Wednesday, 21 August 2024

आज, उद्या एस.टी बस सेवा विशेष कार्यक्रमात मग्न ! अनेक गावातील प्रवाशांचे मात्र हाल !!

आज, उद्या एस.टी बस सेवा  विशेष कार्यक्रमात मग्न ! अनेक गावातील प्रवाशांचे मात्र हाल !!

** लाडक्या बहिणी रत्नागिरीला रवाना मात्र त्यांच्या मुलीना शाळेत जाताना करावी लागली पायपीट 

कोकण (शांताराम गुडेकर)
            एसटीची सेवा "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक गाव,वाड्या आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. मात्र रापमतर्फे सोडण्यात येणाऱ्या-जाणा-या एस.टी बसेच ब-याचवेळा वेळेवर सोडल्या जात नसल्याने कोकणवाशीय मुंबईकरांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे खाजगी वाहतूक व्यवस्था जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. ते या प्रवाशांकडून जास्त पैसे घेऊन लुटतात. जर खासगी गाडी बरोबर सुटतात मग एस.टी बस वेळेवर सोडण्यात का येत नाहीत असा संतप्त सवाल कोकणवाशीयांनी एस,टी महामंडळाला विचारला आहे. आज  बुधवार दि. २१ ऑगस्ट २०२४ आणि गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी देवरुख आगारातून विशेष कार्यक्रम साठी काही एस. टी. बस (४० बस फेऱ्या) रद्द करण्यात आल्याचा फलक देवरुख आगार, रत्नागिरी विभाग तर्फे लावण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील बामणोली, ओझरे, कुंडी, आंगवली, सायले, सोनगिरी, बडद वाडी, आंबेड, वायगाने, फणसट, आंबवली, फणसवले आदी अनेक गावात जाणाऱ्या एस. टी बस रद्द होणार आहेत.त्यामुळे याचा नाहक त्रास विद्यार्थी वर्ग, कामगार वर्ग शिवाय हॉस्पिटल किंवा अन्य महत्वपूर्ण कामाला जाणाऱ्या लोकांना नक्कीच सहन करावा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत आले असून लाडकी बहीण योजनेचा औपचारिक शुभारंभ केला. लाडक्या बहिणींना घेऊन लाल परी रत्नागिरीत जरी गेली असली तरी त्याच वेळेस  शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र हाल झाले. त्यामध्ये लाडक्या बहिणीची मुलगी पण होती.

**** योजना कितीही जनतेच्या फायद्याची असली तरी त्याच्या शुभारंभाचा इव्हेंट करताना त्यामुळे सर्वासामान्यांचे हाल होणार नाही  याचा विचार का नाही होत?

             विशेष कार्यक्रमांसाठी एस. टी देण्यासाठी आमचा विरोध नाही. पण प्रवाश्याना होणाऱ्या गैरसोईचे काय? स्थानिक लोकप्रतिनिधी यासाठी काय सोय करणार का? कारण निवडणूक प्रचार असला की १००/१५० गाड्या मतदार संघात फिरतात मग आता ही सोय विशेष कार्यक्रमला किंवा प्रवाशी सेवेसाठी का उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी एस. टी घेऊन गोरगरीब प्रवाशी यांना त्रास का असा सवाल प्रवासी प्रशासनला, लोकप्रतिनिधी, संबंधित विभाग यांना  विचारत आहे.
            आज  संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशी यांना नाहक त्रास सहन करावा लागला. लाडक्या बहिणी रत्नागिरीला रवाना मात्र त्यांच्या मुलीना शाळेत जाताना पायपीट करावी लागली. तीन -चार तासचालत जावे लागले.आज‌ (दि. २१ ऑगस्ट) आघाडीच्या वतीने डेपो मॅनेजर यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बंडया बोरुकर, विधानसभा संघटक रोहन बने, माजी सभापती देवरुख अजित गवाणकर, शरद पवार गटाचे तालुका प्रमुख बाबा साळवी, पत्रकार संदीप गुडेकर, विधानसभा संघटक दत्ताराम लिंगायत, जिल्हा प्रमुख बारक्यासेट बने सर्व शिवसैनिक आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते, सर्व प्रवाशी यांनी डेपो मॅनेजर यांना जाब विचारला. ४० बस देवरुख डेपोतून या विशेष कार्यक्रमला गेल्या आहेत. ७५ पैकी त्या पैकी ३५ बस देवरुख डेपोत उपलब्ध आहेत. त्याचे नियोजन करून सर्व बस वेगवेगळ्या गावात सेवा देणार आहेत. आजच्या आज सर्व बस देवरुख डेपो परत मागवा आणि आजच्या आज विद्यार्थी, प्रवाशी, नोकरदार यांना प्रवास करणासाठी उपलब्ध करून द्या अशी मागणी केली. तसेच उद्या कोल्हापूर येथे देवरुख डेपोतून १५ बस रवाना होणार आहेत. त्या तात्काळ रद्द करा. आणि  पूर्वीप्रमाणे रेगुलर गाड्या सोडा. जर का असे झाले नाही आणि पायी प्रवास करताना किंवा खाजगी वाहनाने जाताना बदलापूर सारखा विषय घडला तर त्याला जबाबदार कोण? आगार व्यवस्थापक यांनी वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी देवरुख डेपोला कुलूप लावण्यात येईल असा इशारा उद्धव ठाकरे गट तालुका प्रमुख संगमेश्वर बंड्या बोरुकर यांच्यासहित आघाडीच्या सर्व पदाधिकारी, प्रवासी यांच्यावतीने देण्यात आला आहे. त्याची दाखला घेऊन बस आता देवरुख डेपोतून सोडण्यात येत आहेत. डेपो मॅनेजर यांनी सांगितले की, आम्हाला आदेश होता मुख्यमंत्री यांचा लेखी म्हणून आम्ही आज (२१ ऑगस्ट) रत्नागिरीला बस सोडण्यात आल्या आहेत. डेपो मॅनेजर यांनी दाखल घेऊन आता पासून बस खेडे गावात सोडायला देवरुख डेपोतून सुरुवात केले आहे.

वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई यांच्यातर्फे परळ येथे शालेय साहित्य वाटप !

वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई यांच्यातर्फे परळ येथे शालेय साहित्य वाटप !

मुंबई (शांताराम गुडेकर)
           वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनल जिल्हा 3231 A1 यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २०/८/२०२४ रोजी परेल, पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई येथे प्रमुख पाहुणे मुंबईचे माजी नगरपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023 2024 चे लायन डॉ.जगन्नाथराव हेगडे आणि WHRAF चे राष्ट्रीय अध्यक्ष, लायन्स क्लब आँफ मुंबई मिडटाऊन डिस्ट्रिक 3231A1 चे फर्स्ट व्हॉइस प्रेसिडेंट लायन जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या वतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटपाचा कार्यक्रमपार पडला. याप्रसंगी  WHRAF चे जनरल सेक्रेटरी अमोल वंजारे महाराष्ट्र सचिव सौ.ज्योतीताई भोसले, मुंबई जनरल सेक्रेटरी सौ.प्रमिला अडसूळ, मुंबई सेक्रेटरी महेश आंब्रे, नंदकुमार बागवे, मुंबई सहसचिव साक्षात म्हात्रे, छत्रपती मराठा साम्राज्य संघटना एडमिन अभिजीत  ढेरे, शिवसेना शाखाप्रमुख २०३ मिनार नाटळकर, महिला शाखा समन्वयक सौ.दिव्या बडवे, उपशाखा संघटिका अनिता मांजरेकर, गटप्रमुख निलेश बागवे, हिंदुस्तान माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे मुंबई चिटणीस लितेश केरकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष राजकुमार कानोजिया, कार्याध्यक्ष दिनेश लोखंडे, सचिव संचित राजपूत, पारस कनोजिया, सुमित येरम, समाजसेवक दिलीप वरेकर, ज्येष्ठ नागरिक, पालक व विद्यार्थी, स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश भक्त कोकणवासीय प्रवासी संघाचा कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळा - २०२४ माटुंगा येथे संपन्न !!

गणेश भक्त कोकणवासीय प्रवासी  संघाचा कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळा - २०२४ माटुंगा येथे संपन्न !!

** यावर्षी गौरी - गणपती उत्सवासाठी प्रवासी संघाच्या माध्यमातून १२०० जादा ग्रुप बुकिंग गाड्यांचे आरक्षण

मुंबई - ( दिपक कारकर ) 

        गणेश भक्त कोकणवासिय प्रवासी संघांचे स्नेह संमेलन रविवार दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी यशवंतराव नाट्यगृह माटुंगा येथे कौटुंबिक स्नेहसंमेलन सोहळा- २०२४ मान्यवर, प्रवासी संघ परिवार हितचिंतक यांच्या उपस्थित संपन्न झाला. स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तुकाराम काते तसेच समाजसेवक आणि संस्थेचे हितचिंतक श्रीधर (काका) कदम हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

            स्नेहसंमेलन सोहळा मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेश प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरवात झाली. संस्थेची प्रस्तावना करताना कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. त्याच बरोबर यावर्षी गौरी -गणपती उत्सवा साठी प्रवासी संघाच्या माध्यमातून १२०० जादा ग्रुप बुकिंग गाड्यांचे आरक्षण करण्यात आल्याचे सांगितले.

