Friday, 28 February 2025

राजगुरूनगरच्या 'अश्विनी राजेंद्र पाचारणे' यांना "सहकार रत्न" पुरस्कार !

राजगुरूनगरच्या 'अश्विनी राजेंद्र पाचारणे' यांना "सहकार रत्न" पुरस्कार !

पुणे, स्नेहा उत्तम मडावी -

खेड येथील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या संचालक तसेच शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पुणे जिल्हाध्यक्ष अश्विनी राजेंद्र पाचारणे यांना नुकताच इचलकरंजी येथील पोलीस मित्र असोसिएशन व वेध फाऊंडेशनच्या वतीने सहकार रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रविवार दि ९ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अश्विनी राजेंद्र पाचारणे यांचे महिलांच्या सबलीकरणासाठी मोठे योगदान आहे. सामाजिक सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. समाजाच्या उन्नतीसाठी अश्विनीताई सतत कार्यरत असतात तरूणांना उद्योग व्यवसायासाठी मदत करीत असतात. महिला बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला देवून त्यांचा संसार सुखाचा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असतात. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून अनेकांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांचा व्यवसाय उभारणी साठी मदत करीत असतात. अश्विनीताई पाचारणे यांना जाहीर झालेल्या पुरस्काराचे सर्व थरांत कौतुक होत आहेत अनेकांच्या शुभेच्छा येत आहेत..

"सिद्धार्थ महाविद्यालया"त 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरा !

"सिद्धार्थ महाविद्यालया"त 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरा !

मुंबई, डॉ. विष्णू भंडारे : सिद्धार्थ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने शुक्रवार, दि. २८/२/२०२५ रोजी सकाळी ठिक ११ वाजता 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना 'अंधश्रद्धा व बुवाबाजी' या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान व  प्रात्यक्षिके दाखविण्याचा  कार्यक्रम कॉलेजच्या सभागृहात आयोजित केला होता. 

अंनिस चे जेष्ठ कार्यकर्ते, श्री रविंद्र खानविलकर सरांनी  कार्यक्रमाची सुरुवात, 

_भूत, भानामती, करणी मूठ ! विज्ञान सांगते सारे झूठ !!_ 

या घोषवाक्यांने केली. त्यांनी विद्यार्थ्यांना, महाराष्ट्र शासनाने २०१३ साली लागू केलेल्या 'अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल' सखोल माहिती दिली. या कायद्यामुळे एखाद्या बुवा, बाबा किंवा मांत्रीकाकडून अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथां सांगून आणि जादूटोणा करून लोकांची फसवणूक करण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. अंधश्रद्धेतून कुणाचेही शोषण होऊ नये यासाठी हा कायदा करण्यात आला आहे, याचेही त्यांनी सविस्तर विवेचन केले.

त्यानंतर अनिसचे दुसरे कार्यकर्ते श्री. सुनिल मोरे व श्री चंद्रकांत सर्वगौड यानी अंधश्रद्धेबाबतची काही प्रात्येक्षिकेही मुलांना करून दाखवली व त्यामागील वैज्ञानिक सत्य कसे ओळखायचे हे देखिल समजाऊन सांगितले. उदा...पाण्याने पनती पेटवणे, नारळातून काळी रिबीन‌ काढणे, हातातून सोन्याची चैन, विभूती काढणे, जळता कापूर खाने, एखाद्याच्या अंगात देव-देवी येण्यामागचे मानसशास्त्रीय विश्लेषण इत्यादी. यामध्ये त्यांचे सहकारी श्री. कैलाश मोहिते व जगन्नाथ साबळे यांनीदेखिल सहकार्य केले. 

एकून ७० विद्यार्थ्यासह डॉ. विष्णु भंडारे व काही शिक्षकही कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी एन एस एस कार्यक्रम अधिकारी, प्रा. विशाल करंजवकर यांनी योग्य नियोजन केले व त्यांच्यासोबत विघ्नेश बनसोडे व राज हेगीष्ठे या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. यु एम मस्के सरांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना 'राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या' शुभेच्छा दिल्या.

Thursday, 27 February 2025

कोकण सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले "मी उद्योजक सन्मान" पुरस्काराचे मानकरी !

कोकण सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले "मी उद्योजक सन्मान" पुरस्काराचे मानकरी !

मुंबई (शांताराम गुडेकर) :

          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेले श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो. मारळ गावचे मूळ रहिवाशी नोकरी, व्यवसाय निमित्त विलेपार्ले (पूर्व) मुंबई येथे वास्तव्यास असलेले कोकण सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते श्री.अजित गोरुले (अध्यक्ष -कुणबी उद्योजक लाॕबी) यांचा मी उद्योजक होणारच यांच्यातर्फे सन २०२५ चा "मी उद्योजक सन्मान" पुरस्कार देऊन गौरव  करण्यात आला.
           यावेळी व्यासपीठावर ग्लोबल कोकणचे श्री.संजय यादवराव आणि मी उद्योजक होणारचचे प्रमुख निलेश मोरे उपस्थित होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री सन्मा. एकनाथ शिंदे, आमदार प्रसाद लाड, विकासक हावरे, संतोष पाटील आदी मान्यवर यांनी हजेरी लावून उपस्थित उद्योजक आणि अन्य नवीन उद्योजक यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. श्री.अजित गोरुले सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करत असताना मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन करीत आहेत. कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका संगमेश्वर, कुणबी युवक मंडळ आणि संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी लि मुंबई या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्य गेली अनेक वर्षे सुरू आहे. श्री.गोरूले यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन मी उद्योजक होणारच संस्थेचे प्रमुख श्री. निलेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सदर समारंभ मुंबई शेअर बाजार इमारतीत मंगळवारी थाटामाटात पार पडला. श्री.अजित गोरुले यांना बहुमान मिळाल्यानंतर त्यांचे अनेक मान्यवर व्यक्तींनी, मंडळ, संस्था, ग्राम विकास मंडळ, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवार यांनी अभिनंदन केले. प्रामुख्याने नवी मुंबई माजी उपमहापौर श्री. अविनाश लाड, कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर मुंबई सरचिटणीस श्री. शांताराम गोरुले, दै. अग्रलेख चे मुंबई /कोकण विभागीय संपादक एस. एल. गुडेकर (आंगवली -रेवाळे वाडी ), कुणबी सहकारी बँक संचालक श्री.पी. डी ठोंबरे,‌ मुंबई विद्यापीठ सेवा निवृत्त सहा. कुल सचिव श्री भालचंद्र सीताराम गोरीवले यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Wednesday, 26 February 2025

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे सफाळे तांदुळवाडी वरई येथे गरीब आदिवासी पाड्यात अन्न दान व गृहपयोगी साहित्य आणि कपडे वाटप !

साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे सफाळे तांदुळवाडी वरई येथे गरीब आदिवासी पाड्यात अन्न दान व गृहपयोगी साहित्य आणि कपडे वाटप !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            
               साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुंबई तर्फे सफाळे तांदुळवाडी वरई येथे गरीब आदिवासी पाड्यात अन्न दान व गृहपयोगी वस्तूसह  कपडे  वाटप करण्यात आले. यावेळी श्री.मंगेश अंकुश रासम, सौ.मनीषा मंगेश रासम, श्री. अनिल वडके, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मोहन कदम, समाजसेविका मनीषा मोहन कदम, संपादिका  वासंती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

                 हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.मंगेश अंकुश रासम, सौ.मनीषा मंगेश रासम, श्री.अनिल वडके, श्री.महेश वर्मा, कु.समीर सागवेकर, श्री.शरद नाक्ती, रजनी  उमरसकर, कु.प्रशांत पिले, जीवन मकावाना, कु.हिरन टेलर, श्री.राम किरत गुप्ता, श्री.महेश मेहता, विनायक सावंत, विशेष कोळी, अनिता डिसोजा, ग्लॅडी डिसोजा, जीवन माकवाना डॉ. रेवती आळवे, विवेक दासरी, दिपक आलवे, अशोक मेस्त्री, पंकज नाईक, सुनील चव्हाण, अशोक मेस्त्री, किरण राजपूत, घोसाळकर, यासिन खान, अभिजित निकम, विवेक व्हासरी, नरेंद्र मंहतो, राजू रासम, देवांग सांदेसारा यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमासाठी तुलसीदास तांडेल, क्रांतेश्वर पाटील यांनी विशेष सहकार्य केले. शिवाय सफाळे तांदुळवाडी वरई पदाधिकारी, सक्रिय सदस्य आणि सभासद व कर्मचारी वर्गाचे अनमोल सहकार्य लाभले.

            साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली मुबई तर्फे मुंबई सह गरीब आदिवासी पाड्यात अन्न दान व गृहपयोगी वस्तू, कपडे  वाटप, करोना काळात अन्नदान, शैक्षणिक उपक्रम व राष्टीय उत्सव आणि विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात.

विक्रोळी पश्चिम,पार्क साईट येथे श्री स्वयंभू सोमेश्वर मंडळतर्फे महाशिवरात्री साजरी !

