Sunday, 9 March 2025

डोंबिवली येथे आखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे‌ समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार !

 

डोंबिवली येथे आखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे‌ समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार !


डोंबिवली, प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'सन्मान स्त्रीशक्तीचा' सोहळा आखिल भारतीय महासंघाच्या ठाणे जिल्हा कमीटी व डोंबिवली शहर कमीटी तर्फे समाजातील नऊ कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 


व्यासपीठावर आखिल ब्राह्मण महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर, टिळकनगर (डोंबिवली) पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम, पोलिस निरीक्षक थोरात, डॉ. मानसी करंदीकर (गायनकोलॉजिस्ट), योगअभ्यास तज्ञ व लेखिका डॉ. धनश्री साने, सौ. विजयालक्ष्मी बोडस आदी उपस्थित होते. ब्राह्मण महासंघाच्या महिला पदाधिकारी यांनी महिलांचे स्वागत केले. डॉ. धनश्री साने व डॉ. मानसी करंदीकर यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान झाला. यामध्ये‌ अनुजा रानडे, प्राची कुलकर्णी, संध्याताई पाटील, वर्तक मॅडम, पोलिस अधिकारी भडकमकर, नेत्रा वैद्य, संगीता रानडे, वृषाली दापके, प्रिया साठे, पवार यांचा समावेश होता.


डॉ. मानसी करंदीकर यांनी महिलांना वयोगटानुसार आजार व काळजी यावर मार्गदर्शन केले, डॉ धनश्री साने यांनी महिलांना स्वतःसाठी कसे जगायचे व आनंदी कसे ठेवायचे यांचे मार्गदर्शन केले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांनी महिलांना गुन्हेगारी विषयावर व यात आपण कसे जागरूक रहायचे हे सांगितले. महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर यांनी ब्राह्मण महासंघाची उद्दिष्ट व कार्य यांची माहिती दिली.

संपूर्ण कार्यक्रम आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सुजाता वाळुंजकर, अनुजा रानडे, स्मिता श्रीवत्स, विजयालक्ष्मी बोडस, स्मिता डोरले, संगिता मोहरिल, प्राची भावे यांनी यशस्वीपणे पार पाडला.


नविन शैक्षणिक धोरणातुन उत्तम शिक्षण आणि योग्य प्रशिक्षणाने राष्ट्र विकासाला गती मिळेल - वरिष्ठ पोलिस निरिक्षक लालू तुरे यांचे प्रतिपादन

नविन शैक्षणिक धोरणातुन उत्तम शिक्षण आणि योग्य प्रशिक्षणाने राष्ट्र विकासाला गती मिळेल - वरिष्ठ पोलिस निरिक्षक लालू तुरे यांचे प्रतिपादन 

विरार, प्रतिनिधी : वसई तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजित “शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.०” या पाच दिवसीय शिबिराचा समारोप शनिवार दिनांक ८ मार्च रोजी  यश विद्या निकेतन स्कूल, विरार (पूर्व) येथे संपन्न झाला.

या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संभाजी भोजने, वसई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौं. माधुरी पाटोळे आणि यश विद्यानिकेतन शाळेच्या प्राचार्या सौ रुचिता ठाकूर मॅडम यांनी भेटी दरम्यान मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. लालू तुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी “उत्तम शिक्षण आणि योग्य प्रशिक्षणामुळे राष्ट्र विकासाला गती मिळते” असे सांगत शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले.

प्रशिक्षक प्रा. स्वाती जयकर यांनी “नवीन शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी आधुनिक स्पर्धात्मक जगातील क्षमता आत्मसात करणे गरजेचे आहे व त्या क्षमता आपल्या विद्यार्थ्यांना गरूडझेप घेण्यास सक्षम करतील” असे प्रतिपादन केले.

यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून महिला शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी शिक्षकांना कार्यमुक्ती प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

नवीन शिक्षण धोरणावर प्रा विलास खोपकर व प्राचार्या मुग्धा लेले या तज्ञांचे सखोल व प्रेरक मार्गदर्शन झाले. विद्यार्थ्यांसाठी क्षमताधिष्ठित कौशल्य  विकसित करण्याचा रोड मॅप प्रशिक्षणात प्रा. प्रज्ञाकिरण वाघमारे, प्रा महेश पाटील, भक्ती राऊत मॅडम, संजय चौधरी सर यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना दिला. शाळेचे मुल्यांकन प्रणाली SQAAF व समग्र प्रगती पुस्तक यावर प्रभावी भाष्य कॅरल रॅाड्रीक्स मॅडम, चंद्रकांत वीरकर सर, संघवी ठाकूर मॅडम यांनी केले. वसई तालुका शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणात समन्वयिका प्रिती राठोड मॅडम यांनी उत्तम व्यवस्थापन पाहिले व डॅा. प्रा. महादेव इरकर यांचे सहकार्य लाभले.

या उपक्रमात प्रश्न निर्मिती व ‘काऊट’ हे विशेष आकर्षण ठरले.

कल्याण पूर्व येथे सिमेंट मिस्कर ट्रकचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघाताची आमदार सुलभाताई गायकवाड यांनी घटनास्थळी केली पाहाणी‌ !

कल्याण पूर्व येथे सिमेंट मिस्कर ट्रकचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघाताची आमदार सुलभाताई गायकवाड यांनी घटनास्थळी केली पाहाणी‌ !

** घटनेची दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत तसेच जबाबदार व्यक्तींवर कारवाई मागणी 

कल्याण, ८ मार्च २०२५: कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवर आज दुपारी एक भीषण अपघात झाला. सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकने टेम्पो व रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, रिक्षाचालक रिक्षामध्ये अडकून गंभीर जखमी झाला. तसेच, इतर दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच माननीय आमदार सौ. सुलभाताई गणपत गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करून त्यांच्या उपचारांविषयी चौकशी केली. सद्यस्थितीत दोन जखमी चैतन्य रुग्णालयात, तर तीन जण अमेय रुग्णालयात उपचार घेत आहेत. जखमींची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना गंभीर दुखापती झाल्या असून, योग्य वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

सतत घडणाऱ्या अशा अपघातांमुळे वाहतूक पोलिसांनी पुणा लिंक रोड परिसरात विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना आमदार गायकवाड यांनी केली. विशेषतः विजयनगर परिसरातील उताराच्या रस्त्यावर दोन मोठ्या शाळा – ज्ञानमंदिर व सम्राट स्कूल – असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या उताराची पाहणी करून योग्य उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडे पत्र देण्याचा निर्णय आमदार गायकवाड यांनी घेतला आहे.

याशिवाय, या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त वयोवृद्ध मातोश्रींना व्हीलचेअर भेट !!

जागतिक महिला दिनानिमित्त वयोवृद्ध मातोश्रींना व्हीलचेअर भेट !!

** भटके विमुक्त सामाजिक संस्थेचा उपक्रम

प्रतिनिधी : कल्याण

जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मदतीने भटके विमुक्त सामाजिक संस्था आपले उपक्रम यशस्वीपणे पार पाडत असते त्यासाठी एकमेव निकष गरजू हाच असतो, समाजातील अशा गरजूंना शोधून जे कुठल्याही प्रकारची मदत पदरी पाडून घेण्यासाठी असमर्थ असतात अशा गरजूंना शोधून त्यांच्यापर्यंत मदत कशी पोहोचेल यासाठी भटके विमुक्त सामाजिक संस्था सदैव आग्रही असते. 

आज दि 8 मार्च 2025 रोजी नौदलातील निवृत्त अधिकारी यांच्या पत्नी ज्यांचे पती आपले देशसेवेचे कर्तव्य पार पाडून मृत पावले श्रीमती रेखा रामप्रसाद थापा या वयोवृध्द मातोश्री नां व्हीलचेअर व साडी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, आबासाहेब साठे, बाबु आढाव व इतर मान्यवर तसेच बाल गोपाल उपस्थित होते अशी माहिती मनीलाल डांगे यांनी दिली.

