Saturday, 23 May 2026

आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
भूपाळी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित उरण येथे आरोग्य शिबिर राबविण्यात आले . भूपाळी मध्ये वंचित बहुजन आघाडी उरण तालुका उपाध्यक्ष तुषार उत्तम गायकवाड  यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उरण क्रोप्रोली सरकारी दवाखाना मार्फत वैद्यकीय चिकित्सा डॉक्टर  डॉ. पुजा पाटील यांनी नागरिकांना तपासणी केली आणि औषध उपचार करण्यात आले. 

सेक्टर १२ द्रोणागिरी नोड रहिवाशी, भूपाळी सोसायटी द्रोणागिरी नवी मुंबई मधील रहिवाशी, भूपाळी सोसायटी द्रोणागिरी नवी मुंबई मधील रहिवाशी, भैरवी सोसायटी मधील रहिवाशी,भूपाळी गृहसंकूल, मल्हार गृहसंकूल, भैरवी गृहसंकूल आणि सेक्टर १२ मधील रहिवाशांनी महिलांनी  वृध्द व्यक्तींनी शिबीराचा मोठया प्रमाणात लाभ घेतला. या शिबिराला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला.क्रोप्रोली सरकारी दवाखाना मधील  डॉ पुजा पाटील,आरोग्य सेवक संदीप पारस्वले, सीमा बंडा आशा सेविका नवघर, अर्पणा बंडा आशा सेविका नवघर,आरोग्य सेवक हेमंत यांचे विशेष सहकार्य लाभले

डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल यांच्यावर चौकशीचे आदेश; मुख्यमंत्री सचिवालयाकडून कारवाईच्या सूचना !!

डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल यांच्यावर चौकशीचे आदेश; मुख्यमंत्री सचिवालयाकडून कारवाईच्या सूचना !!

कल्याण , संदीप शेंडगे : कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कथित अनागोंदी कारभार, दलालांचे वाढते हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कामकाजाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्याने मुख्यमंत्री सचिवालयाने याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. 

राष्ट्रीय मानव हक्क मंचाचे अध्यक्ष शरद काशिनाथ धुमाळ यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे सादर केलेल्या निवेदनात डेप्युटी आरटीओ आशुतोष बारकुल यांच्या कामकाजावर गंभीर आरोप केले आहेत. कार्यालयात नागरिकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत असून दलालांच्या माध्यमातूनच कामे होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

प्रशासनिक कामकाजात पारदर्शकतेचा अभाव, कर्तव्यातील दुर्लक्ष, नागरिकांशी गैरवर्तणूक आणि शासकीय नियमांचे उल्लंघन यासंदर्भातही तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, कोकण विभाग यांनी परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांना चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

आदेश प्राप्त झाल्यानंतर कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चौकशीदरम्यान कार्यालयातील व्यवहार, दलालांची साखळी आणि नागरिकांच्या तक्रारींची सखोल पडताळणी केली जाणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी आरटीओ कार्यालयातील कारभार अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

टिटवाळा येथील म्हारळ‘ गावात पिंटया उर्फ डोक्या’ची धारदार शस्त्रान हत्या !!

टिटवाळा येथील म्हारळ‘ गावात पिंटया उर्फ डोक्या’ची धारदार शस्त्रान हत्या !!

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण तालुका पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या  म्हारळगाव परिसरात गुरुवारी रात्री भीषण हत्याकांड घडले यात रविंद्र उर्फ डोक्या यशवंत अहिरे या ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मृत रविंद्र अहिरे हा म्हारळगाव परिसरात वास्तव्यास होता. त्याचा भाऊ राहुल अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक सुखदेव डांगे याच्यासह विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांविरोधात खूणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक एक दीपक डांगे याच्याविरोधात लता माळी नावाच्या महिलेला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास रविंद्र अहिरे याने सांगितल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणातून आरोपींनी कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शुक्रवार दिनांक २२ में रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास म्हारळगाव येथील मलखांब कंपाऊंड परिसरात रविंद्र अहिरे याच्यावर तिघांनी जीवघेणा हल्ला केला.

