Friday, 27 October 2023

मुरबाड तालुक्याचे सुपुत्र आमदार किसन कथोरे यांचा राजकीय जीवनाचा ४२ वर्षे व आमदारकीचा सलग १९ वर्षे विकासाचा प्रवास !!

मुरबाड तालुक्याचे सुपुत्र आमदार किसन कथोरे यांचा राजकीय जीवनाचा ४२ वर्षे व आमदारकीचा सलग १९ वर्षे विकासाचा प्रवास !!

बदलापूर, प्रतिनिधी : कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्व सामान्य कुटुंबातील मुलगा सरपंच ते आमदार असा प्रवास केलेले विकासाच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे मुरबाड तालुक्याचे सुपुत्र, बदलापूर शहराला कर्मभूमी मानणारे आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी बदलापूर येथे किसन कथोरे यांनी आमदार म्हणून १९ वर्षे पूर्ण केली व राजकीय जीवनांतील ४२ वर्षे यानिमित्ताने विकासपर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यात ऑडिओ, व्हिडिओ क्लिप या मधून आमदारांचा राजकीय जीवनाचा प्रवास व जेष्ठ पत्रकार भूषण करंदीकर यांच्या सोबत वार्तालाप ज्यामधून आमदारांनी त्यांनी राजकीय जीवनात केलेल्या विकास कामांची विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नाची संपुर्ण जबाबदारी घेणे, बदलापूर शहर लोडशेडींग मुक्त करणे, ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, पाइपलाइन द्वारे घराघरात पाणी पुरवठा, बारावी डॅम परियोजना पुर्ण, असंख्य रुग्णांचे मोतीबिंदू ऑपरेशन, डोळे तपासणी व चष्मा वाटप सर्व मोफत, असे व इतर अनेक विकासकामे यांची माहिती दिली तसेच २०२९ साठी आमदारांनी त्यांचे असलेले व्हिजन सुध्दा सांगितले .

यावेळी असंख्य चाहते, नागरिक असा प्रचंड जनसमुदाय यावेळी उपस्थित होता, या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, आमदार कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, सर्व पक्षीय पदाधिकारी, मा. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, सरपंच, सदस्य, कार्यकर्ते असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

पिंपरीहाट पंचायत कर्मचारी यांचेवर अन्याय... बेमुदत उपोषणाचा इशारा !!

पिंपरीहाट पंचायत कर्मचारी यांचेवर अन्याय... बेमुदत उपोषणाचा इशारा !! 

भडगाव, प्रतिनिधी.. तालुक्यातील पिंपरी हाट गावाचे पाणीपुरवठा कर्मचारी रविंद्र पाटील हे कायम कर्मचारी असून गेली कित्येक वर्ष गावाला चोख सेवा देत होते. तीन महिन्यापूर्वी त्यांच्या मुलाचा व काही लोकांत वाद झाल्याने, त्यांच्या मुलावर कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचारी यांना रविंद्र पाटील यांना कामावरून कमी केले. त्यातून त्यांना घरी ठेवण्यात आले. या संदर्भात प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी तोंडी तसेच लेखी विनवणी करत प्रयत्न केले. या नंतर ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्यसचिव कॉम्रेड अमृत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष शिवशंकर महाजन यांनी मध्यस्थी करून बैठक घेतली, ही बैठकीत त्यांना कामावर घेण्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय होऊन.. त्यावेळी त्यांना घेण्याचे आश्वासन दिले.. प्रत्यक्षात त्यांना कामावर घेतले नाही हा अन्याय आहे. म्हणून शेवटी येत्या नऊ नोव्हेंबर रोजी श्री पाटील व त्यांची पत्नी ग्रामपंचायत समोर उपोषण करून न्यायासाठी लढा देणार आहेत.. 

पैसे नसल्याने पाण्यात बुडालेल्या अल्पवयीन तरुणावर उपचार करण्यास रुग्णालयाचा नकार, तब्बल पाच तास रुग्णवाहिकेतून फरफट ?

