मनोगत...
मला आज ही आठवते, पवार साहेबांसोबत माझी पहिली भेट ॲागस्ट २०१७ च्या दरम्यान उल्हासनगर मध्ये झाली. १ तासाच्या चर्चेनंतर त्यांनी मला पक्षात सक्रीय काम करण्यास आग्रह केला. तेंव्हा मला पक्षात काम करण्यात रस नव्हता; पण त्यांचा आग्रह होता. मा. बच्चू भाऊंच्या कर्तृत्वावर प्रचंड विश्वास पण तरीही मला पक्षात काम करण्यापेक्षा फक्त काम करण्यात अधिक रस होता. स्वर्गीय कमलाकर पवार साहेबांच्या आग्रहास्तवः मी पक्षात आलो, कामाची जबाबदारी घेतली आणि दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली .
माझी आणि मा.बच्चू भाऊंची भेट होण्याचे एकमात्र दुवा पवार साहेब होते . ज्याप्रमाणे पवार साहेबांचा माझ्यावर विश्वास होता, त्याच प्रमाणे बच्चू भाऊंचा देखील माझ्यावर विश्वास दृढ होत गेला .
त्यावेळी आम्ही मनोरा सी -६६ वर जायचो. गेलो म्हणजे असे कधीच व्हायचे नाही की आम्ही उपाशीपोटी परत आलो असणार, तूमची कामे राहू द्या ..ते करतो मी.. मला विषय आला लक्षात .. तुम्ही जेवले नसणार पहिले जेवून घ्या आपण सोबत जेवू ... आपुलकीने म्हणणारे म्हणजे पवार साहेब .. घड्याळात रात्रीचे १२ वाजलेले असोत किंवा २ वाजलेले असोत, मनोरा सी-६६ मधला संगणक जो पर्यंत कार्यकर्त्यांचे , सामान्यांचे प्रश्न संपत नाहीत तो पर्यंत बंद व्हायचा नाही ! स्वीय्य सहाय्यक असले तरी अतिशय साधी राहाणी. अनेक वेळा बनियन, हाफ चड्डीवर पत्र बनवणाऱ्या पवार साहेबांच्या पत्रात वेगळीच धार होती. त्यांनी बनवलेले पत्र व बच्चू भाऊंची त्याला जोड म्हणजे काम झालेच असचे समीकरण होते ...
अनेक लोकांची निस्वार्थ सेवा, महाराष्ट्रातील कोणीही पदाधिकारी, व्यक्ती पवार साहेबांना भेटल्यावर निराश होऊन गेला नाही. त्यांच्यात सतत २४ तास काम करण्याची धमक होती. पत्र कसे बनवायचे, विषयाचा अभ्यास कसा करायचा, एखादा विषय मार्गी कसा लावायचा हे सर्व काही आम्ही पवार साहेबांच्या सानिध्यात शिकलो. अनेक अनाथ मुलांचे पालकत्व त्यांच्याकडे होते. अनेक आश्रमशाळांमध्ये त्यांचे व्यक्तिगत लक्ष असायचे .
सन २०१७ ला ज्यावेळी माझी भेट झाली तेव्हापासून किंबहुना त्याच्या अगोदर पासून ते सन २०१९ पर्यंत त्यांच्याकडे साधे बॅंक अकाउंट देखील नव्हते. मी नेहमी त्यांना विचारायचो साहेब तुम्ही एवढे मोठे कार्य करतात आणि अद्याप तुमच्याकडे बॅंक अकाऊंट नाही. त्यांनी त्यावेळी मला सांगितले ,"मला पैश्यांची गरज नाही, मी निव्वळ समाज कार्य करणारा माणूस आहे. अकाउंट कश्याला हवे, दोन वेळचे जेवण मी इथे करतो मग मला पैसे हवेत तरी कशाला". एकंदरीतच कधीच पैश्याची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त समाजासाठी काम करणारे. "श्रीमंत फकीर" होते आमचे पवार साहेब.
पवार साहेबांसोबत असतांना अनेक मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी झाल्या बहुतेक वेळा त्यांनी स्वतःहून अनेकांच्या भेटी घालून दिल्या. पण या भेटीचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे हे ते नेहमी सांगत. मा.बच्चू भाऊंकडे येण्याआधी अनेक आमदार, मंत्री यांच्यासोबत त्यांनी काम केले होते, त्यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. अगदी त्यावेळचे प्रधान सचिव श्री भूषणजी गगराणी, माजी कृषी मंत्री श्री अनिल बोंडे, आमदार कपिल पाटील, आमदार विद्याताई चव्हाण, आमदार देवेंद्र भूयार, शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याप्रमाणे कित्येक आमदार, मंत्री, प्रशासकीय सेवक त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात असायचे पण त्यांच्या ओळखीचा त्यांनी जीवनात कधीच दुरूपयोग केला नाही. समाजासाठी दीनदुबळ्यांसाठी जे काय करता येईल त्यासाठी प्रयत्न केले.