आरोपींनी धारदार शस्त्राने रविंद्रच्या पोटावर, डोक्यावर, पाठीवर चेहऱ्यावर तसेच शरीराच्या विविध भागांवर सपासप अतिशय निर्गुणपने वार केले. या भीषण हल्ल्यात रविंद्र गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रविंद्रला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी तांत्रिक तपास, स्थानिक माहिती आणि हालचालींचा मागोवा पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

Friday, 22 May 2026

जासई गावाला ऐतिहासिक दिलासा ; मा. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर ठरवले !!


जासई गावाला ऐतिहासिक दिलासा ;  मा. मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोचे भूसंपादन बेकायदेशीर ठरवले !!

** बेकायदेशीर फेरफार नोंदींच्या आधारे होणारी पाडकाम कारवाई थांबणार, ४०० हून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) :
नवी मुंबई परिसरातील जमीनमालकांसाठी दूरगामी परिणाम करणाऱ्या एका ऐतिहासिक निर्णयामध्ये, बॉम्बे हाय कोर्ट यांनी उरण तालुक्यातील जासई गावासंदर्भात सिडको यांनी राबविलेली भूसंपादन प्रक्रिया सुरुवातीपासूनच बेकायदेशीर व शून्य (Void Ab Initio) असल्याचे घोषित केले असून, अनेक वर्षांपासून आपल्या मालमत्ता हक्कांवर होत असलेल्या बेकायदेशीर हस्तक्षेपाविरोधात लढा देणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या संपूर्ण कायदेशीर लढ्याचे नेतृत्व अँड. संकेत दिपक ठाकूर यांनी केले. त्यांनी प्रभावित जमीनमालकांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडत, योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता करण्यात आलेले भूसंपादन, बेकायदेशीर फेरफार नोंदी, तसेच ग्रामस्थांवर करण्यात आलेल्या दबावतंत्राला आव्हान दिले. शशिकला भोलनाथ पाटील, गोगरी कुटुंब आणि एन. जी. ठाकूर यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या वतीने दाखल करण्यात आलेली ही याचिका आता नवी मुंबई परिसरातील भूसंपादन प्रकरणांमधील एक महत्त्वपूर्ण कायदेशीर विजय मानली जात आहे.

नवी मुंबई प्रकल्पासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनांनंतर सिडकोने जासई गावातील मोठ्या प्रमाणातील जमिनी स्वतःच्या नावावर ७/१२ उताऱ्यांमध्ये व महसुली नोंदींमध्ये दाखल करण्यास सुरुवात केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया कायदेशीररीत्या पूर्ण झालेली नसताना आणि अनेक जमीनमालकांना कोणतीही नुकसानभरपाई न देता या नोंदी करण्यात आल्या. इतकेच नव्हे तर, अशा वादग्रस्त फेरफार नोंदींच्या आधारे पाडकाम नोटिसा बजावण्यात आल्या व ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण गावामध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

ग्रामस्थांचा आरोप असा होता की, सिडकोने या बेकायदेशीर भूसंपादन फेरफार नोंदींचा वापर करून नागरिकांवर तथाकथित “२२.५% योजना” स्वीकारण्यासाठी दबाव निर्माण केला. ग्रामस्थांच्या मते, या योजनेअंतर्गत जमीनमालकांना Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 अंतर्गत मिळणाऱ्या बाजारभावाच्या चारपट नुकसानभरपाईसह २०% विकसित जमीन या कायदेशीर हक्कांपासून वंचित केले जात होते. अनेक ग्रामस्थांनी असा आरोप केला की, चुकीच्या महसुली नोंदी, पाडकामाची भीती आणि प्रशासनिक दबाव यांच्या माध्यमातून जमीनमालकांना संमती देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.

अँड .संकेत ठाकूर यांनी  मुंबई उच्च न्यायालयात भूसंपादन प्रक्रियेच्या वैधतेलाच आव्हान देत मांडणी केली की, सिडको व संबंधित प्रशासनाने कायदेशीर तरतुदी, घटनात्मक हक्क आणि सक्तीच्या प्रक्रियांचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. महसुली नोंदींमध्ये नाव चढविणे म्हणजे मालकी हक्क प्राप्त होणे नाही, जोपर्यंत कायदेशीर आणि वैध भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होत नाही, असा युक्तिवाद न्यायालयासमोर करण्यात आला.

दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये उच्च न्यायालयाने भूसंपादन प्रक्रिया लॅप्स झाल्याचे घोषित करत ती कायद्यानुसार शून्य ठरविली. न्यायालयाने मूळ जमीनमालकांच्या नावे महसुली नोंदी पुनर्स्थापित करण्याचे तसेच सिडकोच्या नावाने करण्यात आलेल्या फेरफार नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले.

तथापि, न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही, संबंधित बेकायदेशीर भूसंपादन नोंदी महसुली अभिलेखांमध्ये कायम राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे ग्रामस्थांना सतत त्रास, मानसिक दबाव आणि असुरक्षिततेला सामोरे जावे लागत होते. यानंतरअँड.संकेत ठाकूर यांनी न्यायालयाच्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल केली.

दि. ०८ मे २०२६ रोजी मा. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य प्रशासन आणि सिडकोवर तीव्र नाराजी व्यक्त केली व चार आठवड्यांच्या आत बेकायदेशीर भूसंपादन फेरफार नोंदी हटविण्याचे आदेश दिले. तसेच आदेशाचे पालन न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित राहावे लागेल आणि संबंधित विभागावर खर्च (Costs) लादला जाऊ शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिला.

या निर्णयानंतर आता बेकायदेशीर फेरफार नोंदींच्या आधारावर सुरू करण्यात येणारी घरांची व संरचनांची पाडकाम कारवाईही थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण सिडकोकडून करण्यात येणाऱ्या अनेक कारवाया या वादग्रस्त महसुली नोंदींवर आधारित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी सातत्याने केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर अशा नोंदींचा कायदेशीर आधारच संपुष्टात आल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाच्या या हस्तक्षेपानंतर आता राज्य प्रशासनाने संपूर्ण जासई गावातील ७/१२ उतारे, फेरफार नोंदी आणि इतर महसुली अभिलेखांमध्ये दुरुस्ती व बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे ४०० हून अधिक प्रभावित कुटुंबांना थेट दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून वादग्रस्त भूसंपादन नोंदींमुळे निर्माण झालेला मालकी हक्कांवरील प्रश्न आता दूर होत आहे. अनेक ग्रामस्थांसाठी ही महसुली दुरुस्ती म्हणजे त्यांच्या कायदेशीर मालकी हक्कांची अधिकृत पुनर्स्थापना मानली जात आहे.

हा निर्णय केवळ जासई गावापुरता मर्यादित नसून, नवी मुंबईतील इतर अधिसूचित गावांमधील जमीनमालकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे कोणतीही विकास प्राधिकरणे कायदेशीर भूसंपादन, नुकसानभरपाई आणि घटनात्मक प्रक्रिया पूर्ण न करता केवळ महसुली नोंदी बदलून खाजगी जमिनींवर हक्क सांगू शकत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

अँड.संकेत ठाकूर यांनी सांगितले की, सिडकोसारख्या प्राधिकरणांकडून होत असलेल्या बेकायदेशीर भूसंपादन आणि मनमानी कारभाराविरोधातील लढा अद्याप सुरू असून, हा निर्णय ही केवळ सुरुवात आहे. ग्रामस्थांना दबावाखाली संमती देण्यास भाग पाडणे, वादग्रस्त फेरफार नोंदींचा आधार घेऊन पाडकामाची भीती निर्माण करणे आणि कायद्याला बगल देणे, अशा प्रकारांविरोधात पुढेही कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जासई ग्रामस्थांसाठी हा निर्णय अनेक वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर त्यांच्या सन्मान, मालकी हक्क आणि सुरक्षिततेची पुनर्स्थापना करणारा ठरला आहे. ग्रामस्थांच्या मते, हा निर्णय म्हणजे बेकायदेशीर भूसंपादन आणि चुकीच्या महसुली नोंदींच्या आधारावर सुरू असलेल्या दडपशाहीतून मिळालेली ऐतिहासिक मुक्तता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पालिकेच्या अ प्रभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !!