विक्रोळी पश्चिम,पार्क साईट येथे श्री स्वयंभू सोमेश्वर मंडळतर्फे महाशिवरात्री साजरी !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            विक्रोळी पश्चिम, पार्क साईट मधील  श्री स्वयंभू सोमेश्वर मंडळ तर्फे महाशिवरात्री साजरी करण्यात आली. महाशिवरात्री निमित्ताने ह.भ.प. गुरुवर्य श्री.सुभाष महाजन, खोडदे गुरुजी तसेच ह.भ.प. श्री.भार्गव झगडे महाराज, मुद्रुंगाचार्य प्रथमेश  पवार, मंडळाचे कार्यकर्ते चंद्रकांत सावर्डेकर, राजेंद्र मयेकर, प्रकाश सावर्डेकर, किरण जानवलकर, संजय जानवलकर, जनार्दन नाक्ती आदी मान्यवर यांच्या उपस्थित राहुन महाशिवरात्री यानिमित्तनाने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक १२३ राजेंद्र पेडणेकर, ग्रा.स.क. वार्ड संघटक १२४ तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंत विठ्ठल खोपकर, राजु जाधव, दत्तगुरु पेडणेकर, नरेश हातीशकर, विजय पांडे, आदी मान्यवर  उपस्थित होते.

कांजुरमार्ग (पुर्व) येथे मराठी भाषा दिनाचे आयोजन !

कांजुरमार्ग (पुर्व) येथे मराठी भाषा दिनाचे आयोजन !
 

मुंबई, (पंकजकुमार पाटील) : केंद्र सरकारकडून आपल्या मायमराठी  भाषेवर अभिजात भाषेचा शिक्कामोर्तब झालेला आहे. याच मराठी भाषेचा जागर करून मराठी साहित्य, संस्कृतीशी संबंधित कार्यक्रम राज्यात साजरे केले जातात.
 दि. २७ फेब्रुवारी रोजी दरवर्षी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन "मराठी भाषा दिन" म्हणून संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. याच दिवसाचे औचित्य साधून 
विक्रोळी विधानसभा आमदार श्री. सुनिलभाऊ राऊत यांच्या  प्रेरणेने आणि सहकार्याने तसेच  कोकण मराठी साहित्य परिषद, भांडूप - मुलुंड शाखा आणि संतोष क्लासचे संस्थापक श्री. संतोष पासलकर सर यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठी भाषा दिन" रविवार दि. २ मार्च २०२५ रोजी सायं. ५.०० वा. नवमहाराष्ट्र व्यायामशाळा, कांजुरमार्ग (पूर्व) येथे आयोजित केला आहे.

     या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी प्राध्यापक श्री. अशोक बागवे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच  मराठी गौरव गीत-गौरी मयेकर, वि.वा. शिरवाडकर यांच्या साहित्यावर अभिवाचन- सौ. स्वप्नाली तांबे यांच्याकडून होणार असून सौ. प्राची पाटील, श्री. श्रीकांत शिधोरे, सौ. भाग्यश्री शिधोरे, श्री. रविंद्र केंजळे, सौ. संजना पासलकर व इतर स्थानिक कवींचे कविता वाचन देखील होणार आहे.
       तरी या साहित्यिक कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कोमसाप पदाधिकारी व संतोष क्लासेस कडून करण्यात आले आहे.

प्रेममय साने गुरुजी व्याख्यानाचा कार्यक्रम सरळगाव विभाग हायस्कूल विद्यालयात उत्साहात संपन्न !

प्रेममय साने गुरुजी व्याख्यानाचा कार्यक्रम सरळगाव विभाग हायस्कूल विद्यालयात उत्साहात संपन्न !

मुरबाड, प्रतिनिधी : समता विचार प्रसारक संस्था ठाणे यांचे विद्यमाने पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित सरळगाव विभाग हायस्कूल मध्ये साने *गुरुजींच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त* मंगळवार दि.25/02/2025 रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम 18 वा प्रयोग विद्यालयात संपन्न झाला.

समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त प्रमुख व्याख्याते डॉ. संजय मंगला गोपाळ (VJTI) इंजिनियरिंग काॅलेजचे सेवानिवृत्त डीन), लतिका सु.मो मॅडम (विज्ञान /गणित शिक्षिका) तसेच मनीषा जोशी मॅडम (मराठी/स्काऊट गाईड  शिक्षिका), मीनल उत्तूरकर (एम.एससी अँनॅलिटीलकल केमिस्ट्री उद्योजक) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सानेगुरुजींच्या जीवनातील संस्कार मय कथा सांगत मानवता हे मूल्य रुजवण्याचा सुरेख प्रयत्न केला गेला तसेच सानेगुरुजी लिखित देशभक्तीपर गाणी, लेख, गोष्टीं यावर आधारीत नाट्यम सांस्कृतिक सादरीकरण करत शालेय वातावरण मंत्रमुग्ध केले गेले. 

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुवर्णाताई ठाकरे विचारमंचावर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय इधे सर यांनी केले तर विद्यालयाचे प्राचार्य श्री. जी. ओ. माळी सर यांनी व्याख्यात्यांचे आभार मानत सदर कार्यक्रमाची गरज विद्यार्थ्यांना यशस्वी वाटचाल करण्यास मदत होईल असे सांगत देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
सौजन्य _
मुख्याध्यापक
श्री जी. ओ. माळी

Tuesday, 25 February 2025

"सिद्धार्थ महाविद्यालया"च्या खेळाडूंचा गुणगौरव सोहळा !

"सिद्धार्थ महाविद्यालया"च्या खेळाडूंचा गुणगौरव सोहळा !

मुंबई, डॉ विष्णू भंडारे : सिद्धार्थ महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाने, ११ वी ते १५ वीच्या विद्यार्थ्यांनी आंतर महाविद्यालय, विद्यापीठ व जिल्हा स्तरावर, तसेच कॉलेजअंतर्गत आयोजित केलेल्या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षीसे मिळवल्या बद्दल 'बक्षीस वितरण कार्यक्रमाचे' आयोजन सोमवार, दि.२४/२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. कॉलेजच्या सभागृहात आयोजित केले होते. 

गेल्या वर्षभरात सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात अनेक सुवर्ण रौप्य व कांस्य पदके मिळवलेल्या जवळजवळ १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर, डॉ. देविका सुर्यवंशी, डॉ. विष्णू भंडारे, प्रा. छाया पावसकर, प्रा. विशाल करंजवकर, क्रिकेटचे प्रशिक्षक श्री रोहीत भल्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यासह त्यांचे पालक व सर्व शिक्षकही उपस्थित होते. 

सांघीक खेळ प्रकारात फूटबॉल, क्रिकेट, हॉली बॉल‌, तसेच वैयक्तिक खेळ प्रकारात १०० ते १५०० मीटर धावणे, कॅरम, बुद्धीबळ, पोहणे‌, भालाफेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, तीन पायांची धावणे शर्यत इत्यादी खेळात भाग घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिके मिळवलेल्या सर्व मुला-मुलींना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकासह प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व जिल्हा स्तरावर उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान चिन्ह व पदके देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

गेले वर्षभर विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठ तथा जिल्हा स्तरावरील, तसेच महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्राचार्य डॉ. यु.  एम. मस्के सरांनी कॉलेजकडून आर्थिक मदत केली. तसेच जिमखाना असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शशिकांत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक श्री मंगेश कदम यांनी भरपूर मेहनत घेतली व सतत मुलांसोबत राहुन त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले.

हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून श्री मंगेश कदमसह, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. कुंदन कांबळे, प्रा. राधा कनकामल्ला, प्रा. सुमेध माने व प्रा. पवन शर्मा इत्यादी शिक्षकांनी भरपूर मेहनत घेतली.

निजामपुरा (भिवंडी) पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी ; हत्या व चोरी प्रकरणातील आरोपी काश्मीर येथून जेरबंद !

निजामपुरा (भिवंडी) पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी ; हत्या व चोरी प्रकरणातील आरोपी काश्मीर येथून जेरबंद !

भिवंडी, प्रतिनिधी : पैशांसाठी सहकारी कामगाराची हत्या करत पगार चोरून पसार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात निजामपुरा पोलिसांना यश मिळाले आहे. साबीर अन्सारी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून हत्येनंतर तो फरार झाला होता. याप्रकरणी निजामपुरा पोलिसांच्या पथकाकडे कोणतेही पुरावे नसताना त्यांनी रेल्वे पोलीस, सीसीटीव्ही आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने कसोशीने तपास करत जम्मू काश्मीर येथे धडक देत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.


