प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा प्रा. वसंत कानेटकर लिखित "इथे ओशाळला मृत्यू रंगमंचावर" !!
दादरच्या छ. शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे नाट्यप्रयोगाचे आयोजन....
मुंबई - ( दिपक कारकर )
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सह्याद्रीच्या सिंहाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्याएवढाच तेजस्वी, पराक्रमी छावा होय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला सतत नऊ वर्षे यशस्वी झुंज देऊन नाकी नऊ आणणारे, धर्मासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे, शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणारे स्वराज्यरक्षक, राजकारण धुरंदर, कोमल, संवेदनशील मनाचे कवी, संस्कृत, इंग्रजी, ब्रज, फारसी, अरबी, उर्दू अशा अनेक भाषा अवगत असणारे बुद्धीमत्ता प्रचुर, बुधभूषण सारखा संस्कृत भाषेतील वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी आजच्या काळातही मार्गदर्शक ठरणारा ग्रंथ लिहिणारे तर नायिकाभेद, सातसतक, नखशिख हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिणारे प्रतिभासंपन्न असे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज...
अशा या तेजःपुंज राजाचा इतिहास प्रा वसंत कानेटकर यांनी आपल्या दर्जेदार लेखणीने अजरामर केला ' इथे ओशाळला मृत्यू ' ही नाट्यसंहिता लिहून !! पल्लेदार वैशिष्ट्यपूर्ण डायलॉग ही त्यांच्या लेखनशैलीची खासियत ! श्वासांच नियोजन चपखल न करता डायलॉग घेणं केवळ अशक्य...
इथे ओशाळला मध्ये संभाजीमहाराजांचा औरंगजेबाबरोबरचा नऊ वर्षांचा संघर्ष अतिशय प्रभावीपणे मांडला गेलाय. त्याचबरोबर महाराणी येसूबाईंचे अनेक पैलू दर्शविणारे असं हे पहिलं आणि शेवटच नाटक अस म्हणायला हरकत नाही. जितकी प्रभावी लेखणी तितक्याच ताकदीने संभाजीराजे पहिल्यांदा उभे केले आणि रंगभूमी गाजवली असे अभिनय सम्राट डॉ काशिनाथ घाणेकर!! सत्तर च्या दशकात प्रत्येक शो हाऊसफुल करणारं हे अजरामर नाटक आता पुन्हा एकदा शिवगणेश प्रॉडक्शन्स च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.
दिग्दर्शक गणेश ठाकूर यांनी संभाजीराजांची भूमिका जिवंत करण्यामध्ये कोणतीही कसूर ठेवली नाही. प्रेक्षकांच्या हृदयाला आपल्या अभिनय कौशल्याने हात घालत प्रत्येकाचे मन त्यांनी काबीज केले. अस्खलित मराठीतून असलेले संवाद मनाला चारशे वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातात. महाराणी येसूबाई आणि संभाजीराजे यांचे सर्व प्रसंग डोळ्यात अश्रू उभे करतात. औरंगजेबाची भूमिका साकारणारे प्रभाकर पणशीकर आजही जुन्या प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. डॉ काशिनाथ घाणेकर व प्रभाकर पणशीकर यांनी या भूमिका एका वेगळ्याच उंचीवर नेल्या होत्या, त्याचीच आठवण गणेश ठाकूर व औरंगजेब भूमिका साकारणारे कृष्णा देसाई प्रेक्षकांना करून देण्यात यशस्वी झाले आहेत. गणोजी शिर्के व कवी कलश या दुहेरी भूमिका लीलया पेलत प्रा. मिलिंद कासार रसिक मनाचा ठाव घेतात. त्याच बरोबर फक्रूद्दीन, असदखान या भुमिका वठवणारे संदेश देसाई व अजिंक्य देसाई आपल्या लक्षवेधी अभिनयाने कौतुकास पात्र ठरतात. मल्होजीबाबा ही भूमिका मंदार जंगम यांनी अगदी बेमालूम साकारण्यात यश मिळवले आहे. संताजी, धनाजी या छोट्या भूमिकेतही आपली अभिनय चुणूक यशस्वीपणे दाखवली आहे. मुकर्रबखान ही भूमिका दीपक झोरे यांनी सहज साकारली आहेत. या नाटकाचे यशस्वी प्रयोग महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे साकारून आता सत्तरावा प्रयोग श्री शिवाजी मंदिर नाट्य मंदिर, दादर येथे गुरुवार दि.१० एप्रिल २०२५ रोजी सायं. ०७.३० वा. पार पडणार आहे. तब्बल ५० ते ५५ वर्षांनंतर रंगभूमीवर या प्रयोगाचे अतिशय सुरेख सादरीकरण ही प्रेक्षकांसाठी एक ऐतिहासिक मेजवानीच म्हणावी लागेल. नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत या सर्वच बाजू अगदी उजव्या आहेत त्यामुळे हे नाटक एक वेगळी उंची गाठण्यात यशस्वी ठरतं. छत्रपती संभाजी महाराजांचा हा दैदिप्यमान पराक्रम आणि बलिदान आजच्या पिढीला माहिती करून देणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य नाटक सारख्या अतिशय प्रभावि माध्यमाद्वारे शिवगणेश प्रॉडक्शन्स करत आहे...
नुकत्याच संपन्न झालेल्या पुणे, सांगली दौऱ्यात या नाटकाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. छावामय वातावरणात शंभूराजांचा धगधगता इतिहास आपल्या मायबोलीतून अनुभवण्याचा सुखद अनुभव पुन्हा एकदा नाट्यरसिक घेत आहेत. सदर प्रयोगाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९३२४४५९०२१/९७६९५१५६५९ भ्रमणध्वनी वरती संपर्क करावा.