कल्याण, संदीप शेंडगे : पालिकेच्या अ प्रभाग क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिका प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत 100 हून अधिक अनधिकृत खोल्या तसेच सुमारे 70 जोते जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोरसे तसेच सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या उपस्थितीत ही व्यापक कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे पथक आणि यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती.

पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकामे परवानगीशिवाय उभारण्यात आली होती. वारंवार नोटिसा देऊनही बांधकामे हटविण्यात आली नसल्याने अखेर ही कठोर कारवाई करण्यात आली.

 या मोहिमेत जेसीबी आणि इतर यंत्रांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. कारवाईदरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.

कल्याण परिमंडळ ०३ ची आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई; तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त !!

कल्याण परिमंडळ ०३ ची आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई; तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त !!

डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांचा मोठा घाव

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण परिमंडळ ०३ अंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत तब्बल ३४ कोटी १८ लाख ५४ हजार रुपये किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे. ही कारवाई परिमंडळ ०३ मधील आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई मानली जात असून, यामुळे अमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले आहेत.

डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे कल्याण परिसरात पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी सकाळच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील स्मशानभूमी परिसर आणि सांगळे वाडी मार्गावर अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना दोन संशयित इसम संशयास्पद हालचाली करताना आढळले.

पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही जागीच ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात हेरॉईन (गर्द) जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत तब्बल ३४ कोटींहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कासिम अब्दुल सतार (वय ३८, शाहापूर, ठाणे) आणि कृष्णा नागण्णा हक्केमणी वय ३६, (सायन कोळीवाडा, मुंबई) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात हे आरोपी अमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणातील मुख्य पुरवठादार आणि इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. दयानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीपी अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या यशस्वी कारवाईमुळे कल्याण परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले असून, अमली पदार्थ तस्करांविरोधातील मोहिम आणखी तीव्र करण्याची मागणी होत आहे.

Thursday, 21 May 2026

संत एकनाथ रंगमंदिर येथे २३ मे रोजी 'लोकशिव आख्यान' कार्यक्रमाचे आयोजन !!

संत एकनाथ रंगमंदिर येथे २३ मे रोजी 'लोकशिव आख्यान' कार्यक्रमाचे आयोजन !!

छ. संभाजीनगर (प्रतिनिधी):

शहरात प्रथमच आगळ्या वेगळ्या धाटणीतील 'लोकशिव आख्यान' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि गुणगानाचे लोककलेच्या माध्यमातून सादरीकरण करणारा हा विशेष कार्यक्रम शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजता संत एकनाथ रंगमंदिर येथे रंगणार आहे.

महाराष्ट्रभर या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, लोककला आणि शिवचरित्र यांचा संगम असलेल्या या आख्यानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कार्यक्रमातील प्रत्येक गीतावर तरुणाई आणि महिला उत्स्फूर्तपणे नृत्य व गायनात सहभागी होत असल्याचा अनुभव आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या कार्यक्रमात वासुदेव, हलगी, ढोलक, डफ, बासरी, तुणतुणे यांसारख्या पारंपरिक आणि देशी वाद्यांच्या साथीने - छत्रपती शिवाजी महाराजांचे ने गुणगान सादर करण्यात येणार - आहे. लोप पावत चाललेल्या

अनेक लोकवाद्यांचे पुनर्जीवन या कार्यक्रमातून होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच गण, गौळण, जोगवा यांसारख्या लोकपरंपरांसह मृदंग आणि बासरीची सुंदर जुगलबंदीही रसिकांना अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमाचे निर्माते, गीतलेखक आणि संगीतकार योगेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम समाजाच्या अंतिम घटकापर्यंत पोहोचावेत यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. कार्यक्रमातील सर्व कलाकार महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भाग, वाडी-वस्ती आणि दुर्गम क्षेत्रांतून सहभागी झाले असून, प्रत्येक कलाकाराने आपल्या कलेत जीव ओतला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ग्रामीण आणि लोककलावंतांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनोख्या लोककला सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांसाठी विशेष अभियान २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ अभियानाचा लाभ घे...