कोकणाच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्ष - संघटनांनी पुढे यावे - उद्योग मंत्री उदय सामंत

कोकणाच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्ष - संघटनांनी पुढे यावे - उद्योग मंत्री उदय सामंत

** ग्लोबल कोकण महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद हापूस आंब्याच्या होलसेल मार्केटला मोठा प्रतिसाद 

मुंबई, प्रतिनिधी : 
ग्लोबल कोकण सारख्या महोत्सवामुळे कोकणाची खरी ओळख सर्वांना होत आहे, तर समृद्ध कोकण सारख्या चळवळीमुळे कोकणवासीय परत कोकणात येण्यासाठी प्रोत्साहित होतील, म्हणूनच कोकणाच्या सर्वागीण विकासासाठी, समृद्धीसाठी आणि प्रगतीसाठी सर्व कोकणप्रेमी राजकीय पक्षांनी व संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री व कोकण महोत्सवाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केले आहे. 

दि. 6 ते 9 मार्च दरम्यान मुंबई, गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,  मला अभिमानाने सांगायचे आहे की कोकण हा कॅलिफोर्नियापेक्षा अधिक समृद्ध आणि प्रगत आहे. रत्नागिरी येथे संरक्षण क्लस्टर विकसित होत आहे, जिथे साडे सहा हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, आगामी सेमीकंडक्टर प्रकल्पामुळे २० हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त उद्योग तसेच कारखान्यांचे स्वागत केले पाहिजे, जे कोकणातील रोजगाराच्या संधी वाढवू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

ग्लोबल कोकण महोत्सवाला भेट देणाऱ्यांची खूप मोठी संख्या असून शाश्वत पर्यटनाचं महत्त्व अधोरेखित करणारी विशेष गॅलरी इथे पाहायला मिळत आहे तर बोरिवली नॅशनल पार्क, ठाणे मंग्रोव्ह आणि सह्याद्री पर्वतरांगांमधल्या जैवविविधतेची झलक या दालनात मांडण्यात आली आहे.

या महोत्सवात कोकणच्या लोककलेलाही विशेष स्थान दिलं आहे. कोळी नृत्य, तारपा नृत्य, जाखडी, गौरी नृत्य आणि दशावतार नाट्यप्रकार सादर केले जात आहेत. याशिवाय, आधुनिक मराठी संगीताला ग्लोबल स्टेजवर स्थान देण्यासाठी हिप-हॉप, रॅप आणि बीटबॉक्सिंगसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

महिला बचत गटांनी तयार केलेल्या स्थानिक हस्तकला वस्तु, खाद्यपदार्थ आणि विविध उत्पादनं इथे विक्रीसाठी ठेवली आहेत. कोकणच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी मालवणी, आगरी आणि संगमेश्वरी पदार्थांची खास दालनं असून त्याला खवय्यांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे.

कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव म्हणाले, "या वर्षी ग्लोबल कोकणला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कोकणची समृद्ध संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि पर्यटन स्थळांचा जागतिक स्तरावर प्रचार हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळावं, कोकणात तयार होणाऱ्या खास उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावीत आणि कोकणच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हा महोत्सव दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात आयोजित केला जातो तसेच हापूस आंब्याचे होलसेल मार्केट कोकणात सुरू करणार! थेट शेतकरी ते देशभरातल्या व्यापारी ही संकल्पना ग्लोबल कोकण राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्लोबल कोकण महोत्सवात गुंतवणूकदारांसाठी विशेष दालनं उभारण्यात आली आहेत. जेएसडब्ल्यू जिंदाल पोर्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, एमएसआरडीसी आणि सिडको यांनी कोकणातील नव्या पायाभूत सुविधांची माहिती इथे मांडली आहे.