४ फेब्रुवारी रोजी साबीरने पैशांच्या मोहापोटी कंपनीतील नीरजकुमार घाव घालून गंभीर केले. त्यानंतर नीरजकुमार याच्याकडील पैसे आणि मोबाईल घेऊन पोबारा केला. दरम्यान १८ फेब्रुवारी रोजी नीरजकुमार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर भिवंडी पोलिसांना साबीर कश्मीर येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने लालचौक, अनंतनाग येथील एका बेकरीतून अन्सारीला ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी पोलिस उपायुक्त (भिवंडी) मोहन दहिकर, सहायक आयुक्त (भिवंडी - पश्चिम) दिपक देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (निजामपुरा पो. स्टे., भिवंडी) विश्वास डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरिक्षक (गुन्हे) गजानन जोगदंड, तपास अधिकारी सहा. पो. निरिक्षक विनोद चव्हाण, पो. निरिक्षक गणेश मुसळे, पो. उपनिरीक्षक दत्तात्रय बडगिरे, पो. स.उपनिरीक्षक राजेंद्र अल्हाट, पोहवा मारोती भारती, उमेश मेघा, पोना विकास सोनावणे, प्रविण सोनावणे, मनोज काळे, पोशि विजय ताटे, ज्ञानेश्वर कोळी, शनिप्रसाद मुंडे यांनी केली आहे.


Monday, 24 February 2025

श्रीकांत पठारे यांना टीडीसी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती !!

श्रीकांत पठारे यांना टीडीसी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती !!

वाडा, प्रतिनिधी : दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी (सीइओ) पदी  वाडा येथील श्रीकांत विष्णू पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकांत पठारे हे मूळ वाडा तालुक्यातील तीळगाव येथील रहिवाशी असून त्यांचे एमएससी एग्रीकल्चर शिक्षण अर्थशास्त्र विषय घेऊन पूर्ण केले आहे. जिल्हा बँकेत त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून बँकेच्या कृषी विभागात उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला आहे. 
            श्रीकांत पठारे यांना जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नुकतीच बढती देण्यात आली असून एक उच्चशिक्षित, कृषी क्षेत्रातील अभ्यासू म्हणून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा शेतकऱ्यांना व खातेदारांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या नियुक्तीबद्दल श्रीकांत पठारे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सौजन्य - 
जयेश लडकू शेलार पाटील 
राष्ट्रवादी काँग्रेस, वाडा तालुका अध्यक्ष 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024, प्रवेशिका सादर करण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ !

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024, प्रवेशिका सादर करण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ !

       मुंबई, प्रतिनिधी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका ३१ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत मागविण्यात आल्या होत्या. या प्रवेशिका पाठविण्यास २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

            राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई -32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचं नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Sunday, 23 February 2025

येणाऱ्या पिढ्या वाचवायच्या असतील तर आधी कोकण वाचवा - मुझम्मील काझी

येणाऱ्या पिढ्या वाचवायच्या असतील तर आधी कोकण वाचवा - मुझम्मील काझी 

** जमिनी विकून नोकरी करण्यापेक्षा आहे त्याच जमिनी वाचवून उद्योग धंदे उभारा

कोकण (शांताराम गुडेकर) :

       श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकर वाडी या मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मुझम्मील काझी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. पुढे मार्गदर्शन करताना, येणाऱ्या पिढ्या वाचवायच्या असतील तर आधी कोकण वाचवा असे आवाहन मुझम्मील काझी यांनी केले आहे.
         पुढे आपल्या भाषणात सांगितले की, जमिनी विकून नोकरी करण्यापेक्षा आहे त्याच जमिनी वाचवून उद्योग धंदे उभारा. ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना मंचावरून मुझम्मील काझी यांनी सांगितले की, आजची पिढी ही खूप भाग्यवान आहे. आजच्या पिढीला सगळं आयत मिळालं आहे. कोणते कष्ट करायचे नाहीत किंवा ना अजून काही. पण येणाऱ्या पिढीला मात्र खूप संघर्ष करावा लागणार आहे. आज आपल्या गावात, आपल्या भागात आपणच परके होत चाललो आहोत, परप्रांतीयांना आपल्या जमिनी विकून मोकळे झालोत. आज अर्ध कोकण हे आपणच विकून टाकलेले आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे.
         पुढे उदाहरण देताना मुझम्मील काझी यांनी म्हटले की, मागेच एक लोकसत्ताला बातमी वाचली होती. साखरपा जवळचे ओझर गाव हे तिथल्या ग्रामस्थांनी विकायला काढले आहे. तब्बल साडेचार हजार एकर जागा विकण्याची पेपरला जाहिरात दिली होती. विचार करा किती गंभीर परिस्थिती आहे. आज त्या गावात तरुण मुलेच नाहीत. फक्त वयोवृद्ध माणसे आहेत. गावात एसटी येत नाही. मोबाईलला नेटवर्क नाही. गावाकडे लक्ष द्यायला कोणी नाही. किती भयानक परिस्थिती असेल. आज आपली गावे ओस पडत चालली आहेत.
          आपणच आपली मानसिकता बनवून घेतली आहे. मुलाला मुंबईला नोकरी पाहिजे. दहावी बारावी झाली की बॅग भरून मुंबई गाठायची. कोकणातले  सुखी जीवन सोडून धकाधकीच्या जीवनात जायचे. आपण ठरवलं आहे की, मुलगा मुंबईला असेल तरच मुलगी देणार. मुंबईला नोकरी पाहिजे तरच लग्न करणार भलेही मुलगा तिथे लोकलचे धक्के खाऊ देत. पण इथला शेतकरी नवरा नको.
          आज जर आपण आपल्या गावात राहून उद्योग सुरू केले तर बाहेर नोकरी करण्याचीही गरज नाही. आपला ग्रामीण भाग निसर्ग संपन्न आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्याचा आपण कधी वापर करणार. पर्यावरणपूरक उद्योग धंदे सुरू करून आपण रोजगार निर्माण केला पाहिजे. अजून किती दिवस दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणार आहोत. आपणही दुसऱ्यांना रोजगार देणारे बनले पाहिजे.
         मुझम्मील काझी यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना आवाहन केले की, आज आपल्या गावाला तरुणांची गरज आहे.इथे तरुण राहिले पाहिजेत. तरच गावाचा विकास करता येईल. पुढे, श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकर वाडी या मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना त्यांनी म्हटले, आज २५ वर्षे पूर्ण झालीत, येणारी २५०० वर्षे हे मंडळ येणाऱ्या पिढीला आदर्शवत ठरू दे. मंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे. शासनाच्या सर्व योजनांचा पुरेपूर लाभ घेणारे हे मंडळ आहे.
        मंडळाच्या वतीने सन्मान पत्रकार मुझम्मील काझी यांच्या श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकर वाडी या मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना मंडळाचे अनिल चंदरकर यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
          यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक लिंगायत, परचुरी गावच्या सरपंच शर्वरीताई वेल्ये, उपसरपंच प्रदीप चंदरकर, माजी  उपसभापती पंचायत समिती परशुराम वेल्ये, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत शिंदे, पोलिस पाटील सुधीर लिंगायत, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते वहिद राजापकर, उक्षी गावचे माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, सामाजिक कार्यकर्ते वसंत मेस्त्री, मंडळाचे संजय चंदरकर, डॉ.विनायक पेठे, डॉ.चंद्रकांत लिंगायत, गीतकार मधुकर यादव, शाहीर प्रकाश पंजने, उदय चिबडे, सदाशिव धांगडे, संदेश दुदम व तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"सिद्धार्थ महाविद्यालया"च्या विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय निरोप समारंभ संपन्न !!

"सिद्धार्थ महाविद्यालया"च्या विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय निरोप समारंभ संपन्न !!

मुंबई, डॉ विष्णू भंडारे -
सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बीकॉम, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी एका अनोख्या पद्धतीने निरोप समारंभाचे (Farewel Program) आयोजन शनिवार, दि. २२/२/२०२५ रोजी कॉलेजच्या सभागृहात‌ केले होते. कॉलेजमधील त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या मागील तीन वर्षाच्या कार्यकाळाचे हे अखेरचे वर्ष असल्याने, या फेअरवेलचे आयोजन विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने‌ केले होते. 

कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश एकत्र येऊन सामुदायिक नृत्य‌, गाणे इत्यादी मनोरंजनाच्या ईव्हेंटसह‌, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा होता. ज्या शिक्षकांनी त्यांना पुस्तकी ज्ञानासह भविष्यातील ईतर‌ आव्हानावर मात करून आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्र्वास दिला, त्यांचा अत्यंत आदरपूर्वक व विनम्रपणे एक सुंदर व अविस्मरणीय भेटवस्तू देऊन सन्मान केला. 

एका ग्रिटींग कार्डवर १० रुपयाची ओरिजीनल नविकोरी नोट व त्यावरील सहा आकडी नंबर, जो भेटवस्तू दिलेल्या शिक्षकाची जन्मतारीख आहे‌ (उदा. 080753), अशी‌ सुंदर भेटवस्तू प्रत्येक शिक्षकाला देण्याची त्यांची भन्नाट कल्पना व अशा नोटा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यानी घेतलेल्या परिश्रमाने सर्व उपस्थित शिक्षक अक्षरशा भारावून गेले. त्यानंतर सर्वांसाठी उत्तम स्नेहभोजनाचे देखिल विद्यार्थ्यांनी आयोजन केले होते.