पैसे नसल्याने पाण्यात बुडालेल्या अल्पवयीन तरुणावर उपचार करण्यास रुग्णालयाचा नकार, तब्बल पाच तास रुग्णवाहिकेतून फरफट ?

कल्याण, (संजय कांबळे) : नवरात्र उत्सवात देवीचे विसर्जन करताना पाण्यात बुडालेल्या एका अल्पवयीन तरुणाला इतरांनी तर माणुसकी म्हणून वाचविले परंतु त्याच्या वर पुढील उपचार करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून कल्याण पुर्वेतील एका रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला आणि मुंबई येथील केईएम सरकार रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले, परंतु तेथेही बेड उपलब्ध नाही असे उतर मिळाल्याने पुन्हा या तरुणाला उल्हासनगर येथील खेमाणी रोड परिसरातील रुग्णालयात आणण्यात आले, पण दुर्दैवाने येथेही त्याच्या वर उपचार झाले नाहीत, अखेरीस शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने या तरुणावर उपचार सुरू झाले आहेत, त्यामुळे तब्बल ५ तास  मुंबई उल्हासनगर अशी फरफट या तरुणांची झाली, यामुळे उपचार नाकारणा-या या रुग्णालयावर कारवाई होणार का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

कल्याण पुर्व नेवाळी येथे राहणारा कमल चौहान हा अल्पवयीन तरुण दुर्गा देवी विसर्जन करण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला, त्याचा आरडाओरडा पाहून इतरांनी त्याला वाचविला, परंतु त्याच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्याला पुढील उपचार मिळणे आवश्यक होते, त्यामुळे त्याला कल्याण पुर्व येथील जन कल्याण रुग्णालयात  नेले, मात्र पैसे नसल्याचे रुग्णालयाच्या लक्षात येताच, त्यांनी याला रुग्णवाहिकेतून मुंबई येथील केईएम सरकारी रुग्णालयात पाठवले, परंतु तेथेही बेड नाही असे उत्तर मिळाल्याने अखेरीस पुन्हा याला उल्हासनगर येथे खेमाणी परिसरात आणण्यात आले, पण येथेही उपचार करण्यास नकार दिल्याने या तरुणाची प्रकृती चिंताजनक बनली, हे बघून येथील गणेश म्हात्रे यांनी मी पैसे भरतो पण या तरुणावर उपचार करा असे सांगितले. पण तरीही रुग्णालयाने नकार दिला. त्यामुळे त्यांने ही घटना महेश गायकवाड यांना सांगितली.

अखेर ही बाब शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या लक्षात येताच, त्यांच्या पुढाकाराने शेवटी या तरुणावर उपचार सुरू झाले आहेत, केवळ पैसे नसल्यामुळे या तरुणाची मुंबई कल्याण, उल्हासनगर अशी तब्बल ५ तास फरफट उपचाराविना झाली.

दरम्यान राज्यातील ट्रिबल इंजिन सरकार तसेच केंद्र सरकारने घोषणांचा पाऊस पाडला, राजीव गांधी, महात्मा फुले जन आरोग्य, आणि आता आयुष्यमान पण खरेच याचा गोरगरिबांना लाभ होतो का? राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी रुग्णालयात उपचार मोफत केले, मात्र, या रुग्णालयात डॉक्टर, व इतर वैद्यकीय अधिकारी आहेत, पुरेसा औषध साठा, बेड आहेत का? याचा विचार कोण करणार?वेळीच महेश गायकवाड हे मदतीला धावले नसते तर कमल चौहान याचा उपचाराविना जीव गेला असता, याला कोण कारणीभूत? कळवा ठाणे, बीड, नाशिक, येथील रुग्णांच्या मृत्यूनंतर तरी आरोग्य विभागाने काय बोध घेतला हे कळेनासे झाले आहे, त्यामुळे खेदाने म्हणावे लागते, कुठे नेऊन ठेवलाय आरोग्य विभाग !

Thursday, 26 October 2023

मोहने येथील आरएस त्रिकोन ते स्मशानभूमी रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार !!

मोहने येथील आरएस  त्रिकोन ते स्मशानभूमी रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार !!