*६ ते ९ मार्च दरम्यान नेस्को कॉम्प्लेक्स, गोरेगाव येथे सुरू असलेल्या या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कोकणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोकणाचा हा सांस्कृतिक आणि व्यावसायिक सोहळा अनुभवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.*

कोकणाची शोभा, संस्कृती आणि समृद्ध वारसा ग्लोबल कोकण फेस्टिवल या छताखाली पाहायला मिळत असून. इथे आलात की, सह्याद्रीच्या डोंगररांगा, निसर्गाच्या कुशीतली पर्यटन स्थळं, गजबजलेले समुद्रकिनारे आणि हिरवाईची चादर पांघरलेली जंगलं तुमच्यासमोर उभी राहत असल्याचे अनुभवायला मिळत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सौजन्य _
जयेश लडकू शेलार पाटील 
अध्यक्ष - कोकण विभाग 
कोकण विभाग पत्रकार संघ 

जागतिक महिला दिनानिमित्त शिल्पा तांगडकर जिवन गोरव पुरस्काराने सन्मानित !!

जागतिक महिला दिनानिमित्त शिल्पा तांगडकर जिवन गोरव पुरस्काराने सन्मानित !!

*कल्याण मध्ये स्फूर्ती फाउंडेशनच्या कार्याचा गौरव ; रोटरी क्लब ऑफ डायमंडस वतीने महिला सन्मान सोहळा*

कल्याण, प्रतिनिधी - जागतिक महिला दिनानिमित्त आज राजस्थान भवन, पारनाका, कल्याण येथे रोटरी क्लब ऑफ डायमंड वतीने महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महिलांचा जिवन गोरव व जिवन प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे रोटरी क्लबचे दिनेश मेहता (डिस्ट्रिक्ट गवर्नर), ज्योती मेहता (फर्स्ट लेडी डिस्ट्रिक्ट), रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडस अध्यक्ष अरविंद शिंदे, सेक्रेटरी राजेश चासकर, फर्स्ट लेडी आणि प्रकल्प प्रमुख संगिता शिंदे, सहप्रकल्प प्रमुख पल्लवी चौधरी उपस्थित होते.

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरीक कर भरत असतो परंतु त्यांना रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, कचरा, पाणी या विविध नागरी समस्या भेडसावत असतात त्या सोडविण्यासाठी  स्फूर्ती फाउंडेशन विविध विभागांना सातत्याने पत्रव्यवहार करत पाठपुरावा करत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

शासकीय योजना नागरीकांपर्यंत पोहचल्या पाहिजे त्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे, कल्याण मध्ये १०० अधिक विधवा व गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, ब्युटी पार्लर, शिलाई मशीन, संगणक प्रशिक्षण, मेहंदी, इंग्लिश स्पिकींग अशी व्यवसाय व नोकरी प्रशिक्षण महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी देत आहे, तसेच विविध शासकीय कागदपत्रे आधारकार्ड, मतदानकार्ड, उत्पन्नाचे दाखले, रेशनकार्ड यासाठी शिबीर राबवित आहे, विविध सामाजिक उपक्रम नागरिकांच्या हितासाठी राबवत आहे या कार्याची दखल घेत आज जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडस वतीने शिल्पा तांगडकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ.बी.एम.एन.कॉलेज ऑफ होम सायन्स (सशक्त स्वायत्त दर्जा), माटुंगा, मुंबई तर्फे पदवीधर विद्यार्थ्यां पदवी प्रदान समारंभ संपन्न !

डॉ.बी.एम.एन.कॉलेज ऑफ होम सायन्स (सशक्त स्वायत्त दर्जा), माटुंगा, मुंबई तर्फे पदवीधर विद्यार्थ्यां पदवी प्रदान समारंभ संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            डॉ.बी.एम.एन.कॉलेज ऑफ होम सायन्स (सशक्त स्वायत्त दर्जा), माटुंगा, मुंबई यांच्या तर्फे शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी २०२३-२४ च्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रदान समारंभ मोठया थाटामाटात संपन्न झाला. 

           या समारंभात २६६ पदवीधरांच्या शैक्षणिक यशाचा उत्साहाने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी टाटा पॉवरच्या ब्रँड आणि कम्युनिकेशन प्रमुख मा. ज्योती कुमार बंसल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या वाटचालीत उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्यास प्रोत्साहित केले.

बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी विचारांचे प्रशिक्षण; ठाण्यात तहसीलस्तरीय शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद !!

बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी विचारांचे प्रशिक्षण; ठाण्यात तहसीलस्तरीय शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद !! *उल्हासनगर / सुरेश जगताप...