अलिकडच्या काळातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल व ते करत असलेल्या विद्यादानाच्या पवित्र‌ कामाबद्दल, विद्यार्थ्यांमध्ये आदर किंवा कृतज्ञताभाव‌, विशेषता ग्रामिण‌ भाग वगळता शहरी भागातील‌ विद्यार्थ्यामंध्ये‌ क्वचितच‌ आढळतो असे सभोवतालचे चित्र किंवा वातावरणातून जाणवते, मात्र आमचे विद्यार्थां निश्चितच याला अपवाद आहेत, ते वेगळे आहेत हे यानिमित्ताने सिद्ध झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५३ साली स्थापन केलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयातील शिक्षकवृंदानी गेल्या ७८ वर्षाच्या प्रदीर्घ गुरू-शिष्य परंपरेच्या संस्काराचा सुंदर वारसा आजपर्यंत पुढे चालू ठेवल्याचे कदाचित हे फलीत असावे असे‌ वाटते. 

विद्यार्थ्यांच्या कल्पनेतील या अनोख्या फेअरवेल समारंभासाठी‌ प्राचार्य डॉ. यु. एम‌. मस्के सरांनी कॉलजकडून त्यांना अर्थसाहय्य केले व त्यांचे कौतूकही केले. तसेच कार्यक्रम यशस्विरित्या संपन्न‌ होण्यासाठी उपप्राचार्य डॉ. समिर ठाकूर व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व हर्षद इंगळे यांच्या नेतृत्वात निखिल जाधव,‌ प्रियंका‌ बळकटे, ऋषिकेश धोबी, दामिनी बोबडे व यश सोनावणे या विद्यार्थ्यांनी मागिल दोन आठवड्यांपासून‌ भरपूर मेहनत घेतली. 

"सिद्धार्थ महाविद्यालयात" रक्तदान शिबिर संपन्न !!

"सिद्धार्थ महाविद्यालयात"  रक्तदान शिबिर संपन्न !!

मुंबई, डॉ. विष्णू भंडारे -
सिद्धार्थ महाविद्यालय, (आनंद भवन) राष्ट्रीय सेवा योजना विभागाने नायर हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने शनिवार, दि. २२-२-२०२५ रोजी ग्रथांलयात‌ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकून‌ ३० विद्यार्थ्यांसह काही कर्मचाऱ्यांनी देखील रक्तदान केले. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांची इच्छा असूनदेखील त्यांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ते रक्तदान करू शकले नाहीत. या शिबिराला काही माजी विद्यार्थ्यांनी देखील भेट देऊन रक्तदान केले. 

कॉलेजच्या कर्मचाऱ्यांपैकी राणी बनसोडे, वृषाली मोरे, सचिन काळे, भरत कासारे, राहुल वालंत्रा व धर्मराज ब्रामणे यांनी रक्तदान केले. तसेच प्राचार्य डॉ. यु. एम. मस्के व उपप्राचार्य डॉ. समीर ठाकूर व ईतर जेष्ठ प्राध्यापकांनी एनएसएच्या विद्यार्थ्यांचे, सदर उपक्रम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल कौतुक केले. प्रा. विशाल करंजवकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीरासाठी भरपूर मेहनत घेतली. यात प्रामुख्याने साक्षी वर्मा, अर्पिता घाटये, तन्वी डोळस, ध्रुव वालावलकर, विघ्नेश बनसोडे, आदित्य कसबे, नम्रता या सिनिअर विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले.

Saturday, 22 February 2025

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य उद्योजकता कार्यक्रम – "मी उद्योजक होणारच"

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य उद्योजकता कार्यक्रम – "मी उद्योजक होणारच" 

मुंबई (शांताराम गुडेकर) :

            मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि तिच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे. मराठी भाषा केवळ साहित्यापुरती मर्यादित न ठेवता ती उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपली जागा निर्माण करत आहे.
             आजच्या युगात मराठी माणूस केवळ नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो. उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि मराठी तरुणांनी व्यवसाय क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, यासाठी "मी उद्योजक होणारच" या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), मुंबई येथे मंगळवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे.
             यामध्ये यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन: कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नामांकित उद्योजक, स्टार्टअप फाउंडर्स आणि गुंतवणूकदार (इन्क्युबेटर्स) उपस्थित राहून मराठी तरुणांना मार्गदर्शन करतील. स्टार्टअप संधी आणि व्यवसाय वृद्धी: नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीवर चर्चा होईल. नेटवर्किंग संधी: नवोदित आणि अनुभवी उद्योजकांना परस्पर सहकार्याची आणि व्यवसाय वृद्धीच्या संधी मिळतील. फंडिंग आणि गुंतवणूक: नवीन स्टार्टअपसाठी आर्थिक मदतीच्या संधी आणि गुंतवणूकदारांशी थेट संवाद साधण्याची संधी.

           मराठी तरुणांनी उद्योग क्षेत्रात उतरण्याची गरज का आहे?
                आज भारतात स्टार्टअप इकोसिस्टम वेगाने वाढत आहे. परंतु मराठी तरुण अजूनही नोकरीच्या सुरक्षिततेकडे जास्त कल दाखवत आहे. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असून माहिती तंत्रज्ञान, कृषीउद्योग, उत्पादन क्षेत्र, सेवा उद्योग, ई-कॉमर्स, अन्न प्रक्रिया उद्योग, निर्यात-आयात व्यवसाय आणि डिजिटल मार्केटिंग यासारख्या क्षेत्रांत मराठी तरुणांनी मोठ्या प्रमाणावर संधी घेतल्या पाहिजेत. 

"मी उद्योजक होणारच" कार्यक्रमात सहभागी व्हा !

              या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा,  शंभूराज देसाई, नितेश राणे तसेच इतर नामवंत उद्योजक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 
              पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विनायक पात्रुडकर यांना जीवनगौरव तसेच प्रसाद लाड यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच अजित गोरुले (अध्यक्ष - कुणबी उद्योजक लॉबी) यांचाही गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मराठी तरुणांनी आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आणि उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. सदर कार्यक्रम विनामूल्य  असून महाराष्ट्र कल्चर क्लब हा त्याचा माध्यम प्रयोजक आहे. कार्यक्रमाचे आयोजक निलेश मोरे, संतोष पाटील, उदय सावंत, जीवन भोसले असून कार्यक्रमात सहभागीसाठी
📞 ७४००११९४३६ / ९८१९८४३१४८ या नंबरवर संपर्क करा. किंवा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील लिंक ओपन करून आपला फॉर्म भरा.
https://forms.gle/Kw9aJJitHHZrX6QD7

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी:
व्हाट्सअप ग्रुप लिंक : https://chat.whatsapp.com/BcS4yzcIkQjFBn4pW8mEAq

"उद्योजकतेकडे वळा, स्वावलंबी बना आणि मराठी भाषा तसेच महाराष्ट्राचा अभिमान वाढवा !"

Friday, 21 February 2025

विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट महाविद्यालयात १४व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन !

विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट महाविद्यालयात १४व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन !

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

विरार येथील विवा इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधील विद्यार्थ्यांनी सुरेख काम करत देशातील अत्यंत जुन्या संस्थेची बरोबरीच केली आहे" असे उदगार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, लेखक व निर्माता श्री रवी जाधव यांनी गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाच्या ठिकाणी मुख्य अतिथी म्हणून मुलांना मार्गदर्शनपर भाषणात काढले. श्री. रवी जाधव यांच्या हस्ते वार्षिक कला प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे खजिनदार श्री. शिखर हितेंद्र ठाकूर तसेच मार्गदर्शक श्री राजू वनमाळी, श्री. अनिल ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट चे विवा इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्ट ह्या विरार पूर्व, शिरगाव येथील कला महाविद्यालयात २०१० साली बी. एफ. ए. ह्या पदवी मध्ये अप्लाइड आर्ट व पेंटिंग हे दोन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. समारंभाच्या सुरुवातीस प्राचार्या डॉ. संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामगिरीची दखल घेऊन संस्थेच्या वर्षभराच्या कामाचा आढावा घेत पाहुण्यांचे स्वागत केले. या नंतर संस्थेने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, सात वर्षापूर्वी सुरु केलेल्या अत्यंत्य स्त्युत्य अश्या 'सन्मानपत्र' बहाल करण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. वसईच्या मातीतील प्रसिद्ध शिल्पकार, हाडाचे कलावंत श्री. शांताराम चिंतामण सामंत म्हणजेच सर्वांना सुपरिचित असलेले श्री दत्ता सामंत यांचा 'सन्मानपत्र' बहाल करत यथोचित गौरव करण्यात आला. सदैव हसतमुख असे व्यक्तिमत्त्व लाभलेले व सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य जगणारे श्री. दत्ता सामंत यांनी वयाच्या ९३ व्या वर्षात पदार्पण केले आहे व या समारंभात सरांची उपस्थिती प्रार्थनीय होती. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना नवीन विधानभवनात अशोक स्तंभ बसवण्यात सरांचा सिंहाचा वाटा होता. सरांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांमध्ये सर्वात  महत्वाचा असा 'महाराष्ट्र राज्य शासन' पुरस्कार हा होता. सरांच्या निवासस्थानी त्यांना भेटून त्याच्याकडून माहिती घेत त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रफीत कार्यक्रमाच्या वेळी दाखवण्यात आली.  

