतो का ? अशी विनंती करतात. परंतु सरकारने केवळ मंदिरांवर घातलेल्या निर्बंधांमुळे भाविकांची मोठी अडचण होत आहे. 

त्याचप्रमाणे मंदिराच्या आजुबाजूला असलेल्या फुल, हार, पूजा साहित्य विक्रेते, हॉटेल व्यवसायिक, सुरक्षा रक्षक, पार्किंग व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच मंदिरात असलेले आचारी, साफ सफाई करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून मंदिराचे उत्पन्न बंद असल्याने त्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मंदिरे बंद असल्याने मंदिर ट्रस्ट कडून गोरगरिबांना होणारी मदत पूर्णपणे बंद आहे. मंदिर ट्रस्टीकडून अनेक लोकोपयोगी शिबिरे, उपक्रम राबविले जातात त्यामध्ये मोफत आरोग्य शिबीर, शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर, वह्या पुस्तके वाटप, आरोग्य शिबिर असे विविध उपक्रम राबविणे मंदिर ट्रस्टींना शक्य होत नसल्याने गोरगरिबांना त्या सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.

मंदिर ट्रस्ट कडून राज्य सरकारने आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आखून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पालन पालन करण्याचे ट्रस्टीकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये दोन भाविकांमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवणे, प्रत्येकाचे टेंपरेचर चेक करून ऑक्सी मीटरने ऑक्सिजन लेवल चेक करणे, हातावर सैनीटायजर टाकून हात स्वच्छ करणे, त्याचप्रमाणे आजारी भाविकांना आत प्रवेश न देणे या गोष्टी काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहेत. तरीदेखील राज्यसरकार मंदिरे उघडण्यास परवानगी देत नसल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार भाविकांवर प्रचंड अन्याय करीत असल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. टिटवाळा येथील मंदिर लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी भाविक-भक्त प्रशासनाला आर्त हाक साद घालत आहेत.

प्रशासनाने सर्व आस्थापना २१ जून‌ पासून सुरू केली, परंतू लोकांच्या श्रध्दा व भावनचे ठिकाण म्हणजे मंदिरे. ती बंदच ठेवली आहेत. ती लवकरात लवकर सुरू करावी व आम्हाला आमच्या देवाची भेट व्हावी.
नारायण सुरोशी, भाविक

टिटवाळा गणेशाला मोठ्या भक्तिभावाने अनेकांनी साकडे घालून नवस केलेले आहेत. ते नवस फेडण्यासाठी अनेकांनी मंदिरात येऊन देवाला भक्तिभावाने पाहण्याची इच्छा आहे. यासाठी अनेक भाविक आम्हा मंदिर ट्रस्टींना फोन करून, मंदिर कधी उघडणार, आम्हाला आत मध्ये प्रवेश कधी मिळणार, आम्ही देवाचे दर्शन घेऊ शकतो का ? अशी विनंती करतात.
सुभाष जोशी, विश्वस्त, टिटवाळा गणपती मंदिर

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...