               प्रती वर्षी विद्यार्थी सत्कार आणि शिषवृत्ती देऊन मुलांचा सत्कार करण्यात येतो. या वर्षी इयत्ता दहावी मधून कु. मुग्धा राजेंद्र सुरवे, इयत्ता बारावी- साक्षी राजेंद्र दणदने, पदवीधर  मधून - कु.ईशा अनिल आगरे आणि कु.चिंतन नथुराम म्हादे ( न्यूट्रिशन डॉक्टरेट पदवीधर ) सर्व विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कार्यकर्ता सन्मान अर्नाळा विभागाचे गणेश फिलसे यांना देण्यात आले. स्नेहसंमेलन सोहळा निमित्त अफलातून कॉमेडी आणि संजय खापरे यांचे अभिनीत असणारे " सैरभैर " ह्या नाट्य प्रयोगाने रसिकांचे मनोरंजन केले.

         गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ, ही संस्था गेली ३८ वर्षे प्रवाश्यांच्या सेवे साठी कार्यरत आहे. प्रवासी संघाच्या माध्यमातून एस. टी. महामंडळाच्या सहकार्याने गौरी - गणपती सणात एस. टी. १२०० पेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन होते, कार्तिकी पंढरपूर यात्रे करीता १०० पेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन होते, होळी सण, उन्हाळी हंगाम,आणि प्रवाशांच्या गरजेनुसार एस. टी. गाड्यांचे नियोजन केले जाते. प्रवासासोबत ग्रामीण भागात शैक्षणिक, आदिवासी पाड्यात वैद्यकीय उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात.

            या कार्यक्रमासाठी संस्थेचे संघटक अनिल काडगे, कोषाध्यक्ष -विश्वनाथ मांजरेकर त्याचप्रमाणे विभाग वर पदाधिकारी मुंबई विभाग- श्रीधर आग्रे, अशोक नाचरे / परळ विभाग - रमेश तेजम, मधुकर जोईल,रघुनाथ माधव / कुर्ला विभाग- भास्कर चव्हाण, रमेश बने, रणजीत वरवटकर /बोरिवली विभाग - किशोर सावंत, लक्ष्मण मंचेकर, भागोजी सोलकर/ नालासोपारा विभाग - अजित दौंडे /संजय जावळे अर्नाळा विभाग- गणेश फिलसे हजर होते. सोहळयाची सांगता संस्थेचे अध्यक्ष रविंद्र मुकनाक यांनी उपस्थित मान्यवर, हिचंतक, प्रवासी संघ परिवार यांचे आभार मानून अध्यक्षांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता  करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव चंद्रकांत बुदर यांनी केले.

Tuesday, 20 August 2024

पालशेत मध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित; महावितरण उपअभियंता गुहागर यांना मनसेचे निवेदन‌ !

पालशेत मध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित; महावितरण उपअभियंता गुहागर यांना मनसेचे निवेदन‌ !

गुहागर (पालशेत) : उदय दणदणे

गुहागर तालुक्यातील पालशेत आणि संपूर्ण पंचक्रोशीत गेले अनेक दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढत असून, वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर बाबत येथील मनसे विभाग प्रमुख प्रसाद विखारे (पालशेत) यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी महावितरण, उपअभियंता गुहागर  यांच्याकडे निवेदन देत लक्ष वेधले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, पालशेत येथे गेले काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून,परिणामी येथील विद्यार्थी, व्यापारी वर्ग, नागरिकांना फार मोठया नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात गणपती कारखाने असल्याने त्यानाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, गणेशोत्सव पूर्व येथील वीजपुरवठा सुरळीत होण्याबाबत  योग्य निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती ही या निवेदनातून करण्यात आली आहे, निवेदन देताना मनसे विभाग प्रमुख प्रसाद विखारे, सुहास नरवणकर सह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

वाडा शहरातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करणे अत्यावश्यक !!

वाडा शहरातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करणे अत्यावश्यक !!

वाडा, प्रतिनिधी : केवळ धार्मिक नव्हे तर स्वातंत्र्य चळवळी पासून असलेले वाडा शहरातील विविध प्रकारचा सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवा देखील जपणारे शहरातील श्रध्दास्थान श्रीराम मंदिर सध्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून मंदिराच्या काही भागाची पडझड होण्यास सुरूवात झाली आहे.. 

साधारणपणे पाच दिवसांपूर्वी या मंदिराचा काही भाग जीर्ण झाल्याने कोसळला असून येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला तर त्याच्या आजूबाजूचा भाग देखील सहज कोसळेल अशा अवस्थेत असल्याचे वरील फोटो पाहून सहज लक्षात येते.