या नंतर श्री. शिखर ठाकूर यांनी त्यांच्या आकर्षक शैलीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुणे श्री. रवी जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक करत विध्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. सदर कला प्रदर्शन विवा इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्ट, शिरगाव, कुंभारपाडा, विरार-पूर्व येथे, मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ४:३० दरम्यान सर्वांसाठी खुले आहे. चित्रकला या विषयात उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत तरी त्याबद्दल अधिक माहिती व यात असणारी वेगेवेगळी क्षेत्र याबद्दल प्रदर्शनात असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती वरून कल्पना येऊ शकते.

Thursday, 20 February 2025

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात वाडा तालुक्यातील विविध समस्यांची जयेश शेलार यांनी दिली निवेदने !!

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात वाडा तालुक्यातील विविध समस्यांची जयेश शेलार यांनी दिली निवेदने !!

* ऑनलाइन पीक पाणी न झालेले शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी करण्याची प्रमुख मागणी

पालघर, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे आयोजन गुरुवार (दि. 20) पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी सुमारे  विविध विभागांचे  739 तक्रारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

राष्ट्रवादी वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी वाडा तालुक्यातील विविध समस्यांबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांना निवेदने सादर केली आहेत. आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत धान खरेदी केली जाते. यासाठी ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे पिक पाहणी करणे अनिवार्य आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडून तांत्रिक कारणांमुळे पिक पाहणी करण्यात आलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी तलाठ्यांकडून ऑफलाइन पद्धतीने पिक पाहणी सातबारा उतारावर केली आहे. या शेतकऱ्यांची धान (भात) खरेदी करणे शासनाकडून थांबण्यात आले आहे. अशा ऑनलाइन पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांची भात खरेदी करण्यात यावी व ज्या शेतकऱ्यांची खरेदी झाली आहे त्या शेतकऱ्यांना मोबदला त्वरित मिळावा या मागणीचे निवेदन जयेश शेलार यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांना दिले आहे. तर भिवंडी - वाडा - मनोर या रस्त्याचे रखडलेले काम व काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक व आवश्यक सूचना असणारे फलक लावावेत व ज्या ठिकाणी वाहतूक सुरू आहे अशा ठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती करावी व रस्त्यावरील खड्डे भरावेत अशा मागणीचे निवेदनही देण्यात आले आहे.  तसेच वाडा तालुक्यातील प्रदूषणकारी कंपन्याची चौकशी करण्याची ही मागणी जयेश शेलार यांनी केली आहे.

पालकमंत्री गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू करण्यात आलेल्या जनता दरबाराला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या जनता दरबारामुळे विविध समस्या मार्गी लागणे शक्य होणार आहे.


सौजन्य _
जयेश शेलार 
अध्यक्ष : राष्ट्रवादी वाडा तालुका संपर्क कार्यालय 

Monday, 17 February 2025

कल्याण मध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन !

कल्याण मध्ये भागवत सप्ताहाचे आयोजन !

कल्याण, (अतुल फडके) : ऐतिहासिक कल्याण शहरात दरवर्षी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते ; त्याच अनुषंगाने १७ फेब्रुवारी ते २३फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी साडेचार ते सात वाजता श्री लक्ष्मीनारायण देवस्थान सभागृह टिळक चौक, कल्याण येथे भागवताचार्य वासंती ताई केळकर कथित श्री भागवत सप्ताह होणार आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी झाला. सर्व भाविकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ कल्याण च्या डॉक्टर अर्चना सोमानी ,ऍड अर्चना सबनीस नीता कदम ,मीनाक्षी देवकर व सदस्यांनी केले आहे . 

३० मार्च रोजी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रा कल्याण संस्कृती मंच व इनरहिल क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे, त्या यात्रेतही सर्वांनी सहभागी व्हावे". असे आवाहन इनरव्हील क्लब ने केले आहे.

कल्याण येथे शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन !

कल्याण येथे शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन !

कल्याण, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात कल्याण पश्चिम शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन, टावरीपाडा येथे संपन्न होत आहे, आयोजनाचे हे ८ वे वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवरायांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवावे, विचार कला, कौशल्य संपूर्ण इतिहास येणाऱ्या पिढीला माहिती व्हावा,

जनतेने एकत्र यावे हा  मुख्य उद्देश सार्थ ठरवित या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन असून केले असून सकाळी दूर्गाडी किल्यावरून शिवज्योत आगमन, आरोग्य शिबीर, रक्त चिकित्सा शिबीर, चित्रकला स्पर्धा, ढोल ताशा लेझिम साथीने भव्य मिरवणूक, हळदी कुंकू समारंभ, छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान, भंडार असे कार्यक्रमाचे आयोजन असल्याची महिती शंखेश्वर प्रेसिडेन्सी फेडरेशन कमिटीचे सेक्रेटरी बजरंग तांगडकर यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने डॉ विजय मोरे सन्मानित !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने डॉ विजय मोरे सन्मानित !

कल्याण, प्रतिनिधी : गोवा येथे शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात नवी दिल्ली येथील बाबु जगजीवनराम साहित्य आणि संस्कृती अकादमी यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ विजय मोरे यांचा त्यांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ विजय मोरे यांना देशातील प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले या साठी त्यांचे अभिनंदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे ठाणे जिल्हा युवक कमिटी तेजस जी जाधव (अध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रामीण युवक जिल्हा), हरीश जी कांबळे (ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष युवक), संजय जी भालेराव (ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस युवक), रवी जी भालेराव (संघटक ठाणे जिल्हा ग्रामीण) तसेच संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण चे युवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले.



Sunday, 16 February 2025

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शाहीर शाहिद खेरटकर यांचा "मराठा भूषण" पुरस्कार देऊन गौरव !!

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शाहीर शाहिद खेरटकर यांचा "मराठा भूषण" पुरस्कार देऊन गौरव !!

सद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज दक्षिणपीठ नाणीज यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान....

कोकण - ( दिपक कारकर ) 

आपल्या अंगीकृत असंख्य कलागुणांनी गेली २५ वर्षे उत्कृष्ट, बहारदार शाहीरीच्या माध्यमातून रसिक मनाला तृप्त करण्याचे कार्य शाहीर शाहिद खेरटकर करत आले आहेत. त्यांच्या शाहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे जात, धर्म, पंथ, वर्ण यापलीकडे जाऊन मानवतावाद प्रस्थापित करण्यासाठी त्यांची लेखणी सरसावते आणि त्यांच्या पहाडी आवाजातून लोकांचे प्रबोधन होते. शाहिद खेरटकर यांनी कोकणची लोककला जाखडी (शक्ती - तुरा) मनापासून जोपासली आणि तेच रसिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचे त्यांचे उत्तम साधन बनले. शाहीर स्वतः एक उत्तम कवी, गायक, वक्ते, निवेदक आणि पत्रकार अशा विविध भूमिकेतून समाजात वावरताना दिसतात. साहित्य क्षेत्रात देखील त्यांनी मजल मारली आहे, त्यांचा प्रकाशित झालेला "ललकारी" हा कविता संग्रह देखील वाचकांच्या पसंतीस उतरला आहे.

कोकणातील ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दखल घेऊन नुकताच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शाहीर शाहिद खेरटकर यांना जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज दक्षिणपीठ नाणीज यांच्या शुभहस्ते हस्ते "मराठा भूषण" पुरस्कार  प्रदान करण्यात आला. याप्रसंगी आमदार भास्कर शेठ जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ. स्वाती ताई काशिद, राष्ट्रीय कीर्तनकार ह भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाभळे अखिल भारतीय मराठा महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासहित समस्त नागरिक, श्रोतेजण उपस्थित होते.

 अखिल भारतीय मराठा महासंघ १२५ वर्षे पूर्ण करत आहे, त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अशाप्रकारे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून  दोन दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता, यानिमित्ताने बहुजन समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या गुणवंतांचा "मराठा भूषण" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. "मराठा ही जात नव्हे तर एक विचार आहे". या विचारधारेने चालणारे संघटन म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघ होय.