अपक्ष कार्यालयात कार्यरत असतांना अनेक आमदारांचे स्वीय्य सहाय्यक यायचे आणि कमलाकर पवारांना डॅडी म्हणायचे मी सहज विचारात पडलो आणि मग त्यांना विचारायचे ठरवले की नेमकं त्यांना हे सर्वचजण डॅडी का म्हणतात .. त्यावेळी अनेक स्वीय्य सहाय्यकांशी संबंध आला त्यावेळी समजले की ते आज ज्या पदावर आहे ते म्हणजे केवळ श्री पवार साहेबांमुळेच .. पवार साहेबांनी त्यांना घडवले त्यांना शिकविले व त्यांच्यातील सद्गुण हेरत त्यांना त्या -त्या पदापर्यंत नेवून बसवले . पवार साहेब म्हणजे एक चालती फिरती कार्यशाळाच होती ... प्रत्येकाचा आधार होते, विचारांचा आणि कर्तृत्वाचा बाप माणूस होते आमचे डॅडी...
आज माझ्या सभोवताली अनेक चांगले मित्र व चांगले सहकारी मला पवार साहेबांमुळे लाभले श्री अनिल गावंडे साहेब, गौरव जाधव, हितेश जाधव, भूषण मदकरी, श्रीकांत जगताप, अजय चौधरी, मनोज टेकाडे, अजय तापकीर, सुनिल शिरीषकर, प्रविण खेडकर, चंद्रकांत उतेकर असे अनेक मित्, जिवाभावाचे सवंगडी मला पवार साहेबांमुळेच लाभले.
त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रसंगी त्यांच्या पत्नी शेवटच्या क्षणापर्यंत योद्धा बनून लढल्या. अनेक अडचणी आल्या तरी पवार साहेब इतके खमके होते की त्यांनी त्यांचे विचार शेवटच्या क्षणापर्यंत बदलू दिले नाहीत. आयुष्यात प्रचंड रूग्णसेवा करणारा माणूस ज्याने अनेकांचे जीव वाचवले,त्यांच्यावर पैश्यांअभावी उपचार बंद होण्याची वेळ आली होती. त्यावेळी आम्ही सर्वच प्रहार पदाधिकारी खंबीर पणे उभे राहिलो आणि त्यांचे उपचार चॅरिटीच्या माध्यमातून मोफत करण्याकरता शर्तीचे प्रयत्न केले. या सर्व प्रयत्नादरम्यान त्यांच्या पत्नी प्रत्येक क्षणोक्षणी संघर्ष करत होत्या. त्यांनी त्यांची हिंमत कधीच खचु दिली नाही.
मा.आमदार श्रीकांत भारतीय साहेब आणि मा.आमदार बच्चू भाऊ कडू साहेब, यांनी वैयक्तीकरित्या वेळोवेळी रूग्णालयात भेट दिली, डॅडींकडे विशेष लक्ष दिले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांनी रूग्णालयाला भेट दिली, सहकार्य केले. ज्याला जे शक्य होईल त्याने ती मदत केली, आर्थिक सहाय्य दिले परंतु नियतीने घात केला आणि आम्ही आपल्या मार्गदर्शक डॅडींना वाचवू शकलो नाही. कॅंन्सरच्या विळख्यात ते इतके अडकले की पुन्हा त्यातून बाहेर निघूच शकले नाही.
ते नेहमी गर्वाने सगळ्यांना सांगायचे "आपला स्वप्निल बोलतो कमी पण जेव्हा पण बोलतो मुद्याचे बोलतो " , सकाळ झाली की बाबू कुठे आहे .. एक काम आहे आणि ते तू आणि हितेशच करू शकतो विश्वासाने येणारा फोन ,कायमचा बंद झाला. पवार साहेब म्हणजे व्यक्ती नाही तर पर्व होते त्या पर्वाचा आज अंत झाला.
🙏🏻तुमच्या आठवणींचा जिवंतपणा हाच आमचा आधार आहे. भावपूर्ण आदरांजली डॅडी 🙏🏻
ॲड.स्वप्निल दिलीप पाटील
मो. ९३२२२१७७७९
दिनांक -१६/०६/२०२४
**आपल्या सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय कमलाकर पवार साहेब (डॅडी) यांचे दि.१६/०६/२०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.**
**स्वर्गीय कमलाकर पवार साहेब यांचा दशक्रिया व उत्तरकार्य विधी रविवार दि.२३/०६/२०२४ रोजी त्यांचे राहते घरी रूम क्र.१,जय वर्षा को ॲाप हौसिंग सोसायटी,पारसिक बँकेच्या पाठीमागे,शास्त्री नगर,कळवा ठाणे (पश्चिम) येथे सकाळी १०.०० वाजता उपस्थित राहावे,ही विनंती.🙏🏻**
**टीप - स्वर्गीय कमलाकर पवार साहेब यांना नेहमीच सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांच्या या कार्याचा एक भाग म्हणून सदर दिनी अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला असून ज्यांना कोणाला सढळ हाताने या कार्यक्रमास सहकार्य करण्याची इच्छा आहे,त्यांनी श्रीम.विद्या पवार 9619624031 यांचेशी संपर्क साधावा.**