नवी मुंबईत ३ नोव्हेंबरला ‘नवी मुंबई करंडक २०२६’ची महाअंतिम फेरी; रंगभूमीचा भव्य उत्सव रंगणार !!
*वाशी येथे महाअंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा; सात उत्कृष्ट एकांकिकांमध्ये रंगणार चुरस, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य!*
नवी मुंबई, प्रतिनिधी : नवी मुंबईच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा देण्याबरोबरच मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने विनोदी अभिनेते कै. विजय कदम आणि कै. प्रदीप पटवर्धन यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘नवी मुंबई करंडक २०२६’ एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी व पारितोषिक वितरण सोहळा सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात उत्साहात पार पडणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रंगणाऱ्या या नाट्यसोहळ्यात नवी मुंबईतील रसिक प्रेक्षकांना दर्जेदार एकांकिकांचा आस्वाद घेता येणार असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
RG7 स्टुडिओज आणि आराध्या रूपाली फिल्म्स यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण २१ नाट्यसंस्थांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सादरीकरणे २४ व २५ ऑक्टोबर रोजी कोपरखैरणे येथील DVS महाविद्यालयात पार पडली. या फेरीतून ‘राधा न बावरली’, ‘खोटं बोल नाऱ्या’, ‘नाडा’, ‘ओल्या भिंती’, ‘पहिली रात्र’, ‘पाटी’ आणि ‘मॅरेथॉन’ या सात एकांकिकांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या सात एकांकिकांमधील कलात्मक सादरीकरणे, अभिनय आणि दिग्दर्शन यांची चुरस रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
या स्पर्धेचे आयोजक रंगराव घागरे आणि मदन मुकादम असून, नवी मुंबईतील ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे, रवी वाडकर, सुनील पगार, दत्ता करे, प्रशांत जोशी, रवी मोरे, रवी पाटील, सचिन पाटील आणि मिलिंद बनसोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच गंगोत्री फिल्म प्रोडक्शनचे निर्माते लक्ष्मीकांत पोपळे, सिद्धार्थ ठोकळे, विलास चव्हाण यांच्यासह नवी मुंबईतील रंगकर्मी, चित्रकर्मी, भावे कट्टा आणि शिवसाई थिएटर्स यांनीही या उपक्रमाला सहकार्य केले आहे.
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे दीपप्रज्वलन प्रसिद्ध अभिनेते रमेश रोकडे आणि ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. प्राथमिक फेरीसाठी गीता घरत, प्रवीण जगन्नाथ आणि जगदीश शेळके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
मराठी रंगभूमीवरील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नाट्यसंस्थांना प्रोत्साहन देणे आणि नवी मुंबईच्या सांस्कृतिक चळवळीला बळकटी देणे, हा या स्पर्धेमागील प्रमुख उद्देश आहे. कै. विजय कदम आणि कै. प्रदीप पटवर्धन यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विनोदी अभिनयाचा आणि रंगभूमीवरील योगदानाचा वारसा पुढे नेण्याचा हा उपक्रम ठरणार आहे.
या महाअंतिम फेरीला नवी मुंबईतील नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांच्या कलागुणांना दाद द्यावी आणि या रंगोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष वृत्त - विश्वनाथ राऊत सर