या दोन दिवसीय भव्य कीर्तन महोत्सवाचे सूत्रसंचालन देखील शाहीर शाहिद खेरटकर यांनी केले. चिपळूणकर भूमिपुत्र शाहीद खेरटकर यांना प्राप्त झालेल्या पुरस्कार बद्दल त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

Saturday, 15 February 2025

**** अभिजात मराठी भाषा आणि आम्ही

विशेष लेख__

**** अभिजात मराठी भाषा आणि आम्ही

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने गेल्या ऑक्टोबर २०२४ मध्ये दिला आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. या करीता अनेक वर्ष मागणी करण्यात आली. कोमसाप व इतर संघटनानी ही बाब लावून धरली, त्याला आता यश आले आहे. मराठी भाषेला दोन हजार वर्षापेक्षा अधिक मोठा इतिहास आहे. या भाषेत प्राचीन काळापासून खूप साहित्याची निर्मिती होत आहे ही भाषा स्वंयभू आहे अनेक बोली भाषांनी ती नटलेली आहे अजूनही अनेक बोलींचा अभ्यास होणे बाकी आहे. मराठी भाषा अशा विविधतेनी समृध्द आहे

" भाषा" ही विचारांच्या देवघेवीचे एक मौखिक आणि लिखित असे साधन आहे भाष् करणे म्हणजे बोलणे अथवा लिहिणे या धातू पासून 'भाषा' हा शब्दाचे अस्तित्व निर्माण झाले कोणतीही भाषा हे विचाराचे देवाण घेवाण करण्याचे साधन असते त्या भाषेचे श्राव्य रूप बोलावयाची भाषा, बोलीभाषा असते भाषा जेव्हा लिपीबध्द होऊन दृश्य रूप घेते तेव्हा ती प्रमाण भाषा किंवा ग्रांथिक लिखित भाषा होते तेव्हा तिचे बोलीपण संपते भाषा ही प्रवाही असते, जी भाषा जिवंत असते ती सतत बोलली जात असते समाजाच्या मोठ्या समूहाकडून तिचा वापर होत असतो जेव्हा तिचा वापर कमी होतो तेव्हा ती मृत होते किंवा संपुष्टात येते भाषेत कालपरत्वे, विभागापरत्वे बदल होत जातो दर बारा कोसावर पाणी आणि भाषा बदलत असते "असे म्हणतात ते खरे आहे. सांस्कृतिक आक्रमणेही भाषा बदलास कारणीभूत असतात. वास्तव

" भाषा ही एक अशी एक महत्वाची गोष्ट आहे जिच्यामुळे निसर्गापासून इतर प्राण्याहून माणूस प्रगत ठरला आहे. सांस्कृतिक भांडवला मधला भाषा हा महत्वाचा घटक आहे या महत्वाच्या भाषा निमिर्तीची प्रक्रिया गेली पाच लाख वर्ष सातत्याने सुरू आहे भाषातज्ञांच्या अंदाजानुसार अस्तित्वात असलेल्या सहाहजार भाषांपैकी २२व्या शतकाच्या पर्यत यातील यातील दोन हजार भाषा टिकणारही नाहीत समाजाच्या गरजा बदलत असतात मग त्यानुसार भाषाही बदलत जाते. दहा हजार वर्षापूर्वी शेतीचा शोध लागल्या नंतर मानवी जीवनाला स्थैर्य मिळू लागले आणि भाषेची गरज व्यक्त होण्यासाठी भासू लागली आणि वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात आल्या लिपीचा शोध लागून लेखन कला उदयास आली.

आमची मराठी भाषा अभिजात नाही का?' असा प्रश्न अनेकदा पडत होता मराठी साहित्य संमेलनात एक तंबू उभारून पत्रे लिहून वारंवार केंद्रशासनाला विनंती केली जात होती आता ही मागणी पूर्ण झाली आहे. १२ कोटी मराठी माणसाना आनंद झाला आहे या वर्षी राजधानी दिल्लीत ९८ वे भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हा ही अमृतयोग आहे मराठी माणसांचा हा कुंभमेळा आता दिल्लीत भरणार आहे.

मराठी भाषा किती तरी प्राचीन आहे. संस्कृत जेव्हा ज्ञानभाषा होती तेव्हा प्राकृत ही जन सामान्यांची बोली भाषा होती. या प्राकृत भाषेतून पुढे अनेक भारतीय भाषांची निर्मिती झाली अडीच हजार वर्षापूर्वी महाराष्टासह कर्नाटक आंध्र प्रदेशावर सातवहानांची सत्ता होती महाराष्ट्राचा समावेश या पंच द्राविडामध्ये केला जातो मराठी प्राकृत भाषेचे संदर्भतेव्हापासून उपलब्ध आहेत. सातवाहान राजा हाल यांने (इ.स. २०-२४) या काळात 'गाथा सप्तशती ग्रंथ लिहिला गेला त्यातील वर्णन शृंगारीक असले तरी सामाजिक स्थिती दर्शक आहे. यातील एक द्वीपदी पहा.

अलिहिज्जूड पडक आले हलाली चलणेण कलम गोविए
केआर इसोअ रूम्भण तंसटटी अ कोमलो चरणे "//६९०//

भावार्थ :- शेतातील प्रवाह रोखल्याने तिरपी पडलेल्या साळीची (भातशेतीची) राखण करणारणीची (शेतकऱ्याच्या सुंदर बायकोची) कोमल पावलांची पाउलवाट आता नांगराच्या रूम्भणीने मिटली आहे आजही 'रूमण' या शब्दाचा वापर ग्रामीण बोलीत केला जातो सातवहान हे कानडी तेलगू भाषीक होते सत्ताधारी संस्कृतीचा प्रभाव भाषेवर होत असतो तेव्हाही झाला. ताई, आक्का, आप्पा, असे अनेक कानडी शब्द मराठीत आहेत पुढे यादवानी सातवहानाचा पराभव केल्यावर मराठी भाषीक यादवाची राजसत्ता आली आणि मराठी भाषा बहरू लागली शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्यग्रंथाची मराठीत रचना केली. ज्ञानेश्वरांच्याही आधी नाथपंथीय मुकूंद रायानानी 'विवेकसिंधू' हा प्राकृत भाषेतील ग्रंथ लिहिला संस्कृतच्या अवघड ओझ्याखाली सर्वसमान्याना दबून रहावे लागे काही वर्गाला ती शिकण्याचा अधिकारही नसे बहुजन वर्गाला ज्ञानापासून वंचित रहावे लागत असे प्राकृत मराठी ही ग्रंथाची भाषा झाली संतानी कटाक्षाने प्राकृतचा वापर केला मुकुंदराय मराठीची थोरवी गाताना लिहितात (मुकुंदराया बाबतही तज्ञामध्ये एकमत नाही ते एक की दोन असाही घोळ आहे)

वेदशास्त्रांचा मतितार्थ मन्हाठीया जोडे फलीतार्थ
तरी चतुरी परमार्थ का ने द्यावा
सुकाळू होद्यावा ब्रम्हविद्येचा
शंकरोक्तीवरी मी बोलीलो मन्हाठी वैखरी

मराठी भाषेला बोलीला 'वैखरी" या सुंदर शब्दाचा सुरूवातीचा प्रथम वापर मुकुंदरायानी केला हीच मालीका पुढे सुरू झाली. महानुभपंथीय ग्रंथ 'लिळाचरित्र" व "ज्ञानेश्वरी' याच काळात लिहिली गेली मराठी आणि कानडीची फारकत यादव काळापासून झालेली दिसून येते. मराठी भाषेला धर्माचे तानाचे स्थान महानुभव पंथानेही मिळवून दिले. श्री चक्रधर स्वामीनी निरूपण केलेल्या मराठी भाषेचाच वापर करा असा नागदेवाचार्याचा आदेश असे संस्कृत मराठी संघर्ष महानुभवानाही करावा लागला संस्कृतचे दामोदर पंडीत व केशीराज यांनी संस्कृतमध्ये काही प्रश्न विचारताच नागदेवाचार्य म्हणाले,

" तुमचा अस्मात करमात, मी नेणे गाः
मज श्री चक्रधरे निरूपली मन्हाठी : तियाची पुसा :"

तेराव्या शतकातही केवढा मराठीचा अभिमान महानुभावाना होता असा मराठीचा अभिमान व आग्रह आज ठेवला तरच ती टिकेल. मराठीची महती सांगताना ज्ञानेश्वरांनीही लिहिले आहे की,
माझा मराठाची बोलू कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळविन

परंतू अनेक सत्ताधिशांचा अंमल या महाराष्टावर झाला, मराठी भाषे इतकी अवहेलना कुठल्याच देशी भाषेची झाली नाही अगदी आजपर्यंतही तीच अवहेलना चालू आहे पण पूरातल्या लव्हाळी सारखी ती टिकून आहे मराठी भाषेचा गोडवा आणि थोरपणा माऊली सांगतात. ते परिसां महाटे बोल, जे समुद्राही हुनी खोल अर्थ भरीत,