काही दिवसांपूर्वी श्रीराम मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचा संकल्प मंदिर विश्वस्त समितीने केला होता, पण मधल्या काळात याबाबत नंतर काय प्रगती झाली ते मात्र शहरातील रहिवाशांना अजूनही कळले नाही..

तरी कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी श्रीराम मंदीर विश्वस्त समिती ने सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने मंदिर जीर्णोद्धाराचे काम तातडीने हाती घ्यावे अशी अपेक्षा शहरवासी करत आहेत.

Monday, 19 August 2024

कुटगिरी गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता एकनाथ डिंगणकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !!

कुटगिरी गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता एकनाथ डिंगणकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !!

मुंबई - ( दिपक कारकर )

गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावी एका सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेले एकनाथ धर्मा डिंगणकर हे नाव आज सामाजिक पटलावर सर्वश्रुत आहे. विविध संस्थेत कार्यरत व प्रत्येकाच्या सुख - दुःखात सतत सहकार्य आणि मदतीची तयारी हे त्यांच्या स्वभावाचे खरे वैशिष्ट्य आहे.कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा विरार शाखेचे सचिव पद, सदर संस्थेच्या विस्तार - वाढीसाठी व तरुणांना एकजूट करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे हे व्यक्तिमत्व अनेकांना प्रिय आहे. वाडी- गाव - तालुका पातळीवर कला/क्रिडा/सामाजिक/शैक्षणिक/सांस्कृतिक/आरोग्य क्षेत्राशी निगडित उपक्रमात त्यांचे योगदान कायमच असते.

कौटुंबिक उदरनिर्वाह करिता गेली अनेक वर्षे ते एल.आय.सी. विमा सल्लागार म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहेत. ह्यातून सामाजिक दायित्व जपण्याचा त्यांचा स्वभावीक गुण आहे. आपल्या संपर्कातून मित्र - परिवार यांचा मोठा गोतावळा त्यांनी निर्माण केला आहे.अशा प्रेमळ,मनमिळावू स्वभाव कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला "पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था ( कार्यक्षेत्र भारत )" उपरोक्त संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय "आदर्श विमा सल्लागार पुरस्कार - २०२४" ने सन्मानित केले. नुकतेच ह्या सोहळ्याचे वितरण रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी, न्यू आयडियल स्कुल आणि ज्युनियर कॉलेज, वासिंद,( प.) ता. शहापूर, जि ठाणे येथील सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पकरंडक, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते/शाहीर एकनाथ डिंगणकर यांचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

कर्जाने आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन; रोटरी क्लबच्या उपक्रम !

कर्जाने आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे समुपदेशन; रोटरी क्लबच्या उपक्रम !

चोपडा, प्रतिनिधी - शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आपले जीवन जगत असताना चांगले वा वाईट अनुभव येत असतात. या अनुभवातून ते पुढे एक सुजाण नागरिक म्हणून तयार होत असतात. शालेय विद्यार्थ्यांच्या योग्य जडणघडणीसाठी तालुक्यातील कर्जाने येथील आश्रमशाळेत चोपडा येथील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब आणि समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'गुड टच व बॅड टच' या संकल्पना विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी व त्या बाबत जागृती करण्यासाठी डॉ. मोहिनी उपासनी (समाजकार्य महाविद्यालय, चोपडा) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानातून विद्यार्थी व विद्यार्थिनींना आपल्या आजूबाजूचे परिचित लोक, नातेवाईक आपणास कशा पद्धतीने स्पर्श करतात? त्या स्पर्शामध्ये चांगला स्पर्श व वाईट स्पर्श कोणता असतो? याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कोणी आपल्या लैंगिक अवयव आणि वैयक्तिक भाग यांना मुद्दाम - सहेतुक स्पर्श करत असेल तर ते म्हणजे बॅड टच व नजरचुकीने किंवा अनावधानाने झालेला स्पर्श यातील फरक समजून घ्यावा. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची डॉ. उपासनी यांनी उत्तरे देऊन शंका समाधान केले.

         किशोरवयीन मुला मुलींच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य रोटे. डॉ. ईश्वर सौंदाणकर, प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर साखरे, डॉ मुकेश पाटील व पूनम गुजराथी, इनरव्हील क्लब चोपडा अध्यक्षा सौ.डॉ. वैशाली सौंदाणकर, सरोज पाटील, कलप्ना महाजन, सुप्रिया कचरे, अनिल बाविस्कर आणि समाजकार्य महाविद्यालयातील प्रा डॉ रायपूर, प्रा. वळवी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षक - शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...