*निविदा न काढतात ४०० मीटर रस्ता तयार*

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नागरिकांनी कर रूपाने भरलेल्या पैशाचा ठेकेदाराने आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करुन ४४ लाख रुपयांचा अक्षरशः चुराडा केला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामार्फत आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन झाले होते. परंतु याच कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये विविध विकास कामे अंतर्गत मूलभूत सोयीकरिता हा रस्ता मंजूर करण्यात आला होता परंतु या कामाची निविदा न काढताच अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदाराने रस्ता पूर्ण केला आहे, असा स्पष्ट आरोप सुशील आरके यांनी केला आहे. नागरिकांनी कर रूपाने भरलेल्या ४४ लाख रुपये निधीचा गैरवापर झाला आहे असे आरके यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ठेकेदाराने कोणत्याही नियमांचे पालन न करता बेकायदेशीरपणे रस्त्याचे काम करून पालिकेला चुना लावला आहे हा रस्ता कुठे रुंद आहे तर कुठे अरुंद आहे. हा रस्ता नाल्याच्या ठिकाणी अतिशय अरुंद असून या ठिकाणाहून वाहन चालविणे अतिशय जिकरीचे झाले आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. या कामाचा  प्रस्ताव तयार करते वेळी या नाल्याला नवीन मान्यता का घेण्यात आली नाही तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला गटार तयार करण्यात आले नाही असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एकंदरीत या संपूर्ण रस्त्याकडे पाहिल्यानंतर या कामाचा कोणी प्रस्ताव तयार केला तसेच निविदा प्रक्रिया कोणत्या अधिकाऱ्याने काढली याचे आश्चर्य झाल्याशिवाय राहत नाही.

या रस्त्याची लांबी ४०० मीटर दाखवली असून प्रत्यक्षात मात्र ३०० मीटर रस्ता असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. ४०० मीटर डांबरी रस्त्यासाठी ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून केवळ एक मीटर रस्ता बनविण्यासाठी पालिकेला १ लाख ३२ हजार रुपये खर्च आला आहे. एक मीटर रस्त्याच्या कामात असे कोणते मौल्यवान मटेरियल वापरले गेले आहे हे नागरिकांना समजायला मार्ग नाही. रस्ता तयार करतेवेळी कामाची संपूर्ण माहिती असलेला पत्र्याचा बोर्ड लावण्यापेक्षा ठेकेदाराने कामाचा बोर्ड केवळ एक बॅनर लावला तोही चुकीचा पद्धतीने लावला आहे. ठेकेदाराला जास्तीत जास्त फायदा पोहोचविणे आणि त्यातून आपले कमिशन मिळविणे अशी दुहेरी फायद्याचा प्रस्ताव तसेच निवीदा न काढताच काम पुर्ण करणार्या ठेकेदारांवर आणि पालिका अधिकाऱ्यांवर देखील चौकशी करण्याची मागणी सुशील आरके यांनी केली आहे. या रस्त्याच्या कामाची त्रयस्त समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी आरके यांनी केले असून या कामाची चौकशी न झाल्यास सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आरके यांनी सांगितले आहे.

याबाबत उपअभियंता हरून इनामदार यांना विचारले असता या रस्त्याच्या कामात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. असे असले तरी या रस्त्याचे काम वादात सापडले असून पालिका अधिकारी यावर कधी समिती नेमून श्वेतपत्रिका काढून भ्रष्टाचार झाला नसल्याचे जाहीर करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली जारांगे पाटलांची भेट, राज्यात विविध ठिकाणी उपोषणाला पाठिंबा !!



छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली जारांगे पाटलांची भेट, राज्यात विविध ठिकाणी उपोषणाला पाठिंबा !!

                  मा. छत्रपती संभाजी राजे आणि जरांगे पाटलांची भेट
भिवंडी, दिं,२६, अरुण पाटील, (कोपर)

        संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चाही केली.राज्यात विविध ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे .

         उपोषणाच्या वेळी मी चार दिवस पाणी प्यायलो नाही. मी हतबल झालो होतो. त्यामुळेच मला मनोजची फार चिंता आहे. काळजी वाटते. म्हणून मी धावपळत आलो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मनापासून आम्हाला तुमची काळजी आहे. एकच विनंती आहे. पाणी तरी घ्या. छत्रपतीच्या घरातील व्यक्ती म्हणून हे सांगण्याचा जास्त नाही पण माझा थोडा अधिकार आहे. तुम्ही आमरण उपोषण करा. पण पाणी तरी घ्या. उपोषण सुरूच ठेवा. पाणी घेऊन करा. माझी हात जोडून विनंती आहे, असं संभाजी राजे म्हणाले. तेव्हा त्यांचा कंठ दाटला होता. तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्लाही त्यांनी दिला.

           संभाजीराजे अत्यंत भावनिक झाले होते. त्यांनी आपल्या शर्टाच्या बटनाला लावलेला माईक काढला. तो स्वत:च्या हाताने मनोज जरांगे यांच्या शर्टाला लावला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि काळजी घेण्यास सांगितलं. संभाजीराजे उपोषण स्थळावरून गेल्यानंतर मनोज जरांगे यांनी छत्रपती घराण्याची विनंती मान्य केली. त्यांनी बिसलेरी घेतली आणि पाण्याचा घोट घेतला. छत्रपती घराण्याचा मान म्हणून पाणी घेत आहे. पण फक्त आजच्या दिवसच पाणी घेतो, असं जरांगे म्हणाले.

            कालपासून मन लागत नव्हतं. काल दसरा होता. हलता येत नव्हतं. त्यामुळे आज तडक इकडे आलो. जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यासाठी मी जात असतो. मनोज हा अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक आहे. म्हणून त्याच्यासाठी मी आलो. मी २००७ पासून महाराष्ट्रात फिरलो. गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. आज गरीब मराठा समाज बाहेर फेकला गेला आहे. त्यांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न होता.

          २०१३ दरम्यान आम्ही पहिल्यांदा आझाद मैदानात मोठं आंदोलन केलं होतं. आम्ही सर्व होतो. आमरण उपोषण केलं होतं. तो उपोषणाचा प्रसंग मी अनुभवला आहे. माझा जन्म राजघराण्यात झाला. त्यामुळे मला सुख जास्त मिळालं. मनोज गरीब घरात जन्मला. रांगडा आहे. पण शरीर एकच असतं. मनोजने आताच आमरण उपोषण सुरू केलं असं नाही. त्याची धडपड आधीपासूनची आहे, असं संभाजीराजे म्हणाले. हे सांगत असतानाही त्यांचा कंठ दाटून आला होता. ते गहिवरून गेले होते. 

           छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून माझीही काही जबाबदारी आहे. जो समाजासाठी लढतो, जेव्हा समाज अडचणीत असताना लढतो, त्याला ताकद देण्याचं काम छत्रपती घराण्याचं असतं. म्हणूनच मी आज मनोजसाठी आलोय, असं ते म्हणाले.

Wednesday, 25 October 2023

शिवसेनेच्या दोन्ही गटात उत्सहाचे वातावरण !!

शिवसेनेच्या दोन्ही गटात उत्सहाचे वातावरण !!

कल्याण , प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मेळावे यशस्वी ठरले. शिवसेनेत फूट पडल्यानंतरचा कालचा दुसरा दसरा मेळावा होता. पहिल्या वर्षी मैदानावरून दोन्ही गटांत संघर्ष झाला; पण यंदा तो फारसा दिसला नाही. 

कोणाचे भाषण चांगले झाले, कोणत्या मेळाव्याला जास्त गर्दी होती, अशी चर्चा जरी सध्या सुरू असली तरी दोन्हीकडे चांगली गर्दी झाल्याने ठाकरे-शिंदे गटामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. शिंदे गटाने केलेल्या उठावानंतर उद्धव ठाकरे यांना राज्यभरात सहानुभूती आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. गेल्या दसरा मेळाव्यालाही शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती, याहीवर्षी ती कायम होती. शिवसेनेची ताकद विभागली गेली असली तरी शिवाजी पार्क किंवा आझाद मैदान भरण्यासाठी लागणारी संख्या जमवणे या दोन्ही पक्षांना कठीण नाही. एकनिष्ठ-गद्दारांचा मेळावा अशी एकमेकांची खिल्ली दोन्ही प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणातून उडवली. दोन्ही बाजूंनी तासभर एकमेकांवर यथेच्छ आरोप-प्रत्यारोप झाले.