जैसे बिंब बचके एवढे परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडे
अगा शब्दाची व्याप्ती तणे पाडे अनुभवावी यादवांच्या काळानंतर सुलतानशाही, मोंगलाई, बहामनीकाळात अनेक फारसी उर्दू शब्दांचा शिरकाव मराठीत झाला उदा. जमात, अर्ज, शमा, फानस (कंदील) हुजूर, मेहरबान, खबर इ. शिवशाहीत पुन्हा मराठीला बहर आला फारसी शब्दांना वगळण्याचा प्रयत्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज भाषा शुध्दीकरणा बाबत फार आग्रही होते त्यांनी पर्यायी संस्कृत शब्दांचा पुन्हा वापर केला राजांनी मराठी राजव्यवहार कोष" लिहून घेतला. पुन्हा पेशवाईत मराठी थोडीफार बदलली असली तरी यादवकालीन प्राकृत ग्रामीण समाजात रूढ झाली होती. पुढे १८१८ नंतर इंग्रजांची सत्ता महाराष्टावर आली पुन्हा एक नवे भाषिक आक्रमण झाले टेबल, शर्ट, रेल, बस, सायकल, बॅग, कप, पार्टी, बुक, या सारखे अनेक नवे शब्द आले शासकीय कामकाजात इंग्लीश आली शिक्षणात इंग्लीश आली इंग्लीश राजवटीत इंग्लीश प्रशासनात आली तिने मराठीस हिन दिन केले त्याकाळात मराठी माणसाच्या भाषेचे अभ्यासक्रमाचे शुध्दलेखनाचे निर्णयही इंग्लीश अधिकारी घेत असत. मेजर कॅण्डी नावाचा इंग्रज शिक्षण अधिकारी मराठी माणसांच्या बोकांडी बसला होता. मराठीचं लिखाण यादव काळापासून पेशवाई पर्यत मोडी लिपीत केले जात असे. परंतू इंग्रजानी ते देवनागरी लिपीत करण्याचे फर्मान काढले मराठी भाषा हिंदीला जवळ गेली मग अनेक हिंदी शब्दांचा भरणा झाला "सोहळा पार पडला ऐवजी सोहळा संपन्न झाला," मी तिला समजाविले ऐवजी "मी तिला मनविले लिहीले जावू लागले पुण्याच्या आसपासची मराठी हिच प्रमाण मराठी भाषा आहे असे तेव्हा मेजर कॅण्डीने जाहीर केले होते परंतू कोकणातून नशीब काढण्यासाठी, कामधंदा नोकरी मिळविण्यासाठी शिक्षणासाठी अनेकांनी पुण्यात वस्ती केली होती" मेहुणपुरा भागात कोकणवासीयांची फार दाटी असे, शिक्षकी पेशातही बरेच लोक कोकणी असत त्यांचे भाषिक वळणही कोकणी असे, पाहिल्यांनी, गेलान, मशी, तुशी, मेजके, अनुनासिक शब्दोच्चार इ. प्रचलीत होते ते शब्द मेजर कॅण्डीने अमान्य केले मेजर कॅण्डीने घालून दिलेले सर्वच नियम मराठी माणसांनी मान्य केले नाहीत अनेक लेखकांनी त्या विरूध्द आवाजही उठविला होता व चुकाही निदर्शनास आणल्या होत्या, माधव ज्यूलीयन यांनी ऐशी नव्वद वर्षापूर्वीच लिहिले आहे.

मराठी असे आमुची मायबोली
परि आज ती राजभाषा नसे
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू
हिला बैसवू वैभवाच्या शिरी

चाळीसच्या दशकात ही कविता लिहीली गेली पुढे काळ बदलत गेला आहे. १९६० साली संयुक्त महाराष्टाची स्थापना झाली द्वीभाषिक गुजरात पासून वेगळे होत मराठी भाषिकांचे राज्याची निर्मिती झाली पंरतू डोक्यावर मुकूट आणि अंगावर फाटके कपडे घातलेली मराठी मंत्रालयाच्या दारात उभी आहे असे कुसुमाग्रजांना खेदाने म्हणावे लागले. जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा झाली आता इंग्लीश शिकणे भाग पडले आहे नोकरी धंदयासाठी ते सक्तीचे वाटू लागले गोरे गेले पण मानसिक पराधिनता संपली नाही अगदी खेडोपाडी, झोपडपटटीतही इंग्लीश माध्यमाच्या शाळांत मुलांनी शिकणे आवश्यक वाटू लागले आहे अशा शाळांचे पेव फुटले आहे समाजाची मानसिकता बदलली आहे. आज सरकारी व मराठी माध्यमांच्या शाळा रित्या झाल्या आहेत जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये हिंदी भाषिकांची मुले शिकत आहेत खागजी शाळांमध्ये भरमसाट फी आकरली जाते तीही कळ सोसून गरीब पालक भरतात. पटसंख्या कमी होत असल्याने सरकारी शाळा ओस पडत आहेत मराठी माध्यमा बाबत वेगळा पगडा समाजावर पडला आहे केवळ इंग्लीश माध्यामाच्या शाळांत आपली मुले शिकली तरच ते पुढील तांत्रिक शिक्षण घेऊ शकतील नोकऱ्या मिळवतील, असा एक मोठा भयानक विचार समजात रूढ झाला आहे. मराठीच्या अधोगतीचे ते एक मोठे कारण आहे. चीन, जपान, रशिया, जर्मनी  सारख्या देशात अभ्यासक्रम एकाच स्थानिक भाषेत शिकवला जातो. इंग्रजी केवळ एक जागतिक व्यवहाराची भाषा विषय समजला जातो. मुलांना आपल्या मातृभाषेतच सर्व शिक्षण दिले जाते इंजिनीयरींग, मेडीकल किंवा इतर तांत्रिक शिक्षणही स्थानिक भाषेत दिले जाते महाराष्टातही कायदयाची, विज्ञानाची भाषा आता मराठी होत आहे. भारतात एक मोठा बिकट भाषिक वाद आहे अनेक प्रांताची भाषा वेगवेगळी आहे तामीळ, बंगाली कानडी, मळयालम, आसामी अशा अनेक भाषा प्रांतवार भाषा रचनेमुळे आल्या दक्षिणेत हिंदी बोलली जात नाही पण इंग्रजीत बोलले जाते, परकीय असली तरी इंग्रजी आपल्याला जोडणारी भाषा ठरते आहे हे नाकारता येत नाही. हा प्रादेशिक अस्मितावाद आहे, महाराष्ट कर्नाटक सीमावादही एक भाषावादच आहे.

मराठी भाषा जरी शैक्षणिक माध्यमात कमी पडत असली तरी ती शेकडो वर्ष सजीव रहाणार आहे याचे कारण आश्चर्यकारक आहे, मराठी भाषे इतकी साहित्याची संमेलने कोठेही होत नाहीत, विभागवार संमेलने होतात, बोली निहाय साहित्य संमेलने होतात, ग्रामीण, मुस्लीम मराठी, ख्रिस्ती मराठी, आगरी बोली, मालवणी बोली, झाडी बोली, अहिराणी, अशा अनेक बोलीच्या फांदया एकत्र येवून एक प्रमाण मराठीचे आखिल भारतीय साहित्य संमेलन होते. आता तर ग्रूपनिहाय संमेलने व विद्रोही साहित्याची संमेलने, नाट्यसंमेलने गजल संमेलने अशी होतात. शेकडो कवी, लेखक लिहित आहेत. यातून मराठी भाषेचा सतत जागर होत आहे अनेक पुस्तकांची दरमहा प्रकाशने डौलात होत आहेत, पण असे एक चित्र असताना प्रश्न पडतो मराठी माध्यमाच्या शाळा मात्र रिकाम्या रहात आहेत. मराठी भाषा मरणार तर नाही ना ? अशी भिती वाटते पहिले मराठी साहित्य संमेलन झाले तेव्हाही हाच मुददा होता (१९२६) मराठी भाषा टिकेल का? गेली शंभर वर्षे हाच सवाल विचारला जातो तरीही अनेक वर्षे कात टाकूनही मराठी अस्तित्वात आहे सर्वसमावेश मराठी माणूस असल्याने देशांच्या काना कोपऱ्यातून माणसे जगण्यासाठी मुंबईत, (देशाच्या आर्थिक राजधानीत) नोकरी धंदयासाठी महाराष्टात येतात, येताना आपली संस्कृतीही सोबत आणतात त्याचीही भेसळ करतात. दूधवाला, भेळवाला इस्त्रीवाला भैया असतो इडलीवाला अण्णा असतो, गुजराती, मारवाडी व्यापारी असतो तो काहीही कष्ट न करता शेतकऱ्याचा माल विकून दलालीत नफा कमवितो. मराठी माणूस मात्र त्यांच्यावर अवलंबून असतो. सुरेश भट म्हणतात की-

" पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी

मराठी भाषेच्या अधोगतीस आपणच कारणीभूत आहोत मराठीत नव्या पिढीला आपले भवितव्य दिसत नाही महाराष्ट्रातल्या कोणत्याही महाविदयालयात गेलात तर पदवीसाठी पूर्ण मराठी विषय घेतलेले किती विदयार्थी आहेत ? अशी चौवशी केली तर नकारार्थी उतर येते चार पांच विदयार्थीही मराठीसाठी मिळत नाहीत. पर्यायाने मराठीच्या प्राध्यापकास आपल्या विषयास विदयार्थी मिळवताना कसरत करावी लागते अन्यथा पद रिक्त होते. विभाग बंद होतो कलाशाखेत शिकणे कमीपणाचे समजले जाते मराठी पुस्तकाना वाचक नाही, वृतपत्रांचा खप होत नाही मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर सुरुवात घरापासून करायला हवी आपली मुले, नावर्ड इंग्लीश सेमी मध्ये जरी शिकत असली तरी घरी आवर्जून मराठीत बोलले पाहीजे. येरे येरे पावसाची गोडी त्यांना माहित नसते ते rain rain go away and come onther day म्हणत असतात त्यांना जा रे जा रे पावसा शिकवले जाते आम्ही वाढदिवसाला दिप लावून ओवाळतो आता केकवर मेणबत्या लावून त्या विझवतात हा संस्कृतीचा फरक आहे. उदा. लहान मुलांशी पंचवीसच्या ऐवजी twenty five बोलावे लागते मराठीला सुरूवातीसच ही मुले पोरकी होतात यामुळे संस्कारक्षम वयातच हा घोळ होत आहे. या करीता एक मराठी विषय सुरूवाती पासूनच असावा (यातही हिंदीचा पर्याय शोधला जातो) तो सक्तीचा असावा कुंटुबात, समाजात मराठीच बोलले पाहिजे भाजी बाजारात, प्रवासात, शासकिय कामकाजात, खाजगी आस्थापनात मराठीचा आग्रह धरला पाहिजे. सुरूवात आपणा पासूनच केली पाहिजे.