आगामी लोकसभा निवडणुका पाहता, या वेळी ठाकरे आणि शिंदे यांनी आक्रमक भाषण केले. हातचे काही राखून न ठेवता हे दोघेही बोलले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मवाळ भूमिकेवर बोलणारेही कालच्या त्यांच्या भाषणानंतर प्रभावित झाले, तर एकनाथ शिंदे यांनी आता आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही हे आपल्या भाषणातून व्यासपीठावर बसलेल्या व समोर उपस्थितांपैकी शिवसैनिकांना भासवण्याचा प्रयत्न केला.

राज्यातील राजकीय परिस्थिती, सरकारविरोधात मराठा, धनगर, ओबीसींचा आक्रमक पावित्रा पाहता हे मेळावे यशस्वी होतात की फ्लाॅप? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण दोन्ही मेळावे यशस्वी झाल्यामुळे ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसैनिकांना मध्ये आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी उत्सहाचे वातावरण तयार झाले आहे.

कल्याणात जरीमरी नाल्यावर बनणार पादचारी पूल !!

कल्याणात जरीमरी नाल्यावर बनणार पादचारी पूल !!

*प्रामाणिक काम विकासावर ठाम* 

कल्याण , प्रतिनिधी : कल्याण पश्चिमेतील मल्हार नगर परिसरात असणाऱ्या जरीमरी नाल्यावर आता पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याने स्थानिकांना मोठा फायदा होणार आहे. "आमदार विश्वनाथ भोईर" यांच्या 'आमदार निधी'तून हा 'पादचारी पूल' बांधण्यात येणार असून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या पादचारी पुलामुळे संतोषी माता रोड, जोशीबाग, मल्हार नगर, काळा तलाव आदी परिसरातून स्टेशनला जाणाऱ्यांच्या वेळेत आणि त्रासात मोठी बचत होणार आहे. 

कल्याण पश्चिमेच्या मल्हार नगर परिसर, आचिव्हर्स कॉलेजच्या पाठीमागे हा पूल बांधण्यात येणार आहे. येथील स्थानिक रहिवाशांसह त्याच्या आजूबाजूच्या भागातून स्टेशनला जाणाऱ्यांचा मोठा त्रास वाचणार आहे. या पुलाअभावी स्टेशनकडे जाणाऱ्या लोकांना मोठा  वळसा घालून जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी सध्याचा मार्ग काहीसा असुरक्षित असल्याने याठिकाणी पादचारी पूल बांधण्याची नितांत गरज होती. पावसाळ्याच्या काळात तर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये - जा करण्यासाठी अनेक अडचणी आणि गैरसोयींचा सामना करावा लागायचा. त्यामुळे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी श्रेयस समेळ यांनी या जरीमरी नाल्यावर पादचारी पूल बांधण्यासाठी आमदार श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार आमदार भोईर यांनी आपल्या आमदार निधीतून या पादचारी पुलाला निधी उपलब्ध करुन दिला. 

त्यानुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर "आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे" यांच्या हस्ते या पादचारी पुलाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख रवी पाटील, मा.नगरसेवक श्रेयस समेळ, अचिव्हार्स कॉलेजचे महेश भिवंडीकर, शाखाप्रमुख संतोष घोलप तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व आदी मान्यवर उपस्थितीत होते.

दरम्यान स्टेशनला जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने हा पादचारी पूल महत्त्वाचा दुवा ठरेल. आणि लोकांच्या वेळेत त्यामुळे नक्कीच बचत होईल असा विश्वास यावेळी आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी व्यक्त केला आहे. तर या कामाचे भूमीपूजन झाल्याने स्थानिक रहिवाशांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार मानले आहेत.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...