शासकीय आदेश, परिपत्रके, योजनांची माहिती मराठीतच असावी, तांत्रिक बाबीही मराठीत भाषांतरीत करण्यात याव्यात मराठीत पदवी घेण्याऱ्या कर्मच्याऱ्यास उतेजनार्थ अतिरिक्त वेतनवाढ मिळावी अलिकडे मुंबई महापालीकेत असा प्रयोग केला गेला त्यास कर्मऱ्यानी चांगला प्रतिसाद दिला जिल्हा परिषदात, इतर नगरपालिका, महानगरपालिका व शासकीय कार्यालयात सक्ती करावी इतर भाषिक अमराठी कर्मन्यानी मराठी भाषेची किमान माध्यमिक स्तरावरची मराठीची परिक्षा देणे अनिवार्य आहे ते कायम असावे माहिती सेवा, मराठीच असावी आर्थिक क्षेत्रातही मराठीचा वापर केला गेला पाहिजे. रोजगार, आय टी क्षेत्रातही मराठीचा वापर करावा मराठी भाषिक युवकाना रोजगात प्राधान्य देण्यात यावे कामकाजात मराठीचा वापर करावा संगणकीय, व तांत्रिक अभ्यासक्रम मराठीत असावेत ग्रामीण भागातील मुले त्यामुळे अधिक वेगाने प्रगती करतील.

महाराष्टात येणाऱ्या परप्रांतियानी आपल्या व्यवहारात मराठीचा वापर अधिक करावा दुकानांच्या आस्थापनेच्या पाटयावर ठळकपणे मराठीत लिहिले जावे, अशा लोकांशी मुददाम मराठीतच बोलावे त्यामुळे त्याना मराठीत व्यवहार करणे गरजेचे वाटेल आपला दबाव त्याच्यांवर आपोआप पडेल.

 मुंबई आपली असली तरी बॉलीवुडमध्ये हिंदीभाषिक चित्रपटाची दादागिरी मुंबईत चालते. मराठी चित्रपटाना थिएटर उपलब्ध होत नाहीत किंवा सोईच्या वेळा दिल्या जात नाहीत. त्यामुळे तराठी चित्रपटाना प्रेक्षक उपलब्ध होणाऱ्या वेळा देणे बंधनकारक असावे, मराठी चित्रपट करमुक्त असावेत व चांगल्या चित्रपट निर्मिती करीता अनुदान दिले जावे मराठी नाटकानाही कर सवलत असावी कमी भाडयात नाट्यगृह उपलब्ध केली जावीत जेणे करून मराठी सांस्कृतिक क्षेत्रास उत्तेजन मिळेल. अनेक कलाकाराना रोजगार मिळेल व इतर भाषांच्या स्पर्धेत ते टिकून रहातील. अनेक चांगल्या कलाकृती निर्माण होतील कथाकार गीतकार यांना व्यासपीठ उपलब्ध होईल.

वाचन संस्कृती वाढावी या करीता ग्रंथालयाना शासकिय अनुदान भरघोस मिळावे वाचनालयातील कर्मचारी हा ही शासकिय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी त्या कर्मच्याऱ्याना अत्यंत कमी वेतानात १२ तास राबविले जाते. वाचनालयात अनेक पुस्तके उपलब्ध होतात तो प्रकाशन व्यवसाय हा उद्योग मानून त्यास कर्ज, व सवलती मिळाल्या तर मराठी लेखकाना कवीना आपले लेखन प्रसिध्द करण्यास अधिक वाव मिळेल. त्यात दर्जेदार साहित्यास पुरस्कार मिळावेत. (वशीले सोडून)

आपल्या शेजारी असलेल्या भूतान या लहानशा देशात भारताच्या मदतीने शैक्षणिक विकास झाला आहे परंतू तेथिल सरकारी शाळा भारतापेक्षा अधिक यशस्वी झाल्या आहेत कारण तेथिल राजा किंवा उच्च अधिकारी, श्रीमंत लोक यांची मुले सरकारी सरकारी शाळेतच शिकतात मग आपोआप इतरांची मुलेही सरकारी जि.प. किंवा नगरपालिका शाळेत जातात त्यांचा शिक्षणाचा दर्जाही खाजगी शाळापेक्षा चांगला असतो या पासून बोध घेता येतो की लोकांमध्ये अगदी खेडोपाडी इंग्रजी माध्यमाचे जे फॅड पसरले आहे ते कमी झाले पाहिजे. 

शिवाजी जन्माला यावा पण तो आपल्या घरात नसून शेजाऱ्याच्या घरात यावा आम्ही फक्त तुम लढो -- असे म्हणायचे असे न करता आपल्या घरापासूनच सुरूवात करावी मुलांशी शेजाऱ्यांशी बाजारात मराठीतच बोलावे जर महाराष्टात नोकरी धंदा करायचा तर परप्रांतीयांना कळले पाहिजे इथे मराठीच बोलले पाहिजे. माझे असेही निरिक्षण आहे की परभाषिक हिंदी किंवा अन्य त्यांची दुसरी पिढी जी मुंबईत किंवा महाराष्टात जन्माला आली आहे. ही मुले मराठी उत्तम बोलतात समजतात मुंबई, नवी मुंबईच्या ठाणे, बेलापूर, कल्याण, उरण, पनवेल परिसरात इतर नगरपालिका किंवा जिल्हा परिषदांच्या शाळात नजर टाकली तर असेही चित्र दिसते. अनेक हिंदी भाषिक मुले मराठी शाळांत अधिक शिकतात. पट संख्या वाढावी, नोकरी वाचावी म्हणून प्राथमिक शिक्षक त्यांना गोळा करून आणतात फुकट गणवेश, फुकट पुस्तके, फी माफ इ. या सुविधा ज्या मराठी मुलांकरीता असतात त्याचा लाभभैयांची मुले घेताना दिसतात, गमंत म्हणून एक वात्रटीका मी लिहिली होती.

मराठी मराठी मन से बोलो प्यारे
झेडपीच्या शाळेत शिकती भैयाची पोरे"

हे चित्र बदलले तरच शासनांच्या निधीचाही योग्य विनियोग होईल. समाजाचे रहाणीमान बदलले आहे विचारसरणी बदलली आहे ती बदलणे गरजेचे आहे पण मातृभाषेचा अभिमानही असणे आवश्यक आहे शेवटी समाज महणजे काय तर समाजातील माणसे आहेत अनेकजण एकाच विचाराने प्रेरीत झाले तरच हा कारवा नव्हे ही दिंडी पुढे जाईल. अशी अस्मिता जागृत होणे मराठीच्या भविष्याकरीता संवर्धना करीता महत्वाचे आहे.

सौजन्य -
 डॉ. पाटील अविनाश विठ्ठल
एम.ए., एम.फिल, पीएच.डी, डि सी ए. (जर्नालिझम)

रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर्स साईड तर्फे पत्रकारांचा सन्मान !!

रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर्स साईड तर्फे पत्रकारांचा सन्मान !!

कल्याण, बातमीदार - रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड तर्फे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते यावेळी पत्रकार करीत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. बालक मंदिर सभागृह दत्त आळी  येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये २८ पत्रकारांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. 

रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईडचे अध्यक्ष योगेश कोल्हापुरे यांनी रोटरी क्लब करीत असलेले काम, राबत असलेले प्रोजेक्ट याबाबत माहिती दिली. पत्रकार व रोटरी क्लब मिळून एकत्र काम करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पत्रकार सुरेश काटे व किशोर पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अभिजीत पवार यांनी मिमिक्री करत राजकीय नेत्यांचे हुबेहूब आवाज काढत सर्वांचे मनोरंजन केले. योगेश गोडे व मिसेस गोडे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
पत्रकारांनी रोटरी सारख्या सामाजिक संस्थेचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे व गरजू समाजाला रोटरीन पर्यंत पोहोचवणे ही आजची गरज आहे या विषयावर देखील चर्चा झाली.

पत्रकार व रोटेरियन अनघा पाटील यांनी कार्यक्रमाचे सुबद्धरित्या नियोजन